आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन, राज ठाकरेंचा महाविकासआघाडीवर निशाणा

आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन, राज ठाकरेंचा महाविकासआघाडीवर निशाणा

'जवळपास सव्वाशे वर्ष मराठ्यांनी ह्या देशावर राज्य केलं, अनेक विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अनेक द्रष्टे नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले'

  • Share this:

मुंबई, 02 मे : आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईत होणार होते पण आता हे मुख्यालय गांधीनगर गुजरातला हलवले जाणार आहे. याच मुद्द्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारण्यावर सडकून टीका करत महाविकास आघाडीचा उल्लेख न करता निशाणा साधला आहे.

मनसेचं अधिकृत ट्वीटर अकाउंट 'मनसे अधिकृत'वरून राज ठाकरे यांनी आपली भूमिका परखडपणे मांडत  महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे.

'आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन झालेत' अशा शब्दात राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

'जवळपास सव्वाशे वर्ष मराठ्यांनी ह्या देशावर राज्य केलं, अनेक विचारधारांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अनेक द्रष्टे नेते महाराष्ट्रातून दिल्लीत गेले, दिल्ली देखील महाराष्ट्राचं म्हणणं ऐकून घ्यायची पण आजचे राजकारणी दिल्लीश्वरांपुढे कणाहीन झालेत' असं म्हणत राज ठाकरे यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र गुजरात नेणाच्या निर्णयावर टीका केली आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र हे मुंबईऐवजी आता गांधीनगरमध्ये होणार आहे. याबद्दल 27 एप्रिलला केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट होतं. त्यामुळे अखेर आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे मुख्यालय आता गुजरातच्या वाट्याला आले आहे.

हेही वाचा - छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा,मोदी सरकारच्या आदेशानंतर या बँकेची मोठी मदत

2006 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र हे मुंबई शहर बनावे असा निर्णय घेतला होता. यासाठी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये जागाही निश्चित केली होती. पण, केंद्राच्या ढिसाळ कारभारामुळे या निर्णयावर शिक्कामोर्तब होऊ शकले नाही.  आता  मोदी सरकारने याबद्दल निर्णय जाहीर केला आहे.

त्यामुळेच राज ठाकरे यांनी  मुंबईचे महत्त्व कमी केल्याचा ठपका ठेवत राजकारण्यावर सडकून टीका केली आहे. तसंच, कोरोना संचारबंदीत जर हिंदूंनी आपले सण घरात साजरे केलेत तर मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का दिली जाते? असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थितीत केली.

'या कोरोनाच्या संकटात धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने घ्यावी' असा सल्लावजा इशाराही राज ठाकरे यांनी दिली.

देवेंद्र फडणवीसांनी फोडले महाविकासआघाडीवर खापर

तर दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे मुख्यालय गुजरातला हलवण्याच्या निर्णयावरून भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवरच खापर फोडले.  2007 मध्ये व्हायब्रंट गुजरात समिटच्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादला आयएफएससी म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनासाठी ईसीआयडीआयची नियुक्ती केली. त्यानंतर गुजरातमध्ये या कामाला सुरुवातही झाली. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधीकरण गठीत केले आणि त्याचे मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केले आहे. आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या आयएफएससीसाठी शून्य योगदान दिले, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा - संपत्तीसाठी मुलगा आणि सुनेनं रचला हत्येचा प्लान, वडिलांचा केला मर्डर

 

तसंच,  त्या संधीचा गुजरातने त्यावेळी फायदा घेतला.आयएफएससीसाठी मुंबईचा दावा हा अतिशय नैसर्गिक आहे आणि महाराष्ट्र सरकारने ठरविले, तर निश्चितपणे मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन होऊ शकते' असंही फडणवीस म्हणाले.

संपादन - सचिन साळवे

First published: May 2, 2020, 2:40 PM IST

ताज्या बातम्या