मुंबई, 17 जून : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांच्या ताफ्याच्या अपघाताची बातमी समोर आली होती. राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर असताना ते पुण्याहून औरंगाबादच्या दिशेला निघाले होते. त्यावेळी गाड्यांचा वेग जास्त होता. आणि अचानक पुढच्या गाड्यांनी ब्रेक घेतल्याने मोठा अपघात झाला होता. या अपघातात अनेक गाड्यांचं नुकसान झालं होतं. पण सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. मोठमोठे नेते आणि मंत्र्यांचा ताफ्याचा वेग हा जास्त असतो. त्यामुळे असा ताफा ज्या परिसरातून जातो त्या परिसरात पोलिसांकडून सर्व खबरदारी घेतली जाते. पण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याच सुरक्षेत पोलिसांकडून मोठी चूक झाल्याचं समोर आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर (Raj Bhawan) गेले होते. तिथून परतत असताना धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. पण मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामधील गाड्यांचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. नेमकं काय घडलं? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुरक्षा कवच भेदून एका व्यक्तीने त्याची कार थेट मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसवली. या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कार समोरच त्याची कार घुसवल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारच्या सुरक्षा व्यवस्थेत अनोळखी कार घुसूनही कार मालकावर मुंबई पोलिसांची कोणतीही कारवाई का केली नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. मुंबई पोलिसांच्या निष्क्रियतेवर, आणि पोलिसांच्या दूहेरी भूमिकेवर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय. ( राज्यात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ जिल्ह्यात 20, 21 ला ऑरेंज अलर्ट ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा राजभवन येथून ‘वर्षा’ निवास्थानी जात असताना एका व्यक्तीने त्याची कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रोटोकॉल तोडून आतमध्ये घुसवली. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारचा ताफा अचनाक तात्काळ थांबवावा लागला. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी असणाऱ्या कोणत्याही पोलिसांनी या व्यक्तीची कार अडवली नाही. किंवा त्याला जाबही विचारला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सुरक्षा तोडणाऱ्या व्यक्तीला ताब्यात न घेता त्याची कोणतीही चौकशी न करता पोलिसांनी कसे काय सोडले? असा प्रश्न उपस्थित होतोय.
VIDEO : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात अनोळखी कार घुसली #CMUddhavThackeray #Mumbai pic.twitter.com/XBV849zNmp
— News18Lokmat (@News18lokmat) June 17, 2022
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था आहे. असं असतानाही पोलिसांनी कोणतीही कारवाई त्या घुसखोर कार मालकावर केली नाही. मुंबई पोलिसांच्या या दूहेरी न्यायामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्तं केलं जातंय. याच ठिकाणी एखाद्या सर्वसामान्य नागरिकाची कार असती तर मुंबई पोलिसांनी अशीच भूमीका निभावली असती का? मुंबई पोलिसांच्या या निष्क्रियतेमुळे त्यांच्या जबाबदारीवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.