मुंबई, 22 फेब्रुवारी : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस आली आहे. लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. त्यात लॉकडाऊनही शिथील करण्यात आलेला आहे. नागरिकांना काही सूट देण्यात आली आहे. त्यामुळे लोकांच्या मनातील कोरोनाची भीती आता गेली आहे. कोरोना कायमचा गेला आता आपल्याला त्याचा धोका नाही, असेच जणू सर्वजण वावरू लागले आहेत आणि त्याचा परिणाम गेल्या काही दिवसांत दिसून येतोच आहे. पण तुम्ही आताच स्वतःला आवर घालायला हवा. लस घेतली तरी तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात असं नाही. लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका टळलेला नाही. विशेषतः मुंबईकरांवर कोरोनाचा धोका कायम आहे.
दाट वस्ती आणि जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणी लस घेतल्यानंतरही कोरोनाचा धोका टळणार नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे. चायनीय युनिर्व्हसिटी ऑफ हॉंगकॉंगच्या सहकार्याने साऊथॅम्प्टन विद्यापीठाने याबाबत अभ्यास केला आहे. हे संशोधन नेचर ह्युमन बिहेविअर नियतकालिकेत प्रसिद्ध झालं आहे.
चीनमधील शहरांत संभाव्य कोरोनाची लाट रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) याचा एकत्रित अभ्यास करण्यात आला. या संशोधनातून कमी, मध्यम व उच्च घनतेच्या शहरांवर कोरोनाच्या होणाऱ्या परिणामाबाबत अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यातून असं दिसून आलं की, जोपर्यंत नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होत नाही तोपर्यंत मध्यम आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांमध्ये कोरोनाच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरणाबरोबरच सोशल डिस्टन्सिंग हेदेखील आवश्यक आहे.
हे वाचा - कोरोनाचा विळखा आणि लॉकडाऊनची पकड आणखी घट्ट; कुठल्या जिल्ह्यात आहे संचारबंदी?
कमी लोकसंख्या असलेल्या शहरांत जर लसीकरण प्रभावीपणे केलं गेलं तर कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगची गरज नाही. तसंच सर्व शहरांमध्ये लॉकडाऊन (Lockdown) करण्याची गरज नसल्याचे संशोधकांनी सांगितलं. पण मध्यम आणि उच्च घनतेची लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोरोनाची संभाव्य लाट रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये हर्ड इम्युनिटी (Herd Immunity) निर्माण होण्यासाठी लसीकरण आणि सोशल डिस्टन्सिंग या दोन्ही गोष्टी एकत्रित राबवणं आवश्यक आहे. सोशल डिस्टन्सिंगचा (Social Distancing) पर्यायवर अल्प कालावधीसाठी कठोरपणे अंमलात आणला तर त्याचे परिणाम मध्यम ते दिर्घ मुदतीपर्यंत दिसून येतील, असे संशोधकांनी स्पष्ट केलं.
2011 च्या जनगणनेनुसार मुंबईची लोकसंख्या 1.84 कोटी आहे. इथं प्रतिचौरस किलोमीटरमध्ये 20 हजार लोक राहतात. तसंच धारावीप्रमाणे अधिक दाटीवाटीच्या भागातही लोकांचं वास्तव्य आहे. तुलनेनं दिल्लीची लोकसंख्या ही 1.9 कोटी असून घनतेनुसार (Density) प्रतिचौरस किलोमीटरमध्ये 382 लोक राहतात. त्यामुळे या संशोधनानुसार लसीकरणानंतरही मुंबईवरील कोरोनाचं संकट कायम राहिल.
हे वाचा - Explainer : महाराष्ट्रासह भारतातील काही राज्यात कोरोना का परत येतोय?
गेल्या आठवड्यापासून देशात कोरोनाचा (Corona) संसर्ग पुन्हा वाढताना दिसत आहे. मागील 15 आठवड्यांच्या तुलनेत गत आठवड्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून आलं आहे. रविवारी रुग्णसंख्येने 11 दशलक्ष आकडा ओलांडला. गेल्या 65 दिवसांत 10 दशलक्ष रुग्णसंख्या नोंदली गेली. भारतात 15 ते 21 फेब्रुवारी दरम्यान 1,00,990 रुग्णांची नव्याने नोंद झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही संख्या 31 टक्क्यांनी अधिक आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग (Corona Spike) अचानक वाढला असून आठवड्याची स्थिती बघता त्यात तब्बल 81 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने 50 वर्षे वयावरील व्यक्ती आणि अल्पवयीन मुलांसाठी मार्चपासून लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारकडे मागण्याचा निर्णय घेतला आहे. पण कोरोनाची सद्यःस्थिती पाहता लसीकरण हा सक्षम आणि पुरेसा पर्याय ठरू शकत नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
हे वाचा - राज्यात कोरोना वाढला, नवे निर्बंध लागू; लॉकडउनसंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरं
भारतात सलग सातव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. आठवडाभरापूर्वी ही संख्या 11,430 होती ती रविवारी वाढून 12,770 नोंदवण्यात आली. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार रविवारी दैनंदिन रुग्ण संख्येत सलग चौथ्या दिवशी वाढ होऊन 14,264 नव्या रुग्णांची नोंद झालीय. यामुळे एकूण रुग्णसंख्या 1,09,91,651वर पोहोचली आहे. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असताना मृत्यू दर काहीसा स्थिर असल्याने ही बाब दिलासादायक ठरत आहे. देशात या आठवड्यात कोरोनामुळे 660 जणांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या गत आठवड्याच्या तुलनेने केवळ 10 ने अधिक आहे.
महाराष्ट्रासह केरळ, छत्तीसगड, मध्य प्रदेश, पंजाब आणि केंद्रशासित जम्मू-काश्मीर प्रदेशातही रुग्णसंख्या वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, नवीन रुग्णसंख्येपैकी 85.61 टक्के ही या पाच राज्यांतील आहे. विकली पॉझिटिव्ही रेट(Weekly Positivity Rate)हा सरासरी 1.79 टक्क्यांहून अधिक आहे. महाराष्ट्राचा विकली पॉझिटिव्ही रेट हा सर्वाधिक 8.10 टक्के आहे.
आरटीपीसीआर (RTPCR) चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यासोबतच एकूणच चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश केंद्र सरकारने या 5 राज्यांना दिले आहेत. आतापर्यंत भारतातील एकत्रित लसीकरण कव्हरेज 1.10 कोटींवर गेले आहे. 21 फेब्रुवारीपर्यंत 2,30,888 सत्रांव्दारे 1,10,85,173 लस डोस देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Covid19, Delhi, Mumbai