नवी दिल्ली 26 मार्च : संपूर्ण जगाला कोरोना संसर्गानं (Corona Virus) ग्रासलं आहे. मात्र, मध्य कोलंबियातील बोयासा राज्यातली कँपोहेरमोसो काउंटीमध्ये मात्र अजूनपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही (No Corona Cases in Village). या 3000 लोकवस्तीच्या गावात रुग्ण सापडला नाही याचं मुख्य कारण आहे इथल्या लोकांनी पाळलेली शिस्त आणि त्यांचा जागरुकपणा. मध्य कोलंबियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कँपोहेरमोसो ही काउंटी शेतं आणि लहानलहान खेड्यांनी वेढलेली आहे. संपूर्ण देशात दोन काउंटीमध्ये कोविडचा एकही रुग्ण आढळलेला नाही त्यापैकी ही एक काउंटी. दुसऱ्या काउंटीचं नाव आहे सॅन जुआनिटो. संपूर्ण कोलंबियात 1100 काउंटी आहेत. कँपोहेरमोसोमधल्या हार्डवेअर दुकानाचा मालक नेल्सन अविला म्हणाले,‘माझ्या दुकानात कुणीही आलं तर मी त्यांना पहिल्यांदा तोंडाला मास्क लावायला सांगतो. त्यानंतर हात धुवायला सांगतो मग त्यांनी दिलेल्या नाण्यांवर पैशांवर अल्कोहोल शिंपडतो आणि मग मी जे बिल देतो ते पण अल्कोहोल शिंपडूनच देतो.’49 वर्षांचे नेल्सन कोविडबाबत पाळण्याच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करतात. ते म्हणतात,‘या बिलांवरही विषाणू असू शकतो. त्यामुळे मी सगळ्या गोष्टी सॅनिटाइज करून घेतो. हा विषाणू हाताने केलेल्या देवाण घेवाणीतूनही पसरू शकतो. त्यामुळे काळजी घ्यायलाच हवी.’ या काउंटीतला सामान्य दुकानदार इतका जागरूक कसा? असं वाटेल पण त्यासाठी प्रशासनानी खूप प्रयत्न केले आहेत. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर याबाबत सतत अभियानं राबवून प्रशासन त्यांना जागरूक करतं. हे गाव पर्वतांनी वेढलेलं आहे त्यामुळे ते महत्त्वाच्या मोठ्या वाहतुकीच्या रस्त्यांपासून खूप दूर आहे. गावात इनमिन सात रस्ते आणि सहा चौक आहेत. हिरवळीने नटलेल्या एका 3300 फूट खोल दरीच्या पायथ्याशी ही काउंटी वसली आहे. बोयाका स्टेटचे आरोग्य सचिव माउरिसियो सँटोयो म्हणाले,‘कँपोहेरमोसोची लोकसंख्या खूपच कमी आहे आणि त्याचा मोठ्या शहरांशी संपर्क खूप कमी येतो.कोलंबियाची लोकसंख्या 5 कोटी असून त्यापैकी 23 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे.’ कँपोहेरमोसोचे महापौर जॅमी रॉड्रिगेझ म्हणाले,‘आमच्या शहरापासून कोरोना विषाणूला दूर ठेवण्यासाठी लोकांना समजावून सांगणं खूप कठीण काम होतं. गावातल्या पथदिव्यांना लावलेल्या स्पीकर्सवरून आम्ही दिवसात तीनवेळा कोरोना विषाणूला दूर ठेवणं आणि घ्यायची काळजी याचे संदेश देतो. आम्ही काउंटीच्या ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना 1000 रेडिओ सेट वाटले असून विविध रेडिओ कार्यक्रमांच्या माध्यमातून सतत जनजागृती करतो. पोलीस, आरोग्य कर्मचारी, चर्चचे लोक माझ्या ऑफिसातली माणसं सगळ्यांनी कार्यक्रमांत भाग घेतला आहे. सगळे एकजूट झाले आहेत.’ ते म्हणाले,‘मी जनतेला मेसेज दिला की हा संसर्ग रोखणं ही प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी आहे.’ त्यांनी स्वत:कोविड टेस्ट केली आणि टेस्ट निगेटिव्ह असतानाही घरात क्वारंटाईन होऊन शहरातील नागरिकांपुढे आदर्श निर्माण केला. त्यांनी शहरातल्या 60 कुटुंबांना कोरोना सदृश्य लक्षणं दिसल्यामुळे क्वारंटाईन केलं होतं पण त्यांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या. कँपोहेरमोसोमध्ये व्यवसाय सुरू आहेत पण गिऱ्हाईक मास्क लावूनच खरेदीला येतं. उर्वरित देशातून येणाऱ्या लोकांना इथं बंदी नाही पण आल्यावर आपल्या नातेवाईकाच्या घरी क्वारंटाईन व्हावंच लागतं. त्या व्यक्तीला दररोज स्थानिक नर्स फोन करून त्याची चौकशी करते. शहरातली एकमेव शाळा बंद नाही तिथं निम्मी मुलं एक दिवसाआड शाळेत येतात आणि उरलेली निम्मी दुसऱ्या दिवशी. या शहरात बहुतेक जण रोमन कॅथोलिक पंथातील आहेत त्यांचे फादर कॅमिलो मॉनरॉय म्हणाले,‘आम्ही रॉच यांना आमचा संरक्षक मानतो आणि तेच रुग्णांचं रक्षण करतात. आम्ही त्यांची प्रार्थना करतो. मी रेडिओवर जाऊनही लोकांना कोविडपासून बचावासाठीचे उपाय करायला सांगितलं आहे.’कँपोहेरमोसोमध्ये आतापर्यंत 80 ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली आहे. आता कोलंबियातलं केंद्र सरकार कोरोनाचे पुढचे डोस कधी पाठवतं याची वाट ही कोरोनाने बाधित न झालेली काउंटी पाहत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.