नवी दिल्ली, 16 डिसेंबर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022पासून 'भारत जोडो' यात्रेला सुरुवात केली. देशातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनाचा ठाव घेण्याच्या उद्देशानं राहुल गांधींनी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत पायी प्रवास करण्याचा निर्णय घेतला. राहुल हा प्रवास पूर्ण करू शकतील की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला होता; मात्र आज (16 डिसेंबर) राहुल यांच्या पदयात्रेला 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला आहे. या प्रवासाने 2024च्या निवडणुकीसाठी राहुल गांधींकरिता भक्कम पायाभरणी केल्याची चर्चा आहे. या यात्रेतल्या अनेक लहान-मोठ्या घडामोडींचा आढावा घेऊ या. 'आज तक'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
काँग्रेसच्या मते, ही यात्रा भारताची एकता, सांस्कृतिक विविधता आणि भारतातीयांच्या अविश्वसनीय संयमाचा उत्सव आहे. या संयमाचा खरा परिणाम काँग्रेसला 2024मध्ये पहायचा आहे. कन्याकुमारीतून निघालेला राहुल यांचा ताफा सातत्याने वाढत आहे. लेखक, अभिनेते, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ, कार्यकर्ते अशा सर्व स्तरांतली माणसं या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत. या यात्रेत सहभागी होणाऱ्यांचा कॅनव्हास एवढा मोठा आहे, की त्यातूनच एक संदेश लोकांपर्यंत जात आहे. देशातला एक मोठा वर्ग राहुल यांचं नेतृत्व स्वीकारण्यास तयार आहे, असा संदेश यातून मिळत आहे.
हे ही वाचा : भाजप नेत्याच्या वाढदिवसाला कार्यकर्ते झाले बेभान, पोलिसांनी केला लाठीचार्ज तर स्टेशनवरच काढला मोर्चा
2800 किमी प्रवास
गेल्या 100 दिवसांत राहुल यांनी तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण, महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान अशा 8 राज्यांच्या 42 जिल्ह्यांमधून प्रवास करून 2800 किलोमीटर्स अंतर पार केलं आहे. हे सहज शक्य झालेलं नाही. त्यामागे अफाट कष्ट घेतलेले आहेत. 7 सप्टेंबरला कन्याकुमारीतल्या उष्ण वातावरणातून राहुल यांनी प्रवास सुरू केला. तेव्हापासून आतापर्यंत वेगवेगळ्या राजकीय आणि भौगोलिक वातावरणातून त्यांनी प्रवास केला. या 100 दिवसांत राहुल यांनी हवामानाशी जुळवून घेऊन फिटनेस तर राखलाच, शिवाय राजकीय वारं काँग्रेसच्या बाजूनं वळवण्यात यश मिळवल्याचं बोललं जातं.
40 हजारांचा टी-शर्ट
या यात्रेच्या पहिल्या दिवसापासून राहुल गांधींनी टी-शर्ट घातला आहे. चालताना, पळताना आणि माणसांना भेटताना टी-शर्ट हा त्यांच्यासाठी सर्वांत सोपा पर्याय ठरला. आतापर्यंतच्या प्रवासात वातावरण आणि राहुल यांचा चेहराही बदलला; पण टी-शर्ट कायम राहिला. राहुल यांनी बर्बेरीचा टी-शर्ट घातला असून, त्याची किंमत 41 हजार 257 रुपये असल्याचा आरोप यात्रेच्या सुरुवातीला भाजपने केला होता. काँग्रेसने या आरोपाला सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं. "अरे... घाबरलात का? भारत जोडो यात्रेत सहभागी झालेला प्रचंड जनसमुदाय पाहून. मुद्द्यावर बोला... बेरोजगारी आणि महागाईवर बोला. बाकी कपड्यांबद्दल चर्चा करायची झाली, तर ही चर्चा मोदीजींचा 10 लाखांचा सूट आणि 1.5 लाखांच्या चष्म्यापर्यंत जाईल. बोला करायची का चर्चा?" असं ट्विट काँग्रेसनं केलं होतं.
कंटेनरवर प्रश्नचिन्ह
राहुल गांधी दिवसा चालतात आणि रात्री एका कंटेनरमध्ये आराम करतात. इतर सदस्यही कंटेनरमध्ये विश्रांती घेतात. या कंटेनरमध्ये व्हीव्हीआयपी सुविधा असल्याचा भाजपचा आरोप आहे. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितलं, की 'यात्रेत सहभागी असलेल्यांच्या रात्रीच्या विश्रांतीसाठी तयार करण्यात आलेल्या कंटेनरमध्ये माफक सोयीसुविधा आहेत. राहुल यांची बदनामी करण्यासाठी खोटी माहिती पसरवली जात आहे. राहुल ज्यात राहतात त्यात एक बेड आहे. दोन बेडचा कंटेनर हा रेल्वेच्या स्लीपर क्लासच्या डब्यासारखा आहे. भाजपच्या प्रवक्त्यांनी स्वत: येऊन हा कंटेनर पाहावा.'
संघाची जळणारी चड्डी
भारत जोडो यात्रेदरम्यान काँग्रेसच्या ट्विटर हँडलवर आरएसएसची चड्डी जाळल्याचा फोटो पोस्ट केल्याने एक वाद निर्माण झाला होता. 'देशाला द्वेषाच्या बंधनातून मुक्त करण्यासाठी आणि भाजप-आरएसएसकडून होणारं नुकसान संपवण्यासाठी... आम्ही टप्प्याटप्प्याने आमचं ध्येय गाठू,' अशा कॅप्शनसह हा फोटो पोस्ट करण्यात आला होता. या विधानाला संघाने कडाडून विरोध केला. 'राहुल यांचे वडील आणि आजोबा संघाला तुच्छ लेखायचे. त्यांनी संघाला रोखण्यासाठी सर्वशक्तिनिशी प्रयत्न केले; पण संघ थांबला नाही, संघ सतत वाढत आहे,' अशा शब्दांमध्ये भाजपने उत्तर दिलं. भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या म्हणाले, की 'काँग्रेसने 1984मध्ये दिल्लीला आग लावली. 2002मध्ये गोध्रा येथे काँग्रेसच्या यंत्रणेने 59 कारसेवकांना जिवंत जाळलं.'
सावरकरांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात वाशिममध्ये असताना करताना राहुल एका सभेत म्हणाले, की 'भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांना जोरदार विरोध केला. ते त्यांच्यापुढे झुकले नाहीत. दुसरीकडे सावरकर इंग्रजांसमोर नतमस्तक झाले.' या वक्तव्यावरून गदारोळ निर्माण झाला. सध्या काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) नेते संजय राऊत यांनी जाहीर व्यासपीठावरून याबद्दल याबद्दल असहमती व्यक्त केली होती.
वादग्रस्त पाद्रीची भेट
कन्याकुमारी येथील मुत्तिदिचन पराई चर्चमध्ये राहुल गांधींनी वादग्रस्त पाद्री जॉर्ज पोन्नैया यांची भेट घेतली. राहुल यांनी पाद्रींना प्रश्न विचारला, की 'येशू ख्रिस्त हे देवाचं एक रूप आहे, हे बरोबर आहे का?" त्याच्या प्रश्नावर जॉर्ज म्हणाले, 'नाही, तोच खरा देव आहे.' राहुल यांच्या या विधानाचा हिंदू संघटनांनी तीव्र निषेध केला.
सद्दाम हुसेनच्या दाढीशी तुलना
सप्टेंबरमध्ये एकदम क्लीन शेवमध्ये दिसणाऱ्या राहुल गांधींचा चेहरा नोव्हेंबरपर्यंत दाढीने भरलेला होता. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा गुजरातमधल्या एका सभेत बोलताना म्हणाले, "राहुलजी तुमचा चेहरा महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारखा दिसायला पाहिजे होता; पण त्यात सद्दाम हुसेनची झलक दिसत आहे." या वक्तव्याचा काँग्रेसने तीव्र निषेध केला.
गुजरात आणि हिमाचलमध्ये प्रवेश नाही
राहुल यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान निवडणूक असलेल्या राज्यांमध्ये प्रवेश केला नाही. गुजरातमधलं राजकीय वातावरण कमालीचं तापलं होतं, तेव्हा राहुल गुजरातच्या अगदी जवळून गेले. संपूर्ण निवडणुकीदरम्यान त्यांनी गुजरातमध्ये पायही नाही ठेवला. राजकीय समीक्षक आणि विश्लेषकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेसने त्यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
कलाकारांचा प्रतिसाद
या यात्रेत अशांनी सहभाग घेतला ज्यांना सत्ताधारी पक्ष आणि इतर काही संघटना, तुकडे-तुकडे गँगचे सदस्य म्हणतात. भाजप नेते सुशील मोदी म्हणाले, की 'भारत आधीच जोडलेला आणि एकसंध आहे. काँग्रेसच तुकडे-तुकडे गँगच्या पाठीशी उभी आहे.' कन्हैया कुमार सुरुवातीपासूनच त्यांच्यासोबत फिरत आहे. याशिवाय स्वरा भास्कर, पूजा भट्ट, रिया सेन, रश्मी देसाई या अभिनेत्रीही या प्रवासात सहभागी झाल्या होत्या. ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर, सुशांत सिंग हेदेखील राहुल यांच्यासोबत पायी चालले.
रघुराम राजन यांची एंट्री
भारत जोडो यात्रेत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या उपस्थितीने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. राजन केवळ राहुल यांच्यासोबत फिरले नाही तर त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेबाबतही चर्चा केली. 'राजन यांची नियुक्ती काँग्रेसनंच केली होती. त्यामुळे त्यांच्या सहभागाबाबत आश्चर्य वाटायला नको,' असं भाजपने म्हटलं आहे. रघुराम राजन म्हणाले, 'पुढील वर्ष सरकारसाठी अधिक कठीण जाणार आहे. त्यांनी निम्न मध्यमवर्गीयांच्या समस्यांकडे लक्ष दिलं पाहिजे.'
दिल्लीमध्ये पक्षाची निराशाजनक कामगिरी
या यात्रेला आजपासून एक आठवड्याचा ब्रेक असेल आणि 24 डिसेंबर रोजी यात्रा दिल्लीत प्रवेश करेल. तिथे राहुल यांना एमसीडी निवडणुकीतल्या पक्षाच्या अपयशाचा सामना करावा लागेल. त्यानंतर ही यात्रा उत्तर प्रदेशमध्ये जाईल. भारत जोडो यात्रेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार बुलंदशहर हा यूपीतला एकमेव थांबा आहे. यानंतर पुढच्या प्रवासात हरियाणा, पंजाब आणि शेवटी जम्मू-काश्मीरचा उल्लेख आहे. 150 दिवसांत 12 राज्यांचा प्रवास करून 3570 किलोमीटरचे अंतर चालवचं पक्षाचं उद्दिष्ट आहे. यानुसार 737 किलोमीटरचा प्रवास अजून बाकी आहे.
राहुल गांधींच्या इमेजमध्ये बदल
हिमाचल प्रदेशातल्या विजयाने काँग्रेसने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे; पण गुजरात आणि दिल्लीतली आकडेवारी चिंतेत टाकणारी आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या या एकत्रीकरणामुळे पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. काँग्रेसला 2014पासून याची गरज होती. काँग्रेसला राहुल यांचा पॅन इंडिया कनेक्ट अनुभवायचा होता. निवडणुकीच्या धामधुमीपासून दूर राहून राहुल जनतेशी संपर्क प्रस्थापित करण्यात यशस्वी होताना दिसत आहेत. त्यांची प्रतिमाही बदलत आहे. राहुल गांधींना राजकारणात पाऊल टाकून जवळपास दोन दशकं झाली आहेत; पण 'भारत जोडो यात्रे'पर्यंत त्यांच्याकडे नेता म्हणून गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं. ग्राउंड लीडरऐवजी त्यांना हवाई नेता मानला जात असे. "माझी प्रतिमा खराब करण्यासाठी भाजपने कोट्यवधी रुपये खर्च केले. त्यांनी माझी वेगळी प्रतिमा निर्माण केली," असं राहुल गांधी यांचं म्हणणं आहे. गेल्या 100 दिवसांच्या प्रवासानंतर राहुल गांधी त्या ठिकाणी पोहोचताना दिसत आहेत, ज्यासाठी ते गेली 18 वर्षं संघर्ष करताना दिसत होते. राहुल स्वतःला गंभीर नेता म्हणून सिद्ध करताना दिसत आहेत.
काँग्रेसने ही यात्रा निवडणुकींशी जोडली नाही. केंद्राच्या धोरणांविरोधात जनजागृतीसाठी ही मोहीम असल्याचं पक्षाचं म्हणणं आहे. आपल्या देशाचं विभाजन करणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी लाखो जण या आंदोलनात सहभागी झाले आहेत, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. ही यात्रा बेरोजगारी, महागाई, द्वेष, विभाजनाचं राजकारण आणि राजकीय व्यवस्थेचे अति-केंद्रीकरण याविरुद्ध जनजागृतीचं कार्य करत आहे. काँग्रेसच्या रणनीतीकारांनी भारत जोडो यात्रेचा निवडणुकीशी संबंध न जोडण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. असं करून राहुल यांना या यात्रेमुळे निर्माण झालेल्या लोकप्रियतेचं थेट 2024 मध्ये भांडवल करायचं आहे.
याचा परिणाम कर्नाटकात स्पष्टपणे दिसून आला. तिथे सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार या दोन्ही गटांनी एकत्र काम केलं आणि तिथे राहुल गांधींचा दौरा यशस्वी झाला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेस हा महाराष्ट्रात लहान पक्ष ठरला आहे. तरीही राहुल गांधींच्या दौऱ्यात काँग्रेसचं संघटन मजबूत दिसलं. त्याचप्रमाणे राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मतभेद असतानाही त्यांनी भारत जोडो यात्रेत गर्दी जमवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
काँग्रेसचं संघटन किती मजबूत झालं आहे, याची खरी कसोटी पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये लागणार आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानसह एकूण 13 राज्यांत 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यापैकी दोन राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार असून, राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ताबदलाचा ट्रेंड आहे. राजस्थानमधली प्रथा बदलण्याचं आव्हान काँग्रेससमोर असेल. छत्तीसगडमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bharat Jodo Yatra, Congress, Rahul Gandhi (Politician)