मुंबई, 05 जानेवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेही मैदानात उतरले आहे. राज यांनी पुन्हा एकदा पत्र लिहून सर्व पक्षांना विनंती केली आहे.
भाजपचे दिवंगत आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा आणि चिंचवड मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. पण विरोधकांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतल्यामुळे निवडणूक अटळ मानली जात आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी अंधेरीचा दाखला देत पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली आहे.
'महाराष्ट्र विधानसभेच्या २ आमदारांचं नुकतंच दुःखद निधन झालं. ह्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिडणूका होत आहेत. मी अगदी सुरुवातीपासून ह्या मताचा आहे की, जेंव्हा एखाद्या विद्यमान लोकप्रतिनिधीचं निधन होतं तेंव्हा तिथे होणारी पोटनिवडणूक शक्यतो बिनविरोध करावी. कारण मुळात जसा त्या विधानसभेतील कौल लोकप्रतिनिधीला असतो, तसाच कौल त्याच्या पक्षाला देखील असतो. अनेकदा त्या पोटनिवडणुकीत उमेदवार हा मृत व्यक्तीच्या घरातील असतो, अशावेळेस पक्षाने जर मृत व्यक्तीच्या घरातील उमेदवार दिला असेल तर, त्या उमेदवाराला बिनविरोध निवडून देणं ही एक प्रकारे, राजकीय संस्कृतीने त्या निधन झालेल्या व्यक्तीला श्रद्धांजलीच ठरणार नाही का? आणि ही प्रगल्भता महाराष्ट्राच्या राजकारणाला नवीन नाही. अर्थात उमेदवार जर निधन पावलेल्या लोकप्रतिनिधीच्या घरातील नसेल तर, जनता देखील सहानभूती दाखवेलच असं नाही, असं राज ठाकरे पत्रात म्हणाले.
(पवारांशी बोलले, राज ठाकरेंशी बोलले, पण मुख्यमंत्री शिंदेंनी टाळला 'मातोश्री'वर फोन)
'अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळेस, दिवंगत आमदार रमेश लटके ह्यांच्या पत्नी शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या होत्या, त्यावेळेस मी देवेंद्र फडणवीस ह्यांना निवडणूक बिनविरोध करण्याचं आव्हान केलं होतं. ज्याला सकारात्मक प्रतिसाद देत, त्यांनी ती निवडणूक बिनविरोध होऊ दिली.
(तुम्ही बंडखोरी करताना कुणाला सांगितलं? राम शिंदेंचा अजितदादांना सणसणीत टोला)
आता पुन्हा पिंपरी-चिंचवड आणि कसबा विधानसभांमध्ये पोटनिवडणुका होत आहेत. जो उमदेपणा भारतीय जनता पक्षाने दाखवला तोच उमदेपणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील दाखवावा. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे हे देशाला दाखवून देण्याची संधी आपल्याला सर्वाना आहे. हीच नाही तर एकूणच अशा दुःखद घटनांमुळे होणाऱ्या पोटनिवडणुका बिनविरोध कराव्यात ही इच्छा' अशी विनंती राज ठाकरेंनी पत्रातून केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.