बेस्टचा 'बेस्ट' निर्णय: मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दीड महिन्यातच दिली नोकरी

बेस्टचा 'बेस्ट' निर्णय: मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना दीड महिन्यातच दिली नोकरी

आताही कर्मचारी संपावर जातील की शशांक राव संप न करण्याचं आवाहन करतील?

  • Share this:

मुंबई, 16 मे: कोविड-19 अर्थात कोरोनाबाधित मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अवघ्या दीड महिन्यात बेस्ट प्रशासनाने सेवेत दाखल करून घेतल्याची माहिती बेस्टचे व्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली आहे. कोविड-19 दरम्यान सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेच्या सर्व सुविधा पुरवण्याचे उपक्रमाचे प्रयत्न आहेत. अर्थात अशा उपाय योजना करुनही काही कर्मचाऱ्यांवर मृत्यू ओढवला. ही दुर्दैवी बाब आहे.

हेही वाचा..नरेंद्रभाई, आपको एक मेरी सलाह, असं म्हणत कवी मनाच्या नेत्यानं लिहिलं पत्र

कोविड-19 च्या कालावधीत बेस्ट उपक्रमाची सेवा बजावताना निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्य नातेवाईकांना बेस्ट उपक्रमाच्य सेवेत सामावून घेवून त्यांना कायमस्वरुपी आर्थिक आधार देण्यात येत आहे. आतापर्यत 4 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना उपक्रमाच्या सेवेत नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. उर्वरित व्यक्तींच्या नातेवाईकांना लवकरच उपक्रमाच्या सेवेत दाखल करून घेण्यात येईल, अशी माहिती सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिली आहे.

दरम्यान, आताही कर्मचारी संपावर जातील की शशांक राव संप न करण्याचं आवाहन करतील? अशी स्थिती निर्माण झाली आहे. शशांक राव यांनी आंदोलनाचा इशारा देण्याआधीच बेस्ट प्रशासनाने मृतांच्या वारसांना नोकरी देण्याचा निर्णय घेतला होता. आता अंमलबजावणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे, बेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांसाठी सोमवारपासून घरी थांबावं, असं आवाहन बेस्ट वर्कर्स युनियनने केलं आहे. त्यानंतर आता भाजपनंही यात उडी घेत बेस्टच्या कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठिंबा देत आंदोलनाचा इशारा दिला आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी 'बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जीवाच्या रक्षणाची हमी महापालिकेने घ्यायलाच हवी, त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा मानवतेच्या भावनेतून आम्हालाही त्यांच्या आंदोलनात उतरावं लागेल,' असं म्हटलं आहे. त्यामुळे या मागण्यांवरुन आता राजकारण सुरू झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हेही वाचा.. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युदरात घट

महापालिका शिवसेनेच्या ताब्यात असल्याने भाजपनेही या विषयात आपला रस दाखवला आहे. याआधी बेस्ट वर्कर्स युनियनच्या शशांक राव यांनी सोमवारपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी घरी थांबण्याचं आवाहन केलं. त्यावर कोरोनाचं संकट असताना केलेल्या या आवाहनावरुन त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

काय आहेत मागण्या?

-बेस्ट कर्मचारी करोनाबाधित झाल्यावर त्याचं आणि त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांचं विलगीकरण करण्यात यावं.

-प्रत्येक आगारात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असून प्रत्येक बेस्ट कामगारांची करोना चाचणी रोज करण्यात यावी.

-बेस्ट कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी राखीव व स्वतंत्र बसगाड्या सुरू कराव्यात.

-कोरोनाबाधित मात्र कोरोनाचे लक्षण नसलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष निर्माण करण्यात यावे आणि तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत.

- कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी कर्तव्यावर उपस्थित असलेले आणि कोरोनाबाधित होऊन मृत्यूमुखी पडलेले बेस्ट, पालिका व अन्य आस्थापनातील, पोलिस कर्मचारी यांना शहीद दर्जा देऊन इतर सर्व सवलती त्यांना देण्यात याव्यात.

First published: May 16, 2020, 4:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या