मुंबई, 23 जानेवारी : राज्यात सुरू असलेल्या पेचप्रसंगावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडी सरकार टिकणार की नाही, हे विधानसभेत ठरेल. हे सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास पवारांनी व्यक्त केला आहे. बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात यावंच लागेल, असं पवारांनी स्पष्ट केलं. पवारांनी यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा दावा खोडून काढला. शिवसेनेच्या बंडामागे भाजपचा हात दिसत नाही,असं स्पष्ट विधान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. भाजपचा कुठलाही नेता किंवा मोठा चेहरा गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये जावून काहीतरी करतोय ते आतातरी दिसत नाहीय, असं अजित पवार म्हणाले होते. त्यावर, अजित पवारांना स्थानिक माहिती जास्त आहे. गुजरात आणि आसाममधील आम्हाला जास्त माहिती आहे, असं पवारांनी यावेळी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांचा गुवाहाटीमधील नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत आपल्याला राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदे यांनी केला होता. त्यावर शरद पवारांनी देशातील सहा राष्ट्रीय पक्षांची यादी यावेळी वाचून दाखवली.या सहा राष्ट्रीय पक्षांपैकी भाजपासोडून इतरांचा त्याच्यामागे हात आहे का? याचा विचार करावा, असेही पवारांनी यावेळी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारसाठी 24 तास महत्त्वाचे, शरद पवारांचा सूचक इशारा
शिंदेंच्या व्हिडीओमध्ये काय?
भाजपा एक राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांनी हा निर्णय ऐतिहासिक असल्याचं मला सांगितलं आहे. काही लागलं तरी ते आपल्याला कमी करणार नाहीत. भाजपही महाशक्ती असून त्यांनी पाकिस्तानला धडा शिकवलाय,' असा दावा एकनाथ शिंदे यांनी नव्या व्हिडीओमध्ये केला आहे. या व्हिडीओमध्ये शिंदे आमदारांशी संवाद साधत आहेत. त्याचबरोबर एका आमदारानं एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आपला पाठिंबा असल्याचंही या व्हिडीओत स्पष्ट केलंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.