मुंबई, 10 एप्रिल : राज्यातील इतर जिल्ह्यांसह मुंबईतही वाढत्या कोरोना (Coronavirus in Mumbai) रुग्णसंख्येमुळे गंभीर स्थिती निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून आता कडक लॉकडाऊनचा (Strict Lockdown) निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. याच भीतीतून अनेक प्रवाशांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनसवर (LTT) मोठी गर्दी केली. या गर्दीमुळे ऐन वीकेंड लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली.
लोकमान्य टिळक टर्मिनसवर जमलेले अनेक प्रवासी विना तिकीट गावी जाण्यासाठी गर्दी करत असल्याचं पाहायला मिळालं. तसंच श्रमिक ट्रेन सुटणार असल्याची अफवा पसरल्यानेच ही गर्दी झाल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - 'संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल', अजित पवारांकडून राज्यभरात कडक लॉकडाऊनचे संकेत?
मागील वर्षीदेखील जेव्हा लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला तेव्हाही मुंबईतील अनेक रेल्वेस्थानकांवर प्रवाशांनी गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवला होता. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी खरंतर लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात येतो. मात्र आततायीपणा किंवा अफवा पसरल्यामुळे लोक एकत्र येत गर्दी करतात. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग हा लॉकडाऊनचा जो प्रमुख उद्देश आहे, त्यालाच हरताळ फासला जातो.
दरम्यान, लोकल सेवा किंवा देशभरात होणारी रेल्वे वाहतूक याबाबत अद्याप राज्य सरकारने कोणताही अधिकृत निर्णय घेतलेला नाही. काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोकल सेवेबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी अजून तरी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे लोकांनी विनाकारण अफवांवर विश्वास ठेवत गर्दी करू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lockdown, Mumbai local