सचिन जिरे, औरंगाबाद, 07 मे: देशभरात कोरोनाने (Coronavirus in India) थैमान घातलं आहे. महाराष्ट्र तर कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Coronavirus in Maharashtra) सर्वाधिक प्रभावित झाला आहे. अशावेळी लागू करण्यात आलेल्या नियमांचं, कडक निर्बंधांचं, सोशल डिस्टन्सिंगचं (Social Distancing) पालन करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांसह अनेक नेतेमंडळी करत आहेत. मात्र शिवसेनेच्या मंत्रीमहोदयांनाच लॉकडाऊनच्या नियमांचं (Lockdown) भान राहीलं नसल्याचा प्रकार औरंगाबादेत पाहायला मिळाला. याठिकाणी शिवसेना मंत्री संदीपान भुमरे (Shiv Sena Minister Sandipan Bhumare) यांनी संचारबंदीचं उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. संचारबंदीच्या काळात गर्दी जमवून त्यांनी विकास कामांचं उद्घाटन केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे या शिवसेनेच्या मंत्र्यांवर समाजातून टीका केली जात आहे. आज सामान्य माणूस पोटाची खळगी भरण्यासाठी देखील बाहेर पडू शकत नाही आहे, अशावेळी हे मंत्रीमहोदय विकास कामांचं उद्घाटन कसं काय करू शकतात? असा संतप्त सवाल सामान्यांकडून विचारला जातो आहे.
शिवसेना मंत्री संदीपान भुमरे यांनी संचारबंदी असताना पैठण तालुक्यातील दादेगाव परिसरात विकास कामांचं उद्घाटन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे काही फोटो देखील समोर आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे याठिाकणी उदघाटनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची तुंबळ गर्दी देखील जमली होती.
लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही मंत्री संदीपान भुमरे यांनी गर्दी जमवल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे. यावेळी त्यांनी गर्दीसमोर भाषणंही केली. त्यामुळे एकीकडे संपूर्ण जनता हवालदिल असताना, रोज हजारो माणसं मरत असताना मंत्री उद्घाटनात व्यस्त असल्याने सर्वच स्तरातून टीका होत आहे.