मुंबई, 05 मार्च : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja chavan case) शिवसेनेचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. नैतिक दबाव वाढत गेल्याने अखेर राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. तर अजित पवार यांनी वीज बिलाच्या मुद्यापासून प्रत्येक मुद्दा हायजॅक करून भाजपला बॅकफूटवर पाठवले. पूजा चव्हाण हिच्या मृत्यूनंतर संजय राठोड यांचं नाव दबक्या आवाजात घेतलं जात होत पण हा मुद्दा समाजमाध्यमात अधिक प्रसारित होताच भाजपने यात प्रत्यक्ष पणे उडी घेतली. आधीच आदित्य ठाकरे आणि धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात आघाडी सरकार पोळून निघाली. त्यात संजय राठोड प्रकरणात तर पार अब्रू गेली. विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधी पक्षाच आक्रमक होण्याच एकमेव हत्यार देखील सरकारने काढून घेतला. राठोड यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी उपस्थित केलेले वीज माफीचा मुद्दाच अजित पवार यांनी हायजॅक केला. संपूर्ण राज्यात भाजपला जनतेत जाण्याची संधीही अजित पवार यांनी हिरावून नेली अन् विरोधी पक्षाला हात चोळत बसावे लागले. महिला अत्याचार आणि कोविडच्या विषयाला विरोधकांना धार देताच आली नाही. अशा परिस्थितीत चवीचा संजय राठोड यांचा मुद्दा पुन्हा काढण्यात आला, संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल यांच्याकडे का पाठवला नाही? याविषयी भाजपने प्रश्न उपस्थित केला. गेले दोन दिवस सत्तारूढ पक्षाने व्यापलेल्या प्रसार माध्यमांमध्ये विरोधकांना पुन्हा जागा मिळाली. अधिवेशन संपल्यानंतर हा राजीनामा मागे घेतला जाईल हा मुद्दा जनतेला ही अपील झाला. राजीनामा देण्यात तांत्रिक बाब होती का? विरोधकांनी मुख्य मुद्दे बाजूला ठेवावं या हेतूने राजीनामा प्रलंबित राहिला असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ शकतात. पण राजीनामा देण्यापेक्षा तो राज्यपाल यांच्याकडे न पाठवणे , किंवा तो परत घेणार याविषयीची अफवा सरकारच्या प्ररिमेला अधिक तडा देऊन गेली. ही गोष्ट सहकारी पक्षालाही पचणारी नव्हती. आणि हाच मुद्दा पुढे रेटला तर जनेतेच्या प्रश्नांचं काय? आता पुढे काय करावं? यावर विरोधकही सभ्रमात होते. अशा परिस्थितीत राजभवन येथे संजय राठोड यांचा राजीनामा पोहचला याची बातमी विधानभवनात येऊन धडकली. सत्तारूढ शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांचा जीव भांड्यात पडला आणि भाजपला अपूर्ण वाटणारा विजय पूर्ण झाल्याची खात्री पटली. सर्वांच्या चेहऱ्यावर एकच भाव होते.. हुश्श सुटलो एकदाचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.