राज्यात कोरोना लॉकडाऊन पुन्हा लागू होईल की नाही? याचा निर्णय आता 8 दिवसांनंतरच होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला इतक्या दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. 8 दिवसांमधील परिस्थिती पाहूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल. मात्र तोपर्यंत जिथं कोरोनाची प्रकरणं पुन्हा वाढली आहेत, तिथल्या स्थानिक प्रशासनानं मात्र कठोर पावलं उचलली आहेत.
काही ठिकाणी पूर्ण लॉकडाऊन तर काही ठिकाणी तात्पुरत्या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
अमरावती जिल्ह्यात 22 फेब्रुवारीला रात्री आठ वाजल्यापासून आठवड्याभराचा लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. एक मार्च रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत हा लॉकडाउन लागू असेल.
नागपुरात लॉकडाऊन नाही पण कडक निर्बंध आहेत. 7 मार्चपर्यंत शाळा , कॉलेज, आठवडी बाजार बंद. धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनाही परवानगी नाही.
पुण्यात रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नाइट कर्फ्यू (Night Curfew) लागू केला आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट दर दिवशी रात्री 11 च्या आत बंद करावी लागणार आहेत. शाळा, कॉलेजेस, खासगी कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील.
पिंपरी-चिंचवडमध्ये रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी. पुढील आदेश येईपर्यंत ही संचारबंदी लागू असेल.
सातारा जिल्ह्यात रात्री 11 ते पहाटे 6 पर्यत संचारबंदी. महामार्ग वगळता सर्व ठिकाणी संचारबंधी असणार आहे. जिल्ह्यातील शाळा मात्र सुरू राहणार आहेत, जिथं तपास पथकाची नजर असेल.
नाशिकमध्येही रात्रीची संचारबंदी आहे. जर रुग्णसंख्या कमी झाली नाही तर लॉकडाऊन करावा लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला.
वाशिममध्ये वीकेंड कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी. 1 मार्चपर्यंत हा आदेश लागू असेल.