जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / 'मेलेल्या जनावरासारखं पतीला फरफटत बाहेर काढलं'; 67 वर्षांच्या पत्नीने सांगितला भांडूपच्या आगीचा थरारक अनुभव

'मेलेल्या जनावरासारखं पतीला फरफटत बाहेर काढलं'; 67 वर्षांच्या पत्नीने सांगितला भांडूपच्या आगीचा थरारक अनुभव

'मेलेल्या जनावरासारखं पतीला फरफटत बाहेर काढलं'; 67 वर्षांच्या पत्नीने सांगितला भांडूपच्या आगीचा थरारक अनुभव

‘कोरोना झाल्यानं 78 वर्षांच्या माझ्या पतीला सनराइझ हॉस्पिटलला दाखल केलं होतं. रात्री 11 नंतर आमच्या प्रायव्हेट रूममध्ये धूर यायला लागला, त्या वेळी पतीला ऑक्सिजन लावलेला होता…’. भांडूपच्या आगीतून बचावलेल्या कुटुंबाचे थरारक अनुभव

  • -MIN READ
  • Last Updated :

    मुंबई, 27 मार्च: ‘त्या रात्रीचा भीतीदायक अनुभव मी कधीच विसरू शकणार नाही. हॉस्पिटलच्या त्या भयाण काळोख्या कॉरिडॉरमधून मला माझ्या पतीला एखाद्या मेलेल्या जनावराप्रमाणे ओढत आणावं लागलं होतं. जिवाच्या आकांताने मी त्यांच्यासह खाली उतरले म्हणून आमचा जीव वाचला….’  हे अंगावर काटा आणणारे शब्द आहेत 67 वर्षांच्या माधुरी गोधवानी यांचे. त्यांचे 78 वर्षीय पती चेतन गोधवानी मुंबईतल्या भांडुपमधल्या ड्रीम्स मॉल बिल्डिंगमधल्या (Dreams Mall fire bhandup) सनराइज हॉस्पिटलमध्ये (Sunrise Hospital) दाखल होते. दोन दिवसांपूर्वी तिथे लागलेल्या आगीमुळे त्यांना तिथून अशा पद्धतीने स्वतःची सुटका करून घ्यावी लागली होती. या आगीत 10 कोरोनाग्रस्तांचा जीव गेला. माधुरी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलेल्या थरारक अनुभवानुसार, त्यांच्या मदतीला त्या दिवशी रुग्णालयातलं कोणीच आलं नाही. माधुरी सांगतात, “त्या रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलमधल्या आमच्या प्रायव्हेट रूममध्ये अचानक धूर पसरला. कुठेतरी आग लागली असल्याचा अंदाज आला. आगीचा धुराने (Fire Broke Out) खोली भरून गेली तेव्हा चेतन गोधवानी - माझे 78 वर्षांचे पती ऑक्सिजन सपोर्टवर होते. स्वतःच्या पायावर चालत जाण्याचंच काय उठून बसायचंही त्राण त्यांच्यात नव्हतं.”  वॉर्ड बॉयने त्या दोघांनाही रूममधून चटकन बाहेर पडा असं सांगितलं आणि तो निघून गेला. खोलीत येणाऱ्या धुराचं प्रमाण वेगानं वाढत होतं आणि कोणी मदतीला येण्याची चिन्हंही दिसत नव्हती. त्यामुळे माधुरी यांनी धीर एकवटून पतीला ओढत बाहेर नेण्याचा विचार केला आणि तो अंमलात आणण्यावाचून त्यांच्यापुढे पर्यायही नव्हता.

    Pune Fire: लोकांचा जीवही वाचवला अन् आगही विझवली, पण घरी परतताना मृत्यूने गाठलं

     ‘दोन वयस्कर व्यक्तींना बाहेर पडण्यासाठी मदत करत असलेली एक तरुणी मला दिसली. मी माझ्या पतीला ओढत ओढत तिथपर्यंत नेलं आणि तिच्यामागून निघाले. मला वाटतं लिफ्ट बॅकअप पॉवरवर चालत होती. आम्ही पहिल्या मजल्यापर्यंत लिफ्टने आलो आणि त्यानंतर पायऱ्या उतरून खाली आलो,’ असं माधुरी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.

    पोलिस उपायुक्त प्रशांत कदम (Prashant Kadam) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास त्या हॉस्पिटलला लागलेल्या आगीत कोरोनाबाधित (Corona Patients) 10 रुग्णांचा आगीत मृत्यू झाला. मॉलच्या चार मजली इमारतीच्या सर्वांत वरच्या मजल्यावर कोरोनाबाधित रुग्णांसाठी हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं होतं. सुरुवातीला जेव्हा मृतांचा आकडा दोन होता, तेव्हा हॉस्पिटलने प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केलं,की आग लागली त्यापूर्वीच ते दोन रुग्ण कोरोनामुळे मरण पावले होते. आगीमुळे तोपर्यंत एकही मृत्यू झालेला नाही, असं हॉस्पिटलचं म्हणणं होतं. नंतर मृतांचा आकडा दहावर गेला. अजूनही उर्वरित आठ मृतांबद्दल हॉस्पिटलकडून अधिकृतरीत्या कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसंच, किती रुग्णांना आगीतून वाचवण्यात आणि त्यापैकी किती जण कोरोनाबाधित होते, याबद्दलही हॉस्पिटल आणि नागरी प्रशासनाकडूनही अद्याप माहिती दिली गेलेली नाही. 10 बळी घेणाऱ्या अग्नितांडवानंतरची भीषण दृश्य पाहून मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दुपारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलं. मृतांच्या कुटुंबीयांची त्यांनी माफी मागितली आणि मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली. ही आग नेमकी अशा वेळेस लागली, जेव्हा राज्यातल्या आणि मुंबईतल्या कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढत चालला आहे. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कंट्रोलरूमच्या सूत्रांनी सांगितलं. 30 बंब, 20 वॉटर टँकर्स आणि अँब्युलन्स घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तरीही आगं पूर्ण शमण्यासाठी 24 तास लागले. आगीतून वाचवण्यात आलेल्या रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मॉलमध्ये हॉस्पिटल चालत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. या हॉस्पिटलला 30 मार्चपर्यंत परवागनगी होती, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात