विशाल पाटील, प्रतिनिधी
मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात नवा गौप्यस्फोट केला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान (Aryan Khan) याला अडकवण्यात आलं असून हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि वसुलीचा आहे असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात मोहित भारतीय हा मास्टरमाईंड असल्याचा दावाही नवाब मलिकांनी केला आहे. (Aryan Khan case is kidnapping and ransom serious allegation of Nawab Malik)
नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
आर्यन खान हा स्वत: तिकीट काढून क्रूझवर पार्टीसाठी गेला नव्हता तर त्याला प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला यांनी क्रूझवर नेलं होतं. हा संपूर्ण प्रकार किडनॅपिंग आणि खंडणी वसुलीचा आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड हा मोहित भारतीय आहे असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांच्या मेव्हण्याच्या माध्यमातून सापळा रचण्यात आला आणि आर्यन खानला क्रूझवर नेलं. त्यानंतर किडनॅप करुन 25 कोटींची मागणी करण्यात आली. डील 18 कोटींवर फायनल झाली. त्यापैकी 50 लाख रुपये घेण्यात आले. मात्र, एका सेल्फीने त्यांचा संपूर्ण खेळ बिघडवला. किडनॅपिंगचा मास्टरमाईंड मोहित कंबोज आहे. वसुलीत मोहित कंबोज (भारतीय) हा वानखेडेंचा साथीदार आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं.
1100 कोटींचा घोटाळा करणारा मोहित भारतीय
नवाब मलिक यांनी पुढे म्हटलं, 1100 कोटींचा बॅंक घोटाळा मोहित कंबोज (भारतीय) या व्यक्तीने केला आहे. देशात सत्ता बदलताच मोहित भारतीय याने भाजपत प्रवेश केला. पैशांच्या जोरावर युवा मोर्चाचा अध्यक्ष झाला. दीड वर्षांपूर्वी इडीची रेड झाली मात्र हे प्रकरण दाबले गेले.
मोहित भारतीय अन् समीर वानखेडे मित्र
मोहित कंबोज आणि समीर वानखेडे यांचे चांगले संबंध आहेत. मोहित कंबोज याचे मुंबईत 12 हॉटेल्स आहेत. आपले हॉटेल्स चालवण्यासाठी समीर वानखेडे याच्याकडून इतर स्पर्धक हॉटेल्सला धमकावलं जातं. ड्रग्स माफीयांकडून पैसे उकळण्याचा यांचा उद्देश आहे असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.
वाचा : आर्यन खानसोबत किरण गोसावीने काढलेल्या Selfie मुळे 18 कोटींची डील फसली, विजय पगारेंच्या दाव्याने खळबळ
सुनील पाटीलचा नवाब मलिकांना फोन
नवाब मलिकांनी पुढे म्हटलं, 6 तारखेला मी पत्रकार परिषद घेतल्यावर दोन तासांनी सुनील पाटील यांचा मला फोन आला. साहेब मी धुळ्यावरुन बोलतोय म्हणाला... आपण ज्या संदर्भात पत्रकार परिषद घेतली त्याबाबत मला काही सांगायचं आहे म्हटलं मी म्हणालो मुंबईत या आणि द्या माहिती. मात्र, सुनील पाटील आलाच नाही. सुनिल पाटील यांना परत फोन केला होता त्यांनी सांगितले मी गुजरात मध्ये आहे मी कसही करून येतो मात्र ते अजुन आले नाहीत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, BJP, Drug case, Nawab malik, NCP