मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /VIDEO : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले 'एकनाथ', स्वखर्चानं करणार उपचार

VIDEO : रस्ते अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांच्या मदतीसाठी धावले 'एकनाथ', स्वखर्चानं करणार उपचार

रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांवर स्वखर्चानं उपचार करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली आहे.

मुंबई, 7 जुलै : सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.

मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ बुधवारी एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीक अप जीप घुसून झालेल्या या अपघातात 14 वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज सिव्हिल आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन लावून या वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे.

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

मुख्यमंत्र्यांची धडाकेबाज कामगिरी, ठाण्याला वेगळं धरण, 900 खाट्याचं नवं सिव्हील हॉस्पिटल, मोठ्या घोषणा

वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी

आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी बांधवांच्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे. त्याबाबतही सर्व यंत्रणाना निर्देश द्या. त्या वाहनांना स्टिकर्स देण्यात यावेत. गणेशोत्सवात ज्याप्रमाणे आपण व्यवस्था करतो, त्याप्रमाणे या वाहनांची नोंद करून या वाहनांना टोल माफ करण्यात यावी. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची पंढरपूर वारी यात्रेसाठी समन्वयक म्हणून नियुक्ती करा, असे निर्देश मुख्यमंंत्र्यांनी दिले आहेत. 

First published:

Tags: Eknath Shinde, Wari