मुंबई, 7 मे: दीड वर्षांपूर्वी भारतात कोरोना विषाणूचा (Corona Virus) शिरकाव झाल्यापासून देशातील डॉक्टर 'कोविड योद्धे' (Covid Warriors) बनून या साथीच्या आजाराशी लढत आहेत. मागील एक वर्षांपासून देशात सातत्यानं रुग्णवाढ होतं आहे. त्यामुळे डॉक्टरांना 24 तास सेवा द्यावी लागत आहे. अशातच त्यांच्या पगारवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. मागील वर्षी बृहन्मुंबई महानगर पालिकेनं काढलेल्या परिपत्रकाप्रमाणे पगारवाढ न झाल्यास संपावर जाऊ, असा इशारा महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी दिला आहे. ऐन रुग्ण वाढीच्या काळात डॉक्टरांनी संपावर जाण्याचा इशारा दिल्यामुळे मुंबईकरांवर दुहेरी संकट निर्माण झालं आहे.
महानगर पालिकेची प्रमुख रुग्णालय असणाऱ्या नायर, केईएम, सायन, कुपर या रुग्णालयातील कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टरांनी एकत्र येऊन प्रसिद्धी पत्रकाद्वारे संपाचा इशारा दिला आहे. पुढील सात दिवसांत निवासी वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या पगारात 10 हजार रुपये कायमस्वरुपी पगारवाढ न झाल्यास सर्व डॉक्टर्स सामुहिकपणे रजेवर जातील, असा इशारा संबंधित महानगरपालिकेच्या डॉक्टरांनी घेतला आहे. डॉक्टरांची मागणी मान्य न झाल्यास कोरोना रुग्णांचा जीव टांगणीला लागू शकतो.
हे वाचा-सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा! शिवसेनेचे मंत्री विकास कामांच्या उद्घाटनात व्यस्त
खरंतर, बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांनी मार्च 2020 मध्ये एक परिपत्रक काढून महानगरपालिकेच्या डॉक्टरांच्या वेतनात प्रत्येक 10 हजार रुपये वाढ करण्यात येईल, असं म्हटलं होतं. याला मंजुरी देखील देण्यात आली होती. ही वाढ 01 मे 2020 पासून देण्यात येईल, असंही संबंधित परिपत्रकात म्हटलं होतं. मात्र मंजुरी मिळाल्यानंतर अकरा महिन्यांपासून जवळपास 3000 निवासी डॉक्टरांना ही पगारवाढ देण्यात आली नाही.
हे वाचा-कोरोनाला हरवण्यासाठी या 2 गोष्टींचा होईल उपयोग, हेल्थ एक्सपर्टनं सांगितले उपाय
याबाबतची विचारणा महानगरपालिका प्रशासनाकडे केली असता, त्यांनी जून महिन्यापासून देण्यात आलेला कोव्हिड भत्ता हा पगारवाढ समजून देण्यात आल्याचं म्हटलं आहे. पण संबंधित कोव्हिड भत्ता हा प्रोत्साहनापर असल्याचा आरोप संबंधित डॉक्टरांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील सात दिवसांत मुंबई महानगर पालिकेनं योग्य तो निर्णय घेऊन राहिलेल्या थकबाकीसह 10 हजार रुपये कायमस्वरूपी पगारवाढ न केल्यास संपावर जाऊ असा इशारा महापालिकेच्या डॉक्टरांकडून देण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.