मुंबई, 8 जुलै: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आता प्रशासन आणि नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई व कोकण या विभागीय मंडळांतर्फे दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची विक्री किंमत भरण्यासाठी 15 डिसेंबर 2020 पर्यंत बिनव्याजी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हेही वाचा… धक्कादायक! गेल्या 3 दिवसांत मंत्रालयातील 3 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सोडतीतील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा विहित वेळेत करता आलेला नाही. सदर यशस्वी व पात्र लाभार्थ्यांकडून विक्री किंमत भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर यावर उपाययोजना म्हणून ‘म्हाडा’तर्फे दिलासा देणारा सदर निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मंडळातर्फे काढण्यात आलेल्या सर्वसाधारण सदनिका सोडत व गिरणी कामगार सदनिका सोडतीमधील सुमारे 700 यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा होणार आहे. कोंकण मंडळातर्फे सन 2014, 2016 व 2018 मध्ये काढण्यात आलेल्या सदनिका सोडतींमधील सुमारे 1000 यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना या मुदतवाढीचा फायदा मिळणार आहे. हेही वाचा… हवेतून पसरणाऱ्या कोरोनाला घाबरायची गरज नाही, शास्त्रज्ञांनी आणला खास ‘फिल्टर’ म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाबाबतची माहिती संबंधित बँकेलाही देण्यात आली आहे. मुंबई व कोकण मंडळाच्या सोडतीतील संबंधित पात्र व यशस्वी लाभार्थ्यांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन ‘म्हाडा’तर्फे करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.