मुंबई, 26 मार्च : राज्यात (Coronavirus in maharashtra) गुरुवारी 35,952 इतक्या नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 111 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यंतची ही सर्वात उच्चांक रुग्णसंख्या आहे. राज्यात अनेक कठोर निर्बंध घालण्यात आले आहेत, तरी कोरोनाची परिस्थिती काही नियंत्रणात येत नाही आहे. कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत. दरम्यान पुढील काही दिवसांत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढणार आहे, असा इशारा राज्यातील कोव्हिड 19 टास्क फोर्सने (Covid 19 task force) दिला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे आणि कोरोनाचा नवा स्ट्रेनही आहे, जो जास्त संसर्गजन्य आहे आणि रोगप्रतिकारक प्रणालाही चकवा देतो आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण वाढत असावेत, असं या टास्क फोर्सने सांगितलं आहे. पुढील काही दिवसांमध्ये कोरोनाची प्रकरणं भरपूर वाढणार आहेत करण टेस्टिंगचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे, असा इशारा कोव्हिड 19 टास्क फोर्सने दिला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आल्याने आता त्यावर नियंत्रण कसं ठेवायचं याचा प्लॅन दिला आहे. टास्क फोर्सने महासाथीला नियंत्रित करण्यासाठी आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी काही योजना आखल्या आहेत.
हे वाचा - Corona Breaking: '..तर 2 एप्रिलपासून पुण्यात लॉकडाऊन',अजित पवारांचे स्पष्ट संकेत
1) कोरोनासंबंधी नियमांची कायदेशीररित्या कडक अंमलबजावणी व्हावी.
2) टेस्ट, ट्रेस, ट्रिट आणि आयसोलेट यावर त्यांनी भर देण्यास सांगितलं आहे. तरुणांना घरात ठेवणं अशक्य आहे, त्यामुळे त्यांना एकतर क्वारंटाइन सेंटरमध्ये पाठवावं किंवा सक्तीचं होम क्वारंटाइन करावं.
3) एखादा कोरोना रुग्ण सापडल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या किमान 30 व्यक्तींचा 24 तासांत शोध घ्यावा.
4) कामाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव करावा. रस्त्याच्या एका कोपऱ्यात उभं राहून गप्पा मारणं, सकाळी आणि संध्याकाळी चालायला जाणं हे सर्व बंद करावं.
5) सध्या फक्त 50 टक्के कर्मचाऱ्यांसह ऑफिस सुरू करण्यास परवानगी आहे. उरलेलल्या 50 टक्के कर्मचाऱ्यांनी घरूनच काम करावं.
हे वाचा - कोरोनाची दुसरी लाट! देशातील रुग्णसंख्येत मोठी वाढ, राज्यातील परिस्थिती चिंताजनक
6) जर एखाद्या व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षण दिसत असतील, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये तर चाचणी करून घ्यावी.
7) लसीकरण मोठ्या प्रमाणात वाढवायला हवं. 18 ते 45 वयोगटातील लोक सुपरस्प्रेडर आहेत त्यामुळे त्यांचं लसीकरण व्हायला हवं. पण सरकारी पातळीवरच याला मर्यादा घालण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Covid19