'मुख्यमंत्रिपद हे उद्धव ठाकरेंचं काम नाही', चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

'मुख्यमंत्रिपद हे उद्धव ठाकरेंचं काम नाही', चंद्रकांत पाटील यांची घणाघाती टीका

चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर विखारी टीका केली असली तरी एका गोष्टीसाठी शिवसेनेचे आभारही मानले आहेत.

  • Share this:

मुंबई, 07 मार्च : विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपने सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक वेगळाच सल्ला दिला आहे.

'मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंचं कामच नाही. कारण त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, एकदा आमदार, दोनदा आमदार असं करत करत सर्व शिकावं लागतं. सर्व छक्के-पंजे शिकावे लागतात. पण उद्धव ठाकरे सरळ आहेत, प्रेमळ आहेत. पण सरकार चालवण्याचं कौशल्य त्यांनी मिळवलंय असं वाटत नाही. ते कोणतेही उत्तर परिपूर्ण देत नाहीत,' असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.

'सुभाष देसाई किंवा एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला हवं होतं'

'मुख्यमंत्रिपद हा उद्धव ठाकरेंचा रोल नाही. त्यांनी संघटना सांभाळावी आणि मुख्यमंत्रिपद हे वर्षानुवर्ष जे आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत अशा कोणाला तरी द्यायला हवं होतं. म्हणजे सुभाष देसाई, एकनाथ शिंदे अशी नावे आहेत,' असं चंद्रकांत पाटील म्हणाले. तसंच जेव्हा तुम्ही शिकत शिकत वर जात नाही तेव्हा तुमच्या करिअरला फटका बसतो, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना टोला लगावला.

'मुंबईत हिंदू आणि मराठी माणूस शिवसेनेमुळे'

चंद्रकांत पाटील यांनी एकीकडे उद्धव ठाकरे यांच्यावर मुख्यमंत्रिपदावरून टीका केली असली तरीही त्यांच्याबद्दल प्रेम कायम असल्याचंही म्हटलं आहे. तसंच त्यांनी आपल्या बालपणाचा एक किस्साही सांगितला आहे.

'मी लहान असताना मुंबईत राहात असे. मी ज्या परिसरात राहात होतो तिथे मुस्लीम समाजाचं प्राबल्य होतं. तेव्हा शिवसेनेत असलेले छगन भुजबळ हे आमच्या भागाचे नगरसवेक होते. मुंबईत कधी हिंदु-मुस्लीम तणाव निर्माण झाला तर ते आम्हाला त्यांच्या वाडीत नेत असत,' अशी आठवण सांगत चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत हिंदू आणि मराठी माणूस शिवसेनेमुळे असल्याचंही म्हटलं आहे. तसंच याबद्दल मी नेहमीच शिवसेनेच्या ऋणात आहे, असंही ते म्हणाले.

First published: March 7, 2020, 7:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading