मुंबई 16 फेब्रुवारी : राज्यात कोरोनाचा (Corona Virus) कहर कायम आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णांच्या संख्येत घट आल्यानंतर आता 42 व्या दिवशी पुन्हा एकदा महाराष्ट्र (Corona Cases In Maharashtra) देशातील सर्वाधित प्रभावित राज्य ठरलं आहे. 3 हजार 365 नव्या कोरोना (Covid-19) रुग्णसंख्येसह राज्यानं केरळला मागे सोडलं आहे. केरळमध्ये सोमवारी 2 हदार 884 कोरोना रूग्ण आढळले होते. राज्यात नोव्हेंबरनंतर पहिल्यांदाच कोरोनाचे इतके जास्त रूग्ण आढळले आहेत. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांसोबत बातचीत करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते, की रुग्णसंख्या सलग वाढत राहिल्यास मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कठोर पाऊलं उचलावी लागतील. सोमवारी राज्यात कोरोनामुळे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 20 लाख 67 हजार 643 वर पोहोचली आहे. तर, आतापर्यंत तब्बल 51 हजार 552 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या सहा दिवसांपासून राज्यात रोज 3 हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मुंबई महापालिकेनं धारावीतील काही क्षेत्रात मोबाईल टेस्टिंग व्हॅन तैनात केली आहे. धारावी, दादर आणि माहीम परिसरात आठवडाभरात कोरोना रुगणांच्या संख्येत वाढ नोंदवली गेली असल्यानं पूर्ण खबरदारी घेतली जात आहे. नुकतंच राज्य सरकारनं केरळवरुन येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी अनिवार्य केली आहे. संपूर्ण देशाच्या तुलनेत महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोरोनाचा प्रसार अधिक आहे. सोमवारी देशात 9 हजार 93 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मागच्या दोन सोमवारची यासोबत तुलना केल्यास संख्येत मोठी वाढ झाली आहे. सोमवारी रूग्णसंख्या कमी येण्याचं कारण म्हणजे वीकेंडमुळं स्टाफ कमी असल्यानं चाचण्याही कमी झाल्या होत्या. सोमवारी 4.9 लाखापेक्षाही कमी चाचण्या झाल्या. 6 महिन्यात इतक्या कमी चाचण्या होण्याची ही पहिलीच वेळ होती. सोमवारी देशात 82 रुग्णांचा मृत्यू झाला. यानंतर आतापर्यंत मृतांचा आकडा 1 लाख 55 हजार 844 च्या पार गेला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.