मराठी बातम्या /बातम्या /explainer /Explainer : राज्यात कोरोना वाढला, नवे निर्बंध लागू; जाणून घ्या तुमच्या मनातल्या Lockdown संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरं

Explainer : राज्यात कोरोना वाढला, नवे निर्बंध लागू; जाणून घ्या तुमच्या मनातल्या Lockdown संदर्भात सगळ्या प्रश्नांची उत्तरं

Corona in maharashtra

Corona in maharashtra

Coronavirus New rules : महाराष्ट्राच्या कुठल्या भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत, नवे हॉटस्पॉट कोणते, नवे नियम काय आहेत, कुठे आहे लॉकडाऊन आणि कुठे संचारबंदी.. जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं...

    मुंबई, 22 फेब्रुवारी: कोविड-19च्या (Covid-19) रुग्णांची संख्या महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा वाढीला लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात नव्याने काही निर्बंध (Fresh Restrictions) लागू करण्यात आले आहेत. सोमवारपासून (22 फेब्रुवारी) राज्यात धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी (21 फेब्रुवारी) समाजमाध्यमांद्वारे राज्यातील नागरिकांशी संवाद साधला आणि कोरोनाविषयक नियमांचं पालन करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं. 'मी जबाबदार' या नव्या मोहिमेची घोषणा त्यांनी केली. 'विषाणूविरोधातल्या या युद्धात मास्क (Mask) हीच ढाल आहे. लसीकरण सुरू झालं आहे. आणखी दोन लशींची चाचणी सुरू आहे. त्यानंतर नागरिकांनी लस (Vaccine) दिली जाईल,' असं त्यांनी सांगितलं. गेल्या 15 दिवसांत दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोनाबाधितांची संख्या 2500वरून 7000वर गेली आहे, असंही ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर, नव्या निर्बंधांबद्दलची माहिती प्रश्नोत्तराच्या स्वरूपात येथे देत आहोत.

    महाराष्ट्राच्या कोणत्या भागांत कोविड-19चे कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत?

    अमरावती, मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, अकोला, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यांत कोविड-19च्या अनुषंगाने कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत?

    नागरिकांनी मास्क घालावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं, तसंच कोरोनाविषयक अन्य सर्व काळजी कटाक्षाने घ्यावी, असं आवाहन राज्य सरकारतर्फे रविवारी करण्यात आलं. 22 फेब्रुवारीपासून राज्यात सर्व धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. गर्दी असलेली राजकीय आंदोलनंही काही कालावधीसाठी थांबवावी लागणार आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

    राज्यव्यापी लॉकडाउन (Lockdown) लागू करण्यात आला आहे का?

    नाही. महाराष्ट्रात राज्यव्यापी लॉकडाउन लागू करण्यात आलेला नाही. नागरिकांनी कोविड-19विषयक सुरक्षिततेची काळजी कटाक्षाने घ्यावी. पुढील 8-15 दिवसांत राज्यातली परिस्थिती पाहून राज्यात लॉकडाउन लागू करायचा की नाही, याचा निर्णय राज्य सरकार घेईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

    महाराष्ट्रात कोरोना महामारीची (Corona Pandemic) दुसरी लाट (Second Wave) आली आहे का?

    'कोरोना महामारीने राज्यात पुन्हा डोकं वर काढलं आहे, पण ती दुसरी लाट आहे का हे येत्या 8-15 दिवसांत कळेल,' असं मुख्यमंत्री म्हणाले.

    मुंबईत लागू करण्यात आलेले नवे नियम कोणते आहेत?

    बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने लागू केलेल्या नव्या नियमांनुसार, एका इमारतीत पाच किंवा अधिक कोरोनाबाधित आढळल्यास ती इमारत सील केली जाणार आहे. लक्षणं न दिसणाऱ्या आणि होम क्वारंटाइन (Home Quarantine) असलेल्या कोरोनाबाधितांच्या हातांवर पूर्वीप्रमाणेच शिक्के मारले जाणार आहेत. त्यांची माहिती त्यांच्या सोसायट्यांना दिली जाणार आहे. वॉर्ड वॉर रूम्सना त्या रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.

    लग्नसमारभं, जिमखाना, क्लब, नाइटक्लब्ज, रेस्तराँ, सिनेमा हॉल्स, सर्व धार्मिक स्थळं, मैदानं, बागा, सार्वजनिक स्थळं, शॉपिंग मॉल्स, खासगी कार्यालयं अशा सर्वच ठिकाणी मास्कचा वापर बंधनकारक आहे. मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला जाणार आहे. तसंच, एका ठिकाणी 50पेक्षा जास्त नागरिक एकाच वेळी उपस्थित असल्याचं आढळल्यास सर्वांना आणि संबंधित ठिकाणांच्या व्यवस्थापनांनाही दंड ठोठावला जाणार आहे.

    मुंबईत मास्क न घालणाऱ्यांसाठी चलन

    मास्क न घालणाऱ्या व्यक्तींना दंड ठोठावून त्यांना चलन देण्याचा अधिकार आता मुंबई पोलिसांनाही देण्यात आला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीरसिंग यांनी त्याबद्दलचं ट्विट केलं आहे. 'मास्क न घालणाऱ्यांना चलन देण्याची परवानगी आता मुंबई पोलिसांनाही आहे. हेल्मेट, सीटबेल्ट न घालण्यासाठी आम्ही ज्या ज्या वेळी तुम्हाला दंड करतो तेव्हा त्यामागचं कारण हे तुमच्या जीवनाच्या किमतीची तुम्हाला आठवण करून देणं हे असतं. तीच गोष्ट मास्कलाही लागू आहे. कृपया काळजी घ्या. तुम्ही आम्हाला हवे आहात,' असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    पुण्यात कोणते निर्बंध लागू करण्यात आले आहेत?

    पुणे जिल्हा प्रशासनाने रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नागरिकांसाठी संचारबंदी अर्थात नाइट कर्फ्यू (Night Curfew) लागू केला आहे. शाळा, कॉलेजेस, खासगी कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. तसंच, हॉटेल्स आणि रेस्तराँ दर दिवशी रात्री 11च्या आत बंद करावी लागणार आहेत.

    अमरावतीमध्ये लॉकडाउन आहे?

    होय. महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील अमरावती जिल्ह्यात 22 फेब्रुवारीला रात्री आठ वाजल्यापासून आठवड्याभराचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. एक मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल.

    अमरावतीत कोणते निर्बंध आहेत?

    जीवनावश्यक वस्तूंखेरीज सर्व दुकानं, सरकारी आणि खासगी शैक्षणिक संस्था, खासगी कोचिंग क्लासेस, ट्रेनिंग स्कूल्स बंद राहतील. दैनंदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी नागरिक सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत करू शकतील.

    सिनेमा हाउसेस, जिम्स, स्विमिंग पूल्स, बागा बंद राहतील. तसंच, मनोरंजनविषयक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसाठी लोकांनी एकत्र येण्यावर बंदी आहे. आधी परवानगी दिलेले उद्योग सुरू ठेवण्यास परवानगी आहे. सरकारी कार्यालयं, बँकांमध्ये 15 टक्के किंवा 15 व्यक्ती एवढ्याच कर्मचाऱ्यांची उपस्थिती असणं बंधनकारक असेल. मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत. हॉटेल्स आणि रेस्तराँमधून केवळ पार्सल्स पाठवली जातील.

    अवश्य वाचा -    कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पुन्हा देऊळ बंद! शेगावबरोबरच पंढरपूर देवस्थानाचा निर्णय

    वेगवेगळ्या प्रकारच्या वाहनांमध्ये प्रवाशांच्या संख्येवर निर्बंध आहेत. आंतरजिल्हा वाहतुकीत बसमधून 50 टक्के प्रवासीच प्रवास करू शकतात. तसंच, प्रवाशांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि मास्क घालणं बंधनकारक आहे.

    नागपुरात कोणते नियम आहेत?

    कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्यामुळे नागपूर महानगरपालिकेने शुक्रवारपासून निर्बंध कडक केले आहेत. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेनं चालवण्यात येणार असून, पाचपेक्षा अधिक रुग्ण सापडणाऱ्या इमारती सील केल्या जाणार आहेत. होम क्वारंटाइन व्यक्तींच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. अंत्यविधीला 20पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.

    महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठीचे नियम कोणते?

    केंद्र सरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, ब्राझीलमधून भारतात येणाऱ्या सर्व प्रवाशांना संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक आहे. ब्राझीलमधझून मुंबईत येणाऱ्या सर्वांना सात दिवस संस्थात्मक क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आलं आहे.

    महाराष्ट्रात येण्यासाठी कोविड टेस्ट आवश्यक आहे का?

    गुजरात, दिल्ली, राष्ट्रीय राजधानी परिसर, गोवा, राजस्थान, केरळ या राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांकडे आरटीपीसीआर (RTPCR Test) चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट असण्याची आवश्यकता आहे. या यादीत केरळचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

    First published:

    Tags: Amravati, Coronavirus, Covid19, Lockdown, Maharashtra, Mumbai, Nagpur, Pune