हातगाडी..पाणीपुरी-शेवपुरी आणि 'त्या' तिघी, तरुणींची धडपड पाहून राज ठाकरेही भारावले

हातगाडी..पाणीपुरी-शेवपुरी आणि 'त्या' तिघी, तरुणींची धडपड पाहून राज ठाकरेही भारावले

कोल्हापूरच्या कॉलेज तरुणींनी पॉकेटमनीसाठी वेगळी निवडली पायवाट...

  • Share this:

मुंबई, 12 कोल्हापूर: कोल्हापुरातील कॉलेज तरुणींनी धडपड करून रस्त्यावर हातगाडी लावून पाणीपुरी-शेवपुरी तयार करत आपल्या पॉकेटमनीसाठी वेगळी पायवाट निवडली आहे. ऐश्‍वर्या, श्रद्धा व गीता या महाविद्यालयीन तरुणींनी कोल्हापूरात (Kolhapur)एक छोटाचा व्यवसाय (Small Scale Business) सुरू केला आहे. या तरुणींची धडपड पाहून मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) हे देखील भारावले आहेत.

राज ठाकरे यांनी तिन्ही तरुणींचं गोड कौतुक केलं आहे. एवढंच नाही तर 'मनसे वृतांत अधिकृत' या आपल्या फेसबुक पेज (Facebook Page)लेखक संतोष द. पाटील यांनी लिहिलेली ऐश्वर्या, श्रद्धा व गीताची यशोगाथा शेअर करून तरुणींना आणखी बळ दिलं आहे.

हेही वाचा..समर्थकानंच बंडाचं निशाण फडकवल्यानंतर पंकजा मुंडेंनी सोडलं मौन, म्हणाला...

पॉकेटमनीसाठी वेगळी पायवाट..

'हॉटेल विश्‍वात आपले वेगळे स्थान निर्माण करायचं या तिघींनी ठरवलं, आपण एखादी प्रेरणा घेतली तर ती आपल्या परीने पूर्ण करायची आणि त्यांनी तसं करूनही दाखवलं. ऐश्‍वर्या, श्रद्धा व गीता या महाविद्यालयीन युवतींनी आठवड्यापूर्वी अंबाई टॅंकसमोर चक्क पाणीपुरी, शेवपुरीची गाडी चालू केली. ज्या वयात आई-पप्पांकडून पॉकेटमनी घेऊन पाणीपुरी- शेवपुरीवर ताव मारायचा, त्या वयात त्यांनीच पाणीपुरी-शेवपुरी तयार करत आपल्या पॉकेटमनीसाठी वेगळी पायवाट मळायला सुरूवात केली.

ऐश्‍वर्या विजय शिंदे, गीता संजय पवार व श्रद्धा संजय माळकर या मैत्रिणींच्या जिद्दीची ही एक वेगळी कथा आहे. ऐश्‍वर्या, गीता राजाराम महाविद्यालयात विज्ञान शाखेत (एफ.वाय.) शिकतात तर श्रद्धा डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आर्किटेक्‍टच्या दुसऱ्या वर्षाला आहे. या त्यांच्या शिक्षणात व्यवस्थित; पण यांना काही तरी वेगळे करायची धडपड. त्यातही अनेक मर्यादा. मग त्यांनी ठरवलं की खाद्य क्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं. अर्थात मोठे हॉटेल त्या उभं करू शकत नव्हत्या. मोक्‍याच्या ठिकाणी मोठी जागा भाड्याने घेऊ शकत नव्हत्या. त्यांनी त्यातून मार्ग शोधण्यास सुरवात केली व रंकाळा, अंबाई टॅंकसमोरच्या रस्त्यावर त्यांना ‘मार्ग’ मिळाला. त्यांनी तेथे चक्क हातगाडीवर पाणीपुरी, शेवपुरी विकायचे ठरवले. घरी परवानगी मिळाली; पण ‘रस्त्यावर हातगाडीवर पाणीपुरी, शेवपुरी विकायची, तीही मुलींनी…’ अशी कुजबूजही सुरू झाली; पण या तिघी ठाम.

त्यांनी मुहूर्त वगैरे काहीही न बघता एक दिवस हातगाडी सुरू केली. पुरी, चिंचेचे पाणी, धण्याचं पाणी, शेव, रगडा, दही याची सांगड घालता घालता तिघींची लगबग होऊ लागली. पाणीपुरी, शेवपुरी, दहीपुरी, रगडापुरी, मसालापुरी, चुरापुरी असे वेगवेगळे प्रकार करण्यात त्यांचा आता हात बसला आहे. त्यांच्या हाताला चव तर आहेच; पण त्याला वेगळ्या धडपडीची किनारही आहे. हे करता करता ऐश्‍वर्या, गीताचे बी.एस्सी.चे व श्रद्धाचे आर्किटेक्‍टचे शिक्षणही चालू राहणार आहे. प्रेरणादायी कथा ऐकणे, वाचणे सोपे असते; पण प्रेरणा प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात उतरवणे कसे आवश्‍यक असते, हेच या तिघींनी दाखवून दिले आहे.

हेही वाचा...कोरोनाकाळात नोकरी गमावणाऱ्यांसाठी सरकारचे Aatma Nirbhar Package 3.0,वाचा सविस्तर

पहिल्या आठवड्यात चांगला प्रतिसाद..तीन कॉलेजकुमारींना हातगाडीवर बघून लोकांना पहिल्यांदा या तिघीच पाणीपुरी, दहीपुरी खायला उभ्या असलेल्या ग्राहक वाटायच्या; पण नंतर लक्षात आले की, या तिघीच ही गाडी चालवतात. आता त्यांना पहिल्या आठवड्यातच चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दुपारी तीन ते रात्री नऊ वाजेपर्यंत त्यांची लगबग सुरू आहे. काका, मामा, दादा, भावा, काकू, मावशी असा ग्राहकांशी संवाद साधत त्यांचा गाडा व्यवस्थित सुरू आहे..कोल्हापुरातील त्या कॉलेज तरुणीची एक धडपड व, आपलं आयुष्य आपण नव्या व आपल्या स्वतःच्या हिमतीवर साध्य करता येते.

Published by: Sandip Parolekar
First published: November 12, 2020, 3:18 PM IST

ताज्या बातम्या