प्रमोद पाटील, प्रतिनिधी पनवेल, 04 मार्च : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मनसेनं ठाकरे गटाकडे बोट दाखवले आहे. पण, अशा चिल्लर लोकांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही,सुरक्षा मिळवण्यासाठी हा स्टंट केला असावा, आमचे स्वारस्य पक्ष वाढविण्यात आहे, असं म्हणत ठाकरे गटाच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी देशपांडेंना टोला लगावला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. मनसे नेत्यांनी ठाकरे गटावर आरोप केला आहे. त्यांच्या या आरोपाला वरुण सरदेसाई यांनी उत्तर दिले. (हा काय कॉमेडी शो आहे का? सुप्रिया सुळेंनी उडवली मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची खिल्ली) ‘अशा चिल्लर लोकांकडे लक्ष द्यायला आम्हाला वेळ नाही, सुरक्षा मिळवण्यासाठी हा स्टंट केला असावा. मुंबईचे पोलीस सक्षम आहेत, त्यांच्या परीने ते तपास करतील कुणी हल्ला केला. कशामुळे केला,का केला हे बाहेर येईल, असं सरदेसाई म्हणाले. कसबा पोटनिवडणुकीच्या निकालातून जनतेनं २८ वर्षांनंतर भाजपला नाकारलं. भाजपचा बालेकिल्ला होता, ज्यावेळी 25 आमदार निवडून यायचे तेव्हा कसबा निवडून यायची. त्यामुळे येणाऱ्या काळात जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी राहील, असा विश्वासही वरुणसरदेसाईंनी व्यक्त केला. (‘कसबा झाकी है…’ संजय राऊतांनी सांगितला 2024 च्या विजयी जागांचा आकडा!) ‘ज्यांना काय बोलायचं आहे त्यांना बोलु दे. त्यांच्यावर बोलण्या इतके ते काही मोठे नाहीत, असा टोलाही वरुण सरदेसाई यांनी नितेश राणेंना लगावला. देशपांडेंवर हल्ला प्रकरणी 2 जण ताब्यात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर मॉर्निग वॉकला गेले असता हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संदीप देशपांडे यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी तपास केला. अखेर या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. हे दोघे जण भांडुप पश्चिम भागातील रहिवासी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलीस इतर संशयितांचा शोध घेत आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांपैकी सोळंकी असे एका संशयिताचे नाव असून तो शिवसेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राजकीय वादातून हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे चौकशीत पोलिसांना समजले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.