ठाणे, 06 मार्च: मुंबईत स्फोटकांनी कार सापडलेल्या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली होती. दरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. मनसुख हिरेन यांचे नातेवाईक एक महत्त्वाची मागणी करत आहेत. मनसुख हिरेन यांचा पोस्टमार्टम अहवाल जाहीर करा आणि मगच आम्ही मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका मनसुख यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे. पोस्टमार्टम अहवाल, मनसुख यांच्या मृत्यूचं कारण आधी जाहीर करा आणि पोस्टमार्टम करतांना केलेलं चित्रीकरण आम्हाला दाखवा, अशीही मागणी त्यांचे कुटुंबीय करत आहेत. या मागण्या पूर्ण केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊ अशी भूमिका हिरेन यांच्या कुटुंबीयांनी घेतली आहे.
दरम्यान आताच हाती आलेल्या बातमीनुसार मनसुख यांचा मृतदेह ज्याठिकाणी सापडला त्या मुंब्रा खाडीजवळ एटीएस यांची टीम पोहोचली आहे. याठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाकडून तपास केला आहे. दरम्यान मनसुख यांच्या शरिरावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याची माहिती ठाणे पोलिसांनी पोस्टमार्टम अहवाल येण्याआधीच दिली आहे.
मनसुख यांचे मोठे बंधू विनोद मनसुख आणि हिरेन यांच्या पत्नी यांनी मृतदेह ताब्यात न घेण्याच्या मुद्द्यावर ठाम आहेत. नातेवाईकांमध्ये शुक्रवारपासूनच संताप पाहायला मिळतो आहे. त्यांच्या नातेवाईकांनी अशी माहिती दिली की 2 मार्च रोजी मनसुख यांनी पत्र दिले होते, त्यात त्यांच्या होणाऱ्या छळाविषयी लिहण्यात आले होते. मात्र त्याची दखल घेतली न गेल्याचा आरोप नातेवाईक करत आहेत. शिवाय पोलिसांनी जी शक्यता वर्तवली आहे की हिरेन यांनी आत्महत्या केली ती देखील त्यांच्या नातेवाईकांनी फेटाळली आहे. त्यांनी असं म्हटलं की, हिरेन यांची आर्थिक बाजू सक्षम होती शिवाय ते उत्तम स्विमर देखील होते. या घटनेमागे घातपाताची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मनसुख यांच्या कुटुंबीयांशी गेले दोन तास चर्चा सुरू आहे, तरी देखील कुटुंबीय मृतदेह ताब्यात घेण्यास तयार नाही आहेत. डीसीपी अविनाश आंबुरे देखील याठिकाणी उपस्थित आहेत.
(हे वाचा-फॉरमॅट करून नव्याकोऱ्या रुपात विकायचे महागडे चोरीचे मोबाइल,3 भामट्यांचा पर्दाफाश)
25 फेब्रवारीला दक्षिण मुंबईतील हाय प्रोफाइल समजल्या जाणाऱ्या पेडर रोड जवळील कारमायकल रोडवर एक संशयास्पद स्कॉर्पियो कार सापडली होती. या कारची तपासणी केल्यावर त्यात 25 जिलेटीनच्या कांड्या सापडल्या. या जिलेटीनच्या कांड्या स्फोटक नसल्या तरी त्या स्फोट घडवण्यासाठी महत्वाच्या भूमिका बजावतात. त्याचबरोबर या कारमध्ये एक धमकी पत्रही मिळालं होतं. प्रकरण अतिसंवेदनशील झालं.
मुंबई पोलिसांबरोबर राष्ट्रीय तपास यंत्रणा NIA चा तपास सुरू झाला. दुसऱ्याच दिवशी संशयास्पद स्कॉर्पियो कारचा मूळ मालक पोलिसांच्या समोर आला. मनसूख हिरेन त्याचं नाव. ठाण्याला घोडबंदर रोड जवळ राहणारे छोटे उद्योजक अशी त्यांची ओळख होती.
(हे वाचा-धक्कादायक वळण, अज्ञात तरुणीने पूजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाईल पळवला!)
मनसुख हिरेन स्वत: पोलिसांच्या समोर आले आणि त्यांनी त्यांची स्काँर्पियो कार आठवडाभरापूर्वीच चोरीला गेली असल्याचं सांगितलं. पोलिसांचा तपास सुरू होता. अधिवेशन आठवड्याच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, शुक्रवारी संध्याकाळी ठाण्यातील रेती बंदरजवळील खाडीत दलदलीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news