अहमदनगर , 05 फेब्रुवारी : अजित पवार हे सांगतात की, एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहेत. हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले, मात्र अजित पवार बंडखोरी करणार आहेत हे अजित पवारांनी कोणाला सांगितलं? असा खोचक सवाल करत भाजपचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी अजित पवार यांना टोला लगावला.
अहमदनगरमध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला. त्यांच्या या भूमिकेनंतर राम शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला.
'मी अपक्षचा आहे आणि अपक्षचा राहील या सत्यजीत तांबे यांच्या वक्तव्यावर बोलताना भाजप आमदार राम शिंदे म्हणाले की, सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबे हे निवडून आल्याबरोबर प्रतिक्रिया दिली होती की आम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. शिवाय त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आभार देखील मानले होते, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडले नाही. यापेक्षा काँग्रेसने त्यांना सोडलं हे या ठिकाणी अधोरेखित करणे अधिक महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया राम शिंदेंनी दिली.
'सत्यजित तांबे यांनी काँग्रेसच्या नियोजनाचे आणि काँग्रेसच्या विचारधाराची लक्तरे वेशीला टांगलेले आहेत. हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, मात्र त्यांनी हा विषय निवडणूक झाल्याबरोबर लगेच मांडला त्यावरून त्यांच्या मनाला किती वेदना आणि यातना होतात हे स्पष्ट होतं. मात्र हा काँग्रेसचा अंतर्गत विषय आहे, त्यामुळे त्यावर बोलणं योग्य होणार नाही असं राम शिंदे म्हणाले.
'राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय करू शकतात हे उभ्या राज्याने पाहिलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जे आव्हान दिले त्यावरून त्यांनी आता तरी बालिशपणा सोडला पाहिजे. आपण आव्हान कोणाला देतोय, या देशात आणि राज्यात जे कोणीही घडवू शकले नाही, ते एकनाथ शिंदे यांनी घडवलं आणि परिवर्तन केलं. त्यामुळे आता तरी आदित्य ठाकरे यांनी हे बालिश विचार मांडण्याचे थांबवावं, शेवटी आपण बालिश असाल मात्र माजी मंत्री आहात, असा घणाघात राम शिंदे यांनी केला.
'अजित पवार हे सांगतात की एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहेत हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले, मात्र अजित पवार बंडखोरी करणार आहेत हे अजित पवारांनी कोणाला सांगितलं? असा सवाल करत राम शिंदे यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला.
'ज्यावेळेस भाजपला सोबत घेऊन त्यांनी शपथ घेतली याबद्दल देखील त्यांनी जाहीर करणे गरजेचे आहे' असं राम शिंदे यांनी म्हटलं. अजित पवार यांनी भाजपला सुरुवातीला बिलगायचे काम केलं, ते अयशस्वी ठरले. मात्र एकनाथ शिंदे यांनी योग्य चाल केली आणि ते यशस्वी राहिले असे म्हणत राम शिंदे यांनी अजित पवार यांना देखील टोला लगावला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.