मुंबई, 11 जून : शिवसेनेचे उमेदवार संजय पवार (Shiv Sena candidate Sanjay Pawar) आणि भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (BJP Candidate Dhananjay Mahadik) यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत भाजपची खेळी यशस्वी झाली आणि शिवसेनेला धोबीपछाड दिला. या परभवानंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत ज्या अपक्ष आमदार आणि लहान पक्षांच्या आमदारांनी आपल्याला दगा देत भाजपला मतदान केलं त्यांची नावे जाहीर केली आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आमदारांची नावे जाहीर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय आहे प्रकरण? शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, मी 42 मतांवर लढलो आणि त्यातही एक मत बाद झालं. काही लोक माझ्या मतांवर डोळा ठेवून होते आणि ती मते बाद करण्याच्या प्रयत्नात होती. आमच्या लोकांनी तो प्रयत्न हाणून पाडला. संजय पवार हे सुद्धा उत्तम प्रकारे लढले. एका सामान्य कार्यकर्त्याचा पराभव करण्यासाठी भाजपने अक्षरश: पाऊस पाडला. वाचा : निवडणुकीत कुठल्या आमदारांची मते मिळाली नाही? संजय राऊतांनी थेट आमदारांची नावेच केली जाहीर संजय पवार यांच्या पराभवाने उद्धव ठाकरे सुद्धा व्यथिथ झाले आहेत. कार्यकर्ता पक्षासाठी लढत असतो. आम्हाला असं वाटलं की, काही लोकांनी आम्हाला शब्द दिले होते ते पाळले नाहीत. विशेषत: वसई-विरारचे हितेंद्र ठाकूर आणि त्यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. करमाळ्याचे संजय मामा शिंदे, अमरावतीचे आमदार देवेंद्र भुयार, श्यामसुंदर शिंदे यांची मते आम्हाला मिळाली नाहीत असं म्हणत संजय राऊत यांनी थेट आमदारांची नावेच जाहीर केली आहेत. अजितदादा सांगतील तिथं मतदान अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी निवडणुकीपूर्वी म्हटलं होतं, सरकार स्थापन होण्यापूर्वीपासून मी अजितदादांसोबत आहे. मतदारसंघातील कुठलेही प्रश्न असले तरी अजित पवारांकडे गेलो तर काम होतं. अजितदादांनी महाविकास आघाडीला मतदान करण्याचं म्हटलं. संविधानामुळे मिळालेला अधिकार मतादरसंघासाठी कसा करता येईल? हे पाहिलं मी. मुख्यमंत्र्यांचा, शिवसेनेचा कुणाचाही माझ्यासोबत संपर्क नाही. त्यांनी संपर्क केला नाही तरी फरक पडत नाही. अजित पवारांनी सांगितलं तिथे मतदान करणार. भाजपला माहिती आहे की, देवेंद्र भुयार अजित पवारांचा पक्का आहे आणि त्यामुळे ते मला संपर्कच करत नाही. वाचा : भाजपने डाव साधला; राज्यसभा निवडणूक निकालानंतर राजकीय घडामोडींना वेग मविआ सोबतच तर मतदानापूर्वी आमदार संजयमामा शिंदे यांनीही आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचंच म्हटलं होतं. संजयमामा शिंदे यांनी सुद्धा महाविकास आघाडीसोबतच असल्याचं म्हटलं होतं. अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं होतं की, अजितदादा सांगतील तिथे मतदान करणार आणि आता त्याच आमदारांवर संजय राऊत यांनी आरोप केला आहे. हे आमदार अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चाांना उधाण आले आहे. संजय राऊतांच्या आरोपांवर देवेंद्र भुयार यांनी म्हटलं… संजय राऊतांच्या आरोपांवर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, संजय राहेत हे काय ब्रह्मदेव आहेत का? मतदान हे गोपनीय राहतं. आम्ही दिलं की नाही दिलं हे यांना कसं माहिती. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत मी पूर्वीपासून आहे. शिवसेना नंतर आली. मी महाविकास आघाडीसोबत आहे. मी कुठलाही दगाफटका केला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.