मुंबई, 19 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना आज ईडीने अटक केल्याची बातमी ताजी असताना आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ईडीने उद्धव ठाकरे यांचे दुसरे निकटवर्तीय खासदार संजय राऊत यांना समन्स बजावले आहेत. संजय राऊत आणि संजय पांडे या दोघांच्या प्रकरणांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही. पण एकाचदिवशी या दोन घटना घडत आहे. संजय राऊत यांना ईडीच्या समन्सची ही पहिली वेळ नाही. त्यांना याआधीदेखील ईडीने समन्स बजावले आहेत. त्यांची ईडीकडून चौकशीदेखील झाली आहे. यावेळी ईडीने त्यांना उद्याच चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. गोरेगाव पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांना समन्स बजावले आहेत. याआधी संजय राऊतांची तब्बल दहा तास चौकशी झाली होती. या प्रकरणी ईडीकडून आज सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची चौकशी झाली. या प्रकरणी प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली आहे. ईडीने प्रवीण राऊत आणि संजय राऊत यांच्या मालकीची 11 कोटींची मालमत्ता देखील जप्त केली आहे. त्यामध्ये प्रवीण राऊत यांची पालघर जिल्ह्यातील मालमत्ता होती. तर संजय राऊत यांचा दादरमधला एक फ्लॅट, तसेच संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर असलेले अलिबागमधील 8 प्लॉट, सुजीत पाटकर यांच्या पत्नी स्वप्ना पाटक यांच्या नावे असलेल 4 प्लॉट अशी सर्व मालमत्ता जप्त करण्यात आली होती. नेमकं प्रकरण काय? गोरेगावमध्ये गुरुआशिष कंपनीला चाळीच्या पुनर्विकासाचं काम देण्यात आलं होतं. मात्र प्रवीण राऊत यांनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या साथीनं या जागेतील एफएसआय परस्पर विकल्याचं प्रथमदर्शनी समोर आलं होतं. गोरेगाव पश्चिमेतील सिद्धार्थ नगर भागातील या झोपडपट्टीचं काम न करताच परस्पर काही वर्षांपूर्वी इथला एफएसआय बेकायदेशीररित्या विकण्यात आला. हा व्यवहार तब्बल 1000 कोटी रुपयांचा होता. एचडीआयएलच्या प्रमोटर्सना पैशांची अफरातफर करण्यात मदत केली, असा आरोपही प्रवीण राऊत यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ( उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय संजय पांडेंना ईडीकडून अटक ) याच काळात प्रवीण राऊत यांनी त्यांची पत्नी माधुरी यांना 1 कोटी 60 लाख रुपये ट्रान्सफर केले होते. त्यातील 55 लाख रुपये माधुरी यांनी संजय राऊत यांची पत्नी वर्षा राऊत यांना बिनव्याजी कर्ज म्हणून दिल्याचं स्पष्ट झालं होतं. याच रकमेतून दादर पूर्वेत एक फ्लॅट खरेदी करण्यात आल्याचंही चौकशीतून पुढे आले होतं. विशेष म्हणजे, राज्यसभा सदस्यपदाच्या शपथ पत्रात संजय राऊत यांनी या पैशांचा उल्लेख केलेला आहे. वर्षा राऊत यांना देण्यात आलेले 55 लाख रुपये हे कर्ज स्वरुपात देण्यात आले होते, असं या शपथपत्रात नमूद आहे. PMC बँक घोटाळा प्रकरणी HDIL च्या वाधवा बंधुवर कारवाई करण्यात आली होती. गोरेगाव येथील एका पुर्नविकास प्रकल्पात HDIL ची आर्थिक अनियमितता दिसून आली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास हा EOW करत होती. त्यानंतर हे प्रकरण ईडीकडे गेलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








