मुंबई, 29 नोव्हेंबर : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) आणि अटकेत असलेला सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्यात भेट घडून आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे दोघांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचीदेखील माहिती समोर आल्याने मुंबई पोलिसात (Mumbai Police) एकच खळबळ उडाली आहे. परमबीर आणि वाझे यांची ही भेट सहज किंवा योगायोगाने घडून आली की कुणाच्या निर्देशानुसार भेट घडवून आणण्यात आली? याचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत. विशेष म्हणजे सचिन वाझे हा पोलिसांच्या ताब्यात असताना हा सगळा प्रकार कसा घडू शकतो? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी घोटाळ्याचा आरोप केला होता. सिंग यांनी टाकलेल्या लेटरबॉम्बमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या आरोपांमुळे अखेर देशमुखांना गृहमंत्री पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. परमबीर सिंग यांच्या आरोपांची शहानिशा आणि चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश के यू चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाने परमबीर यांना चौकशीसाठी अनेकदा समन्स बजावले होते.
हेही वाचा : परमबीर सिंग यांच्याविरुद्ध चांदीवाल आयोगाने काढलेले वॉरंट रद्द
चांदिवाल आयोगाने समन्स बजावल्यानंतर परमबीर सिंग अचानक गायब झाले होते. ते अनेकदा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नव्हते. त्यामुळे या प्रकरणी मुंबईच्या किला कोर्टात झालेल्या सुनावणीत परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. तर दुसरीकडे परमबीर सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामीनसाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर पुढील सुनावणी 6 डिसेंबरला होणार आहे. पण तोपर्यंत अटक न करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे परमबीर यांना 6 डिसेंबरपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.
दरम्यान, परमबीर आज (29 नोव्हेंबर) चांदीवाल आयोगासमोर हजर झाले. यावेळी चांदीवाल आयोगाने त्यांचे जामीनपात्र वॉरंट रद्द केलं. तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीत 15 हजार रुपये भरण्याचे आदेश दिले. विशेष म्हणजे चांदीवाल आयोग सुनावणीसाठी आज सचिन वाझे याचीदेखील नियमित तारीख होती. त्यामुळे परमबीर सिंग चांदीवाल आयोगाच्या समोर जाण्याआधी समन्स रुममध्ये त्यांची सचिन वाझेसोबत भेट झाली. दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी आणि व्यापारी मन्सुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे हा अटकेत आहे. या प्रकरणीच्या सुनावणीसाठी वाझेची आज नियमित तारीख होती. पण या दरम्यान परमबीर सिंग आणि वाझे यांच्यात भेट झाली. या भेटीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. या भेटीवर अनिल देशमुख यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला आहे.
हेही वाचा : मृत्यूनंतर महिलेला दुसरा डोस, आरोग्य यंत्रणेकडून मृतकाच्या कुटुबियांची थट्टा?
परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांची जेव्हा भेट झाली तेव्हा नवी मुंबईचे पोलीस उपनिरीक्षक पाटील हे गार्ड इंचार्ज होते. त्यांच्या ताफ्यातील गार्ड समन्स रुमबाहेर तैनात होता. पण सुनावणीसाठी अचानक आलेल्या परमबीर सिंग यांना समन्स रुममध्ये जाण्यापासून गार्डने रोखलं का नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. संबंधित घटना ही चांदीवाल आयोगाच्या देखील निदर्शनास आली आहे. त्यामुळे आता त्या गार्डची देखील चौकशी होणार आहे. तसेच घडलेली भेट सहज का कोणाच्या निर्देशावरुन? याची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणी गार्ड इंचार्जलाही विचारणा करण्यात आली आहे. मात्र या घटनेच्या चौकशीचे अधिकृत सरकारी आदेश अद्याप देण्यात आलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.