मुंबई, 16 मे : कोरोनाचं संकट असतानाच आता अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या तौत्के चक्रीवादळाचं (Tauktae Cyclone) संकट आलं आहे. सध्या हे वादळ कोकण किनारपट्टीला धडकलं असून मुंबईसह, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथे धोका वाढताना दिसतो आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे मुसळधार पावसासह वाऱ्याचा वेगही वाढला आहे.
तौत्के चक्रीवादळ सध्या मुंबईपासून 200 किमी अंतरावर आहे. याच दरम्यान सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो वरळी सी-लिंकचा आहे. उज्वल पुरी @ompsyram या फोटोग्राफरने हा फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. पावसादरम्यानचाच हा फोटो असल्याचं दिसतंय. काळे ढग, अथांग समुद्र आणि संपूर्ण सी-लिंक असलेला हा फोटो शेअर करण्यात आला आहे. हा फोटो आताचा सध्याच्या वादळाच्या स्थितीतील असल्याचं अनेकांना वाटत असून तो मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
परंतु उज्वल पुरी यांनी हा फोटो जुना असल्याचं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय. सध्याच्या तौत्के वादळाच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर वादळी ढगांचा हा जुना फोटो शेअर करत, त्यांनी Stay Safe Mumbai म्हणत फोटो शेअर केला आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सकडून या फोटोला पसंती मिळत असून हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर, रिट्वीट केला जात आहे.
Bend it like .... . Storm Clouds on the horizon . Stay Safe Mumbai .#mumbai #clouds #storm #Tauktae #CycloneTauktae #CycloneAlert . *old pic for representative purpose only pic.twitter.com/rpVOs8aNJs
— Ujwal Puri (@ompsyram) May 15, 2021
दरम्यान, सध्या वादळ वेगाने पुढे सरकत असून पुढील एक-दोन दिवसांत ते मुंबईत दाखल होईल. या वादळामुळे मुंबई, ठाणे, पालघरला अलर्ट जारी करण्यात आला असून, या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच रायगडलाही अलर्ट जारी करण्यात आला असून वादळी पावसासह वेगवान वाऱ्याचीही शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.