मुंबई, 18 सप्टेंबर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध ड्रग अब्यूज इन्फरमेशन रिहॅबिलिटेशन अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे अध्यक्ष आणि मानसशास्त्रज्ञ डॉ. युसूफ मर्चंट (Dr. Yusuf Merchant) यांच्या विरोधात एका अल्पवयीन मुलीचा बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याची तक्रार महाराष्ट्र मेडिकल काऊंसिल (MMC) कडे दाखल करण्यात आली आहे. डॉ. युसूफ यांच्यावर अल्पवयीन मुलीच्या बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मुंबई मिरर ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. डॉक्टर, वकील, पत्रकार आणि लेखकांचा एक समुह असणाऱ्या PARA (People Against Rehab Abuse) ने दाखल केलेल्या या तक्रारीत डॉ. मर्चंट यांची योग्यता आणि त्यांच्या आर्थिक स्थितीबाबत देखील सवाल उपस्थित केला आहे. याशिवाय यामध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, त्यांच्याकडे केवळ एमबीबीएसची पदवी आहे आणि मानसशास्त्रामध्ये त्यांनी केवळ इंटर्नशीप केली आहे. मर्चंट यांच्या विरोधात एकूण 7 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये 5 तक्रारी लैंगिक शोषण, चुकीच्या पद्धतीने स्पर्श करणे आणि बलात्काराचा आरोप आहेत. उर्वरित दोन शारिरीक हिंसेबाबत तक्रार करण्यात आली आहे. (हे वाचा- शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी रास्ता रोको करणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हा) मर्चंट यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये डॉ. मर्चंट आणि त्यांच्या कुशिवली, ठाणे याठिकाणच्या Drug Abuse Information Rehabilitation And Research Center (DAIRRC) आर्थिक डीलिंगबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान मर्चंट यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. (हे वाचा- मुलीवरून भांडण! तरुणानं पेट्रोल ओतून वडिलांना जिवंत जाळलं, बदलापूर जवळील घटना ) मीडिया अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले की त्यांनी डॉ. मर्चंट यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असे म्हटले की, ‘हे सर्व आरोप निराधार आहेत. मी न्यायालयात यावर कायद्याने उत्तर देईन आणि कोणत्याही प्रकारच्या चौकशीसाठी माझे रेकॉर्ड देण्यास मला आनंदच होईल.’ त्यांच्यावर करण्यात आलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या बलात्काराच्या आरोपाबाबत विचारले असता डॉ. मर्चंट असे म्हणाले की, ‘कुणी काहीही म्हणो, मला पूर्ण विश्वास आहे की, सरकार पूर्ण तपास करेल. मला हे पाहायचे आहे की मला बदनाम करण्याचा प्रयत्न कोण करत आहे.’ डॉ. युसूफ मर्चंट हे ड्रग अॅडिक्शन आणि मेंटल हेल्थ संदर्भातील केवळ मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण देशातील मोठे नाव आहे. गुरुवारी त्यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप फेटाळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.