मुंबई, 26 मार्च : राज्यातील कोरोनाचा (Coronavirus in maharashtra) वाढता आलेख पाहता आता राज्य सरकारची चिंता वाढली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray meeting) यांनी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रात कोरोनाला आवरण्यासाठी कडक निर्बंध लावण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत नेमके काय काय निर्णय झाले याची एक्सक्लुझिव्ह माहिती न्यूज 18 ला मिळाली आहे. भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहे. सर्वाधिक अॅक्टिव रुग्ण असलेल्या देशातील दहा जिल्ह्यांपैकी नऊ जिल्हे तर एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे जिल्ह्याचा समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाढती कोरोना प्रकरणं ही फक्त उद्धव ठाकरे सरकारसाठीच नव्हे तर मोदी सरकारसाठीसुद्धा डोकेदुखी ठरली आहे. राज्यात आलेल्या कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेला आवरण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तर कडक नियम केलेच आहेत. शिवाय आता राज्य पातळीवरसुद्धा मोठे निर्णय घेतले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कोरोनाची परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक, जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आणि राज्य टास्क फोर्सचे सदस्य, वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिष्ठाता यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हे वाचा - सावधान! येत्या दिवसांत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढणार; टास्क फोर्सचा इशारा मुख्यमंत्र्यांनी जिल्हा आणि विभागनिहाय आढावा घेतला. नागरिकांच्या बेजबाबदारपणाबाबतही सरकारने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच कडक निर्बंध लावले जाणार आहेत. जिथं परिस्थिती अती गंभीर आहे, तिथं कर्फ्यू लावण्याचाही सरकारचा विचार आहे. उद्या दुपारपर्यंत राज्यातील कोरोनासंबंधी नवीन नियमावली जारी केली जाणार आहे. राज्यातील सर्वाधिक प्रकरणं मुंबई, पुणे, ठाणे नागपुरात आहेत. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबईत आता रात्रीची संचारबंदी लागू होणार की नाही, याबाबत निर्णय मुख्यमंत्र्यांच्याच हातात आहे. परिस्थिती लक्षात घेत मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेणार आहेत. हे वाचा - या गावात आजपर्यंत आढळला नाही एकही कोरोना रुग्ण, सर्वांनी आदर्श घ्यावा अशी शिस्त तर पुण्यामध्ये लॉकडाऊन होणार की नाही याबाबत 2 एप्रिलला बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली. ‘लॉकडाऊन करण्याची अजिबात इच्छा नाही मात्र दुसरी लाट थांबवायची तर कठोर निर्णय घ्यावा लागेल असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे’, असंही अजित पवार म्हणाले. पुढच्या शुक्रवारी लॉकडाऊन लागू करायचा की नाही याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. पुण्यातील कोरोना आढावा बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. हे वाचा - या देशात क्वारंटाईन नियमात शिथिलता; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कोरोनाव्हायरचं थैमान (Coronavirus peak in maharashtra) महाराष्ट्राने अनुभवलं होतं. दररोज हादरवणारे आकडे आणि मृत्यूंचं थैमान महाराष्ट्र पाहात होता. त्यानंतर हळूहळी दररोज नव्याने सापडणाऱ्या कोरोनारुग्णांचा आकडा (Covid-19 Maharashtra) कमी कमी होत गेला. कोरोनावर मात केल्याच्या बातम्याही झाल्या आणि आता मात्र फेब्रुवारीपासून कोरोनारुग्णांच्या आकड्यांचा आलेख पुन्हा झराझर वर चढतो आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.