मुंबई, 18 सप्टेंबर : महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, भारतीय जनता पक्षातील (BJP) अनेक आमदार हे सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश (BJP Mla may join NCP in presence of Sharad Pawar) होणार असल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला मोठं खिंडार पाडण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. भाजपच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असून पुढील आठवड्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. तर काही आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर काही आमदारांनी स्थानिक परिस्थिती पाहता शिवसेनेत प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता भारतीय जनता पक्षातील हे आमदार कोण आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘भावी सहकारी’ वक्तव्यानंतर आज Devendra Fadnavis आणि Jayant Patil यांचा एकाच गाडीतून प्रवास संजय राऊतांनी दिले संकेत संजय राऊत यांनी म्हटलं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात जे वक्तव्य केलं ते ठाकरे स्टाईल भाषण होते. उद्धव ठाकरेंनी कुठेही म्हटलं नाहीये की, नवीन गठबंधन होईल, सरकार पडेल किंवा आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. उद्धवजींचे स्पष्ट संकेत आहेत की ज्यांना भावी सहकारी व्हायचं आहे ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. त्यांनी बोट दाखवून, नाव घेऊन सांगितलं आहे आणि ज्या हालचाली राजकारणात दिसत आहेत. विशेषत: चंद्रकांत पाटील यांनी केलेलं वक्तव्य की माजी मंत्री म्हणू नका. याचाच अर्थ असा की, कुणीतरी तिकडे आहे ज्यांना इथे यायचं आहे आणि उद्धवजींनी संकेत दिले आहेत की तुम्ही या. बरेच लोक येऊ इच्छितात असं म्हणत संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला. मुख्यमंत्री विधान हे अचानक आलेलं नाही. ते ठरवून केलं आहे. काही माजी आहेत त्यांना भावी व्हायचं आहे. भावी मित्र व्हायला, काही जण पक्षात यायला इच्छूक आहेत, ते संपर्कात आहेत. आमच्यात जी चर्चा झाली ती बाहेर सांगायची नाही. चंद्रकांत पाटील यांनी 48 तासांची मुदत दिली होती ती तर संपली. आता त्यांना मुदतवाढ द्यावी लागेल. आघाडीतील पक्षामध्ये कोणतेही संभ्रमाचे वातावरण नाही. आमचे 5 वर्षांचे कमिटमेंट आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल - चंद्रकांत पाटील दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसांत कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. झालं असं की, देहूतील एका कार्यक्रमात मंचावरून एकाने माजी मंत्री चंद्रकांत पाटील असा उल्लेख केला. तेव्हा माजी मंत्री म्हणू नका, दोन-तीन दिवसात कळेल असं म्हणत पाटलांनी सूचक विधान केलं. या विधानामुळं तर्क-वितर्काना उधाण आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.