नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी: 2020 वर्ष हे कोरोनाच्या (Covid-19) भीतीमध्ये गेलं. 2021 च्या सुरुवातीला कोरोना संपेल असं शास्त्रज्ञांपासून ते सर्वसामान्यांना वाटत होतं. पण असं काही झालं नाही. ब्रिटननंतर दक्षिण अफ्रिका आणि आता फिनलँडमध्ये कोरोना व्हायरसचा वेगवेगळा स्ट्रेन (coronavirus new strain) आला आहे. याच दरम्यान भारतामध्ये सुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढत आहे. देशामध्ये कोरोनाची ही दुसरी लाट (second wave of coronavirus) आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आरोग्य मंत्रालयाने (Heath Ministry) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशामध्ये कोरोनाची एकूण प्रकरणं वाढून 1 कोटी 9 लाख 91 हजार 651 एवढी झाली आहेत. यामधील 1 लाख 56 हजार 302 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसं तर गेल्या तीन महिन्यांत रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत होतं आणि संसर्गाचं प्रमाणही झपाट्याने कमी झालं होतं. पण आता कोरोनाचा नवा स्ट्रेन भीतीदायक आहे. सलग सहाव्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली आहे. 15 फेब्रुवारीपासून कोरोनाची प्रकरणं वाढत असून गेल्या 24 तासांमध्ये 14 हजारांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
ही प्रकरणं पूर्ण देशातील नाहीत. पण चार राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र (Maharashtra), केरळ (Keral), मध्य प्रदेश (Madhya pradesh) आणि पंजाबमध्ये (punjab) कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत. महाराष्ट्रात कोरोनाचा नवा स्ट्रेन आला आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात 6 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण आढळले आहेत. बाकी तीन राज्यात देखील हिच परिस्थिती आहे. यावेळी पॅटर्न खूपच भितीदायक दिसत आहे कारण शहरी भागांऐवजी ग्रामीण भागात कोरोनाची प्रकरणं वाढताना दिसत आहेत. ज्यावेळी कोरोना भारतात आला तेव्हा शहरी भागातील जनता जास्त प्रभावित झाली. शहरी भागातील आरोग्याच्या चांगल्या सुविधांमुळे कोरोना अटोक्यात आहे. पण ग्रामीण भागांमध्ये पायाभूत सुविधा नसल्यामुळे परिस्थिती खूपच गंभीर होऊ शकते.
याच दरम्यान असे का होत आहे?, काही राज्य आणि त्यामधील ग्रामीण भागांमध्ये कोरोनाची प्रकरण जास्त का दिसत आहेत? अशाप्रकारचे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. यासंदर्भात आरोग्य तज्ज्ञांनी अनेक कारणं दिली आहेत. यामधील एक कारण म्हणजे कॉन्टॅक्स ट्रेसिंग. कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत त्यासाठी कॉन्टॅक्स ट्रेसिंग खूप महत्वाची आहे. जेणे करुन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व रुग्णांवर नजर ठेवली जाईल आणि गरज पडल्यावर त्यांच्यावर उपचार केले जाऊ शकतील.
महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये कोरोनाची प्रकरणं ज्या भागामधून आली ते सर्व भाग एकमेकांशी संबंधित आहेत. अमरावती हा ग्रामीण भाग आहे. ज्याठिकाणी कॉन्टॅक्स ट्रेसिंगचे प्रमाण खूप कमी आहे. हेच प्रमुख कारण आहे की हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. याठिकाणी स्थानिक प्रशासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अशीच परिस्थिती आहे.
दुसरे कारण म्हणजे लोकांमध्ये कोरोनाची भीती कमी झाली आहे. आधी वैज्ञानिकांपासून ते डॉक्टरांपर्यंत कोणालाच या व्हायरसबाबत फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्याविषयी सतत चर्चा केली जात होती. उपचाराबाबत माहिती नसल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण होते. अशातच इटली आणि अमेरिकामध्ये लोकांच्या मृत्यूचे प्रमाण सतत वाढल्याचे वृत्त येत होते. त्यामुळे भारतातील जनता भितीमुळेच सतर्क होती.
आता परिस्थिती मात्र वेगळी आहे. भारतात कोरोनावरील लस आली असून नियमांनुसार दिली सुद्धा जात आहे. या व्यतिरिक्त कोरोनाचे असे कोणतेही निश्चित औषध नाही. पण अनेक औषधं आहेत ज्यामुळे रुग्णांना आराम मिळतो. लॉकडाऊन दरम्यान कोरोनामुळं रुग्णालयातील पायाभूत सुविधांमध्ये अनेक बदल केले गेले. त्यामुळे भारतातील जनता याबाबत निवांत आहे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करत नाही.
अवश्य वाचा - New Corona Rules: पुण्याच्या वैशाली, गुडलकसह 47 हॉटेलांवर कारवाई
महाराष्ट्राबद्दल सांगायचं झालं तर, जानेवारीत या राज्यात 14000 पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. प्रचाराच्या आणि मतदानाच्या वेळी दररोज लोकं घराबाहेर पडायचे आणि इतरांच्या संपर्कात येत होते. यामुळे अमरावती आणि सातारा सारख्या जिल्ह्यांमधील कोरोनाची प्रकरणे अचानक वाढली. मुंबईची लाइफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल सेवा सुरु करण्यात आली. ऑफिस, शिक्षण किंवा इतर कामांसाठी अनेक जण घराबाहेर पडू लागले.
कोरोनावर लस आली आता भीती नाही, तर काहींनी कोरोना गेला असे समजून मास्कचा वापर करणं देखील टाळलं. मास्क घालणं अनिर्वाय असल्यामुळे लोक फक्त अशाच ठिकाणी त्याचा वापर करत होते ज्या ठिकाणी पोलिस कारवाईची भीती आहे. मास्क तोंडाला नाही तर हनुवटीवर लावून लोक फिरत आहेत. ही सगळी कारणं कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढण्यामागे आहेत.
दुसरीकडे शाळा, सार्वजनिक वाहतूक, सार्वजनिक कार्यक्रम सुरू करणं देखील प्रमुख कारण आहे. ज्या राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या त्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे लक्षात येत आहे. लहान मुलांना कोरोनाचा धोका कमी असला तरी सुद्धा ते वाहकाचे काम करतात. अशा परिस्थितीत घरातील इतर सदस्य आणि वयोवृद्धांना कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो.
या सर्व कारणांव्यतिरिक्त, एक अफवा देखील पसरत आहे. लोकांना असे वाटतं की, कोरोना व्हायरस सत्य नाही. ते मिथक आहे. परदेशी शक्तींनी पसरवलेली अफवा आहे. आतापर्यंत कोरोना व्हायरसबाबत पसरलेल्या अफवांपैकीच ही एक. अशाने कोरोनाविषयीचं गांभीर्य कमी होतं आणि लोक नियमांचं पालन करत नाहीत, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत नाही. त्यामुळे कोरोनाची प्रकरणं वाढत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona virus in india, Covid19, Lockdown