मुंबई, 16 फेब्रुवारी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा कोरोना (Coronavirus) रुग्णांची संख्या वाढत असल्याचं दिसून येत आहे. विदर्भात अचानक कोरोनाचा उद्रेक झाला आहे. शिवाय मुंबई, पुण्यातही कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. लॉकडाऊन शिथील होताच नागरिक आता बिनधास्त झाले आहेत आणि कोरोनासंबंधी नियमांचं पालन करत नाही आहेत, त्यामुळे राज्यावरील कोरोनाचं संकट पुन्हा वाढलं आहे आणि पुन्हा लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी नियमांची (Covid 19 rule) कडक अंमलबजावणी व्हावी आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी दिले. पण आता त्यांच्याच पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई मुख्यालयात मोठ्या संख्येनं जमलेले पक्षाचे कार्यकर्ते सर्रासपणे कोरोनासंबंधी नियमांचं उल्लंघन करताना दिसले. कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई मुख्यालयात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमले. पण ना त्यांनी मास्क घातला, ना सोशल डिस्टन्सिंग राखलं. कोरोनासंबंधी नियम त्यांनी धाब्यावर बसवले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कालच कोरोनाच्या नियमांचं पालन न करणाऱ्यांवर, मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. असं असताना त्यांच्याच पक्षातील कार्यकर्ते मात्र नियम पायदळी तुडवताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनासंबंधी नियम फक्त सर्वसामान्यांसाठीच आहेत का, राजकारण्यांसाठी नाहीत का असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. हे वाचा - राज्यात कोरोनाची नवी लाट! पुन्हा ठरलं देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Corona Cases In Maharashtra) देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरलं आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येसह राज्यानं केरळला मागे सोडलं आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हजार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत. सोमवारी राज्यात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 67 हजार 643 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत तब्बल 51 हजार 552 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यात रोज 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. हे वाचा - राज्यात कोरोनाची नवी लाट! पुन्हा ठरलं देशातील सर्वाधिक प्रभावित राज्य याच पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत बातचीत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, की रुग्णसंख्या सलग वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कठोर पाऊलं उचलावी लागतील. तर कोरोनाबाबत नियम पाळले जात नाहीत हे दुर्दैवी आहे. जर नियम पाळले जात नसतील तर पुन्हा लॉकडाऊनकडे जाण्याची शक्यता आहे, असा अलर्ट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.