मुंबई, 05 ऑगस्ट: मुंबई-ठाण्यासह उपनगरात पहाटेपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसानं चांगलाच जोर धरला आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसानं मुंबईकरांचे चांगलेच हाल झाल्याचं पाहायला मिळालं. तर सांताक्रूझच्या वाकोला परिसरात एक घरही कोसळलं. आज पुन्हा मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसानं जोर धरला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड रत्नागिरीच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. नवी मुंबई परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रात्री पासून रिमझिम पाऊस सुरू होता. पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.
हे वाचा- यावर्षीही मुंबईची झाली तुंबई! तब्बल 26 जागांवर भरलं पाणी, पाहा PHOTOS मुसळधार पावसामुळे मीरारोड परिसरात कंबरेएवढं पाणी साचलं आहे. अनेक दुचाकी पाण्याखाली गेल्या असून नागरिकही या पाण्यातून वाट काढत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. तर अनेक सखल भागांमध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबई-गुजरात महामार्गावर नायगाव इथे मुसळधार पावसानं पाणी साचलं आहे. यामुळे पाण्यातून वाट काढत नागरिकांना जावं लागत आहे. महामार्गावर लांबच्या लांब रांगा असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई, ठाणे आणि परिसराला मंगळवारी पावसाने झोडपून काढलं. पावसाचा हा जोर पुढचे दोन दिवस कायम राहणार आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे. येत्या 48 तासात कोकण, गोवा, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये अतिवृष्टीचा इशारा पुणे वेधशाळेनं दिला आहे. तसंच घाटमाथा, पुणे आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचं पुणे वेधशाळेचे प्रमुख संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांनी म्हटलं आहे.

)







