मुंबई, 24 मे : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या (OBC political Reservation) मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर (Maha Vikas Aghadi Government) सडकून टीका केली. "ठाकरे सरकार (Thackeray Government) हे ओबीसी आरक्षणाचं हत्यारं आहे. ओबीसी आरक्षण गेलं ते या सरकारचं पाप आहे", असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच "ओबीसी हा भाजपचा डीएनए (DNA) आहे. त्यामुळे जोपर्यंत ओबीसींना त्यांच्या हक्काचं राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भाजप लढा देईल. एल्गार पुकारला जाईल", अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
"ओबीसींचं आरक्षण गेलं ते या सरकारचं पाप आहे. याचं कारण हे आहे की, एक वर्षाआधी ही सगळी परिस्थिती महाराष्ट्र करु शकला असता जे आज मध्यप्रदेश सरकारने केली आहे. पण यांच्या मनात पाप आहे. हे सरकार ओबीसी आरक्षणाचे हत्यारे आहे. मला कधीकधी आश्चर्य वाटतं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले फडणवीस मुख्यमंत्री असतानाच ओबीसींचं आरक्षण गेल्याचं बोलतात. अरे आम्ही पन्नास टक्क्यांच्या वरचंही आरक्षण सांभाळून ठेवलं होतं", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"13 डिसेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल टेस्ट सांगितलं होतं. पण 13 डिसेंबर 2019 ते 4 मार्च 2021 पर्यंत राज्य सरकारने फक्त टाईमपास केला. आठवेळा तारखा घेतला. त्यामुळे रागाने सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात लिहून ठेवलं आहे की, सरकारला काही करायचंच नाहीय. त्यामुळे त्यांनी ओबीसी आरक्षण स्थगित केलं", असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
"मध्यप्रदेशच्या निर्णयाचा अभ्यास करा. सर्वोच्च न्यायालयाला दिलेला रिपोर्ट हा व्हयालिडेट झाला नाही. मी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवाराज सिंग यांच्यासोबत बोललो. त्यांनी सांगितले डेटाबेसेस दिला. आठ दिवसांत त्यांनी रिपोर्ट दिले. मंत्री भाषण करताय. पण डेटा गोळा करण्यात लक्ष दिले नाही", अशी खंत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
देवेंद्र फडणवीस आणखी काय म्हणाले?
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ भारताच्या नवनिर्मितचा आहे. राजकारणात अलीकडे बोलघेवड्या नेत्यांची कमी नाही. पण मोदी जे जे बोलले ते त्यांनी करुन दाखवले. मोदींवर टीका केली तरी ते थांबले नाहीत. समर्थ समृद्ध भारत करण्यासाठी, बहुजन शक्तिशाली करण्यासाठी मोदींनी काम केले. सर्वसामान्य गरीब जनतेसाठी कल्याणाचा अजेंडा डोळ्यांसमोर ठेवून मोदींनी काम केले", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"माझं कुटुंब, माझी जबाबदारी यापुरता मोदीजी सिमीत नाहीत. ते संपूर्ण देशाला, भारताला परिवार समजतात. आपण बारा-तेरा वर्षांआधी आयात भरपूर करायचो. पण निर्यात करण्याची आपली ताकद नव्हती. चार बिलियन डॉलरची निर्यात आपण करत होतो. यावर्षी आपण 83 बिलियन डॉलरचा माल निर्यात करतो. ही केवढीमोठी उडी आहे. निर्यात होतं म्हणजे उत्पादन होते. निर्मिती होते. त्यातून रोजगार निर्माण होतो. रोजगार निर्माण होतो म्हणजे सामान्य माणसाच्या हाताला काम मिळतं. त्यामुळे ही काही हवेत झालेली निर्यात नाहीय. या देशामध्ये एक इको सिस्टिम तयार झाली. त्यामुळे सामान्य माणसाच्या हाताला काम लागलं आणि देशामध्येही समृद्धी आणली. जगाच्या पाठीवर आज कोरोनानंतर आणि रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर आज मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. त्यातून आज जगभरात वस्तूंचे मोठ्या प्रमाणात भाव वाढत आहेत. युरोपातील देशांमध्ये भाववाढ हा विषय माहिती नव्हती. पण आज त्या देशांमध्ये भाववाढीची चर्चा आहे. तरीही या प्रश्नावर ठोस उपाययोजना करणारा कुठला देश असेल तर तो भारत देश आहे", असंदेखील ते म्हणाले.
"रशियाकडून कमी किमतीत क्रुड ॲाईल आपण घेतोय. मोदींनी 2 वेळा पेट्रोल-डिझेल भाव कमी केले. यामुळे 2 लाख 20 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. तरीही सर्वसामान्य लोकांना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. केंद्राने 10 रूपये टॅक्स कमी केले. एक रूपया टॅक्स राज्य सरकारने केले. म्हणजे अनयसे पडो आणि नमस्कार घडो. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय की केंद्र सरकारचे 19 आणि राज्य सरकार 29 रूपये टॅक्स घेत आहे. मग हे सरकार रोज केंद्राकडे बोट दाखवते. म्हणते महागाई वाढली", अशी टीका फडणवीसांनी केली.
"मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यातील फरक तुम्हाला दिसतोय. भाजपची ताकद वाढली आहे. आमची व्यवस्था सर्वसामान्य माणसाला मदत करते. लोकांना समर्थ करते. देशात कोणताही पक्ष नाही. काही पक्षांच्या चिंतन बैठका म्हणजे ॲापरेशन यशस्वी पेश्नट डेड असे आहे. तो परिवारवादी पक्ष सर्वसामान्य जनतेला दिलासा देणार नाही", अशी टीका फडणवीसांनी काँग्रेसवर केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Devendra Fadnavis, Maharashtra politics, State government