Home /News /mumbai /

मोठी बातमी : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात, शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

मोठी बातमी : राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात, शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

Shiv Sena: राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

मुंबई, 12 जून : राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) एकूण चार उमेदवार रिंगणात होते. तर भाजपचे तीन उमेदवार रिंगणात होते. सहा जागांसाठी सात उमेदवार असल्याने ही निवडणूक झाली आणि त्यात शिवसेनेच्या एका उमेदवाराचा पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेच्या गोटात एकच खळबळ उडाली. अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान केल्याने हा पराभव झाल्याचं बोललं जात आहे. या पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसून येत आहे आणि आता शिवसेनेने (Shiv Sena) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत बिघाडीला सुरुवात झाल्याचं दिसत आहे. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापलं बघावं अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एकरुप भूमिका दाखवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक अपक्ष आमदारांनी भाजपला मतदान करून शिवसेनेच्या दूसऱ्या उमेदवाराला पाडण्यात हातभार लावला. यामुळेच शिवसेना आता महाविकास आघाडीतील इतर पक्षांवर विश्वास ठेवायला तयार नाहीये अशी माहिती समोर येत आहे. वाचा : "... तर देवेंद्र फडणवीस सुद्धा शिवसेनेला मतदान करतील" : संजय राऊत काय होणार परिणाम? शिवसेनेने ही भूमिका घेतल्यास त्याचा परिणाम येत्या विधानपरिषद निवडणुकीत नक्कीच पहायला मिळेल. शिवसेनेच्या भूमिकेमुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दुसरा उमेदवार निवडून येण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. अपक्षांवरील आरोप शिवसेनेला पडणार महागात? तर दुसरीकडे संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांमुळे अपक्ष आमदार नाराज झाले आहेत. देवेंद्र भुयार यांनी म्हटलं, शिवसेनेचं नियोजन चुकलेलं आहे. मला एक सुद्धा फोन शिवसेनेकडून आला नाही तरी मी त्यांना मतदान केलं आहे. आम्ही शरद पवारांची भेट घेणार आहोत. प्रामाणिकपणे मतदान करुन सुद्धा अशा प्रकारे आमच्याबाबत विधान केले जात असतील तर हे चुकीचं आहे. आम्हालाही लोकांनी निवडून दिलं आहे आणि अशावेळी आमच्याविषयी गैरसमज करणं चुकीचं आहे. आता आम्हाला सर्व अपक्ष आमदारांना एकत्र येऊन विचार करावा लागेल. हा केवळ माझ्या एकट्यावर नाही तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे असंही आमदार देवेंद्र भुयार यांनी म्हटलं आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Maharashtra News, NCP, Shiv sena

पुढील बातम्या