जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / '...तेव्हा लाज वाटली नव्हती का?', शिंदे गटाकडून ठाकरेंवर पहिल्यांदाच टोकाची टीका, भरत गोगावले आक्रमक

'...तेव्हा लाज वाटली नव्हती का?', शिंदे गटाकडून ठाकरेंवर पहिल्यांदाच टोकाची टीका, भरत गोगावले आक्रमक

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रचंड तिखट शब्दांमध्ये ठाकरे गटातील आमदार आणि मुख्य शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जुलै : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) प्रचंड आक्रमक झाले होते. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याकडून तर बंडखोर आमदारांवर टोकाची टीका केली जात होती. त्यांच्या टीकेवर शिंदे गटाकडून सौम्य शब्दांमध्ये प्रतिक्रिया देण्यात येत होती. शिंदे गटाकडून त्याबाबत मर्यादा पाळली जात होती. पण काहींनी टोकाची टीका करु नका, असा इशारा देखील दिला होता. या सगळ्या घडामोडींनंतर आता शिंदे गटातील आमदारही आक्रमक होताना दिसत आहेत. शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी प्रचंड तिखट शब्दांमध्ये ठाकरे गटातील आमदार आणि मुख्य शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला आहे. “2019 साली शिवसेना-भाजपने एकत्र निवडणूक लढवल्या होत्या. राज्यातील जनतेने या युतीलाच कौल दिला होता. सेना-भाजप एकत्र सत्ता स्थापन करावी, अशीच लोकांची भावना होती. मात्र, त्यानंतरही आपण असंगाशी संग करत काँग्रेस-राष्ट्रवादीशी घरोबा केला. लोकभावनेला पायदळी तुडवत असताना तेव्हा आपल्याला लाज वाटली नव्हती का?”, असा सवाल शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी केला आहे. “आम्ही बाळासाहेबांचा हिंदूत्ववादी विचार लोकभावनेचा आदर करत सेना-भाजप युतीचे सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आम्हाला ना त्याची लाज बाळगण्याची गरज आहे, ना राजीनामा देण्याची”, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. ( …तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागेल? विधानसभा उपाध्यक्षांकडून सुप्रीम कोर्टात जवाब दाखल, बंडखोरांच्या अडचणी वाढणार? ) दहिसर येथील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांमध्ये भाषण करताना शिवसेनेतील आमदारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावर गोगावले यांनी हे उत्तर दिले आहे. यापूर्वी झालेल्या चूका टाळून आता तरी असंगाशी संग सोडा, असे आवाहनही त्यांनी केले. शिवसेनाप्रमुखांच्या तालमीत तयार झालेल्या आम्हा मावळ्यांची हिंमत काय आहे हे उभ्या जगाने पाहिले आहे. तुम्हालाही त्याची अनुभूती आली असेलच. बाळासाहेबांच्या धगधगत्या विचारांची ही हिंमत आहे. त्यामुळे कुणी आम्हाला आव्हान देऊ नये. त्याचे चटके अनेकांना सहन होणार नाही , असा अप्रत्यक्ष इशाराही त्यांनी दिला. शिवसेनेचे काही आमदार आजही या युतीच्या बाहेर आहेत. त्यांनी आता जनाची नाही तर मनाची लाज बाळगत काँग्रेस राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दाखविलेल्या हिंदूत्वाची पुन्हा एकदा कास धरावी, असे आवाहनही त्यांनी केले. सुबह का भूला शाम को घर लौटा तो उसे भूला नही केहेते, असेही गोगावले यावेळी म्हणाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात