आधी ठाकरे सरकारवर नाराजी, आता काँग्रेसचे मंत्री थोरात कोकण दौऱ्यावर!

थोरात यांच्या कोकण दौ-यानंतर काॅंग्रेसला कोकण पुनर्वसनाच्या प्रक्रियेत किती स्थान मिळतं हे ठरणार आहे. त्यामुळे फक्त कोकणवासियांच्या दृष्टीने नाही तर काँग्रेसवासियांच्या दृष्टीनेही थोरातांचा कोकण दौरा महत्त्वाचा आहे.

थोरात यांच्या कोकण दौ-यानंतर काॅंग्रेसला कोकण पुनर्वसनाच्या प्रक्रियेत किती स्थान मिळतं हे ठरणार आहे. त्यामुळे फक्त कोकणवासियांच्या दृष्टीने नाही तर काँग्रेसवासियांच्या दृष्टीनेही थोरातांचा कोकण दौरा महत्त्वाचा आहे.

  • Share this:
मुंबई 13 जून: शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या कोकण दौऱ्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज एक दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. ते रायगड जिल्ह्यातल्या काही गावांना भेटी देणार आहेत.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रायगड इथे जाऊन काही तास निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचा आढाव घेतला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दोन दिवसीय कोकण दौरा करत परस्थितीची पाहणी केली. त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दोन दिवसांचा कोकण दौरा केला होता. या दौ-यांवरुन राजकीय वातावरण तापत असताना काँग्रेस पक्ष मात्र या चित्रात कुठेच दिसत नव्हता. आता अखेरीस काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आता एकदिवसीय कोकण दौ-यावर आहेत. गुरुवारीच त्यांनी ठाकरे सरकारविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झालं आहे. थोरात हे रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव आणि चौल येथील नुकसानाची पाहणी करतील. त्यानंतर काशिद आणि मुरुड येथे ते पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ते महसुल अधिका-यांशी चर्चा करणार आहेत. दिवे आगार, तुरुंवडी इथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन मुंबईकडे परत येणार आहेत. हे वाचा - सावधान! होम क्वारंटाइन असलेल्यांवर आता नजर ठेवणार 'तिसरा' डोळा! थोरात यांनी राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला महत्त्व दिलं जात नसल्याची तक्रार केली होती. विशेषत: कोकण दौ-यावर परतलेल्या उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बैठकीबद्दल ही तक्रार होती. या दोन्ही नेत्यांनी कोकणबद्दल केलेल्या चर्चेत काँग्रेस मात्र कुठेच नव्हती. आता दस्तुरखुद्द महसूलमंत्री थोरातच कोकण दौ-यावर जाणार असल्याने चक्रीवादळात संदर्भात होणा-या निर्णयांमध्ये किमान आतातरी काँग्रेसच्या म्हणण्याकडे महाविकास आघाडीत लक्ष दिलं जातं का हे पाहावं लागेल. गुरुवारी काँग्रेस मंत्र्यांची बैठक झाली होती. त्यात महाविकास आघाडीत राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काॅंग्रेसच्या भूमिकेला फारसं महत्त्व दिलं जात नसल्याची तक्रार करण्यात आली. यामुळे या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नसल्याचं समोर आलं होतं. या सरकारच्या स्थापनेपासून काँग्रेसमध्ये आपल्याला डावलल्या गेल्याची भावना आहे. मग मंत्रीमंडळातील मंत्रीपदांचा मुद्दा असेल किंवा काही दिवसांपूर्वीच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही काँग्रेसला दोन उमेदवार जागा हव्या होत्या पण आघाडी धर्माच्या नावाखाली काँग्रेसला त्यांचा एक उमेदवार मागे घ्यावा लागला. हे वाचा -  PM मोदी 'या' तारखांना पुन्हा करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा, सगळ्या देशाचं लक्षं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वारंवार भेटीगाठी होऊन सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांबद्दल शिक्कामोर्तब होतं असतं. या सरकारवर शरद पवार यांची मजबूत पकड आहे असं चित्र वारंवार दिसत असतं. असं सगळं होत असताना काँग्रेस मात्र तिस-या एका कोप-यात एकटी असल्याचं चित्र सतत समोर येतंय आणि हीच गोष्ट पक्षाच्या दृष्टीने योग्य नसल्याचं या पक्षातील नेत्यांना वाटतंय. त्यातूनच थोरात यांनी आपली नाराजी काल जाहीर व्यक्त केलीये. सरकारच्या एकूणच कारभाराबद्दल निर्माण झालेले प्रश्न घेऊन काँग्रेसचे सर्व मंत्री आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. थोरात यांच्या कोकण दौ-यानंतर काॅंग्रेसला कोकण पुनर्वसनाच्या प्रक्रियेत किती स्थान मिळतं हे ठरणार आहे. त्यामुळे फक्त कोकणवासियांच्या दृष्टीने नाही तर काँग्रेसवासियांच्या दृष्टीनेही थोरातांचा कोकण दौरा महत्त्वाचा आहे.
First published: