मुंबई 07 मार्च : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला आता 100 दिवस पूर्ण होत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत महाराष्ट्रात भाजपला धक्का देत सरकार स्थापन केलं. सरकारच्या शंभर दिवसानिमित्त शिवसेनेने सरकारची कामगिरी सांगण्यासाठी एक नवा व्हिडीओ प्रसिद्ध केलाय. त्यात सरकारच्या कामगिरीची झलक दाखविण्यात आलीय. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रातल्या मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांबद्दल जे गौरवोद्गार काढले तेही दाखविण्यात आलंय. इंग्रजी आणि मराठीत सबटायटल असलेला हा व्हिडीओ आता व्हायरल झालाय. सरकारने केलेल्या कामाची जंत्री दाखवत पिक्चर अभी बाकी है! असा संदेशही शिवसेनेने दिला आहे. शिवसेना नेते अनेकदा यह तो केवल झांकी है, पिक्चर अभी बाकी है! असं म्हणत असतात. त्याचाच वापर करत सरकारने 100 दिवसांमध्ये खूप कामं केलीत असं यात दाखविण्यात आलीय. शेतकऱ्यांची कर्जमाफी, 10 रुपयांमध्ये शिवथाळी, उद्योगांना मदत अशा अनेक गोष्टी यात दाखविण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ उद्योगपतींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गारही दाखविण्यात आलेत. यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेत्यांनाही दाखविण्यात आलं आहे. मुख्यमंत्री ठाकरे अयोध्येत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज अयोध्येत जाणार आहेत. महाविकास आघाडीला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ठाकरे हे सहकुटूंब रामलल्लाचं दर्शन घेणार आहे. दोन महिन्यांपूर्वीच खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्याची घोषणा केली होती. या आधीही दोन वेळा ठाकरे हे अयोध्येत गेले होतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी त्यांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती बदलली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सरकार स्थापन केलं. यामुळे उद्धव ठाकरे यांच्या या अयोध्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्षं लागलंय. आधीच्या दौन दौऱ्यांमध्ये त्यांच्यासोबत शिवसेनेचे आमदार आणि खासदार होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने त्यांच्या दौऱ्यावर टीकाही केली होती. आता मात्र हे दोनही पक्ष शिवसेनेचे मित्र झाले आहेत. त्यामुळे त्यांनी या दौऱ्यावर टीका केलेली नाही. उलट काँग्रेसचे एक दिग्गज नेते आणि मंत्री या दौऱ्यात सहभागी झालेत. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार हेही या दौऱ्यात सहभागी असून ते अयोध्येत दाखलही झाले आहेत.
राम हा सगळ्यांचा असून भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक एकतेचं प्रतिक आहे. त्यामुळे अयोध्येत येवून प्रभूरामाचं दर्शन घेण्यात काहीही वावगं नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसने आपली धर्मनिरपेक्ष अशी प्रतिमा जपण्यासाठी कायम राम मंदिराच्या प्रश्नावर वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे केदार यांच्या अयोध्या दौऱ्याला वेगळं महत्त्व प्राप्त झालंय. हे वाचा…

)







