बारामती, 10 एप्रिल : बारामती शहरात (Baramati News) आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोरोनासंदर्भात तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यामध्ये होत असलेला लसीचा तुटवडा तसेच रेमडेसिवीर या इंजेक्शन (Remdesivir dose for covid) संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याबाबत जिल्ह्याचे सीईओ आयुष प्रसाद यांनी बैठकीनंतर माहिती दिली. मात्र ही बैठक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लॉकडाऊनबाबत (Lockdown) महत्त्वपूर्ण भाष्य केलं आहे.
'आज मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय घेतला जाईल. प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेवून चालणार नाही,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. त्यामुळे वीकेंडप्रमाणेच आता संपूर्ण आठवडाभर देखील कडक लॉकडाऊन केला जाणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
'मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत व्यापाऱ्यांच्या उद्यापासून दुकाने उघडण्याच्या भूमिकेबद्दल चर्चा करुन त्याबद्दल आज रात्री किंवा उद्या निर्णय जाहीर केला जाईल,' असंही अजित पवार यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. अजित पवार यांनी आजच्या बैठकीत इंजेक्शन, बेड, लसीकरण, रुग्णवाहिका याचा आढावा घेतला. तसंच बारामतीत होत असलेली रुग्णवाढ रोखण्यासाठी काही निर्बंध लादण्याबद्दल पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा -...म्हणून अजित पवार आणि जयंत पाटलांवर FIR दाखल करा, भाजप नेत्याची मागणी
'राज्य शासनाच्या एकाही हॉस्पिटलमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन कमी पडत नाही. खासगी रुग्णालयांमध्ये तुटवडा आहे. त्यामागे काही कारणे आहेत. त्याबद्दलही चर्चा झाली. जिल्ह्यात याबद्दल कशा पद्धतीने उपाययोजना राबवायच्या याबद्दल पुण्यातील बैठकीत निर्णय घेणार आहोत,' अशी माहिती यावेळी अजित पवार यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ काय म्हणाले?
'रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा राज्यभरात सुरू आहे. यावर उपाययोजना लवकरच शासनाकडून केल्या जात आहेत. येत्या 2 दिवसांत रेमडेसिवीरचे योग्य असे नियोजन करून प्रत्येक रुग्णाला वेळेवर हे इंजेक्शन उपलब्ध होईल,' अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे सीईओ आयुष प्रसाद यांनी दिली.
'आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामतीत कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली. सोबतच देशात 4 कंपन्या रेमडेसिवीरची निर्मिती करतात. त्या कंपन्यांशी देखील शासनाची बोलणं सुरू असून लवकरच योग्य असं नियोजन करून येत्या 2 दिवसांत तुटवडा कमी केला जाईल. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ती संख्या आटोक्यात कशी आणता येईल यावर देखील चर्चा करण्यात आली,' असं आयुष प्रसाद यांनी सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.