नवी दिल्ली, 02 डिसेंबर : आशिया खंडातील मोठ्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. खंडप्राय भारताला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा आहे. सरकारी आकडेवारीनुसार भारताला एकूण सात हजार 516 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या समुद्र किनाऱ्यावर शेकडो शहरं वसलेली आहेत. काही शतकांपूर्वी अतिशय लहान असलेल्या या शहरांचा पसारा आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मानवाने समुद्र किनाऱ्यांवर भर घालून तिथे आपली वस्ती निर्माण केली आहे. मात्र, भविष्यात ग्लोबल वॉर्मिंग आणि मानवाच्या समुद्रावरील अतिक्रमाणाचे भयानक परिणाम भोगावे लागणार आहेत.
पुढील आठ वर्षांत म्हणजेच 2030 पर्यंत भारतातील मुंबई, कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुवनंतपुरम सारख्या मोठ्या शहरांची किनारपट्टी अतिशय लहान होण्याचा धोका आहे. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीमुळे जमीन गिळंकृत होईल. इतकंच नाही तर हजारो लोकांना त्यांची घरं आणि व्यवसाय सोडावे लागतील. 2050 पर्यंत या शहरांची स्थिती अतिशय बिकट होईल. समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा मुंबईतील किमान एक हजार इमारतींना फटका बसू शकतो. किमान 25 किलोमीटर लांबीचा रस्ता खराब होईल. जेव्हा भरती येईल तेव्हा सुमारे दोन हजार 490 इमारती आणि 126 किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली जाईल, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज तकनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
रिजनल मॅरिटाइम सिक्युरिटी इनिशिएटिव्हनं (आरएमएसआय) या वर्षी (2022) जुलै महिन्यामध्ये एक अभ्यास केला होता. या अभ्यासातून आता अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. आरएमएसआयच्या अभ्यासानुसार मुंबईतील हाजी अली दर्गा, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, वांद्रे-वरळी सी लिंक, मरिन ड्राईव्हवरील क्वीन्स नेकलेस, ही सर्व ठिकणं येत्या काही वर्षांत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आरएमएसआयने इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजच्या (आयपीसीसी) सहाव्या हवामान मूल्यांकन अहवालातून हे विश्लेषण केलं आहे. केवळ मुंबईत नाही तर कोची, मंगळुरू, चेन्नई, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपुरमलाही समुद्राच्या वाढत्या पाणी पातळीचा फटका सहन करावा लागणार आहे.
प्रदूषण आणि तापमान वाढीमुळे बसणार फटका
प्रदूषणाला आळा घातला नाही, तर तापमानवाढ आणि अनियंत्रित हवामानाचा सामना करावा लागेल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. 1850 नंतरच्या चार दशकांत जितकी तापमानवाढ झाली नव्हती तितकी गेल्या 40 वर्षांतच झाली आहे. हवामान बदल ही भविष्यातील समस्या नसून, सद्यस्थितीतील मोठी समस्या आहे. कमी-जास्त प्रमाणात संपूर्ण पृथ्वीवर त्याचा परिणाम होत आहे. त्याला वेळीच आवर घातला नाही तर बर्फ वितळेल, जंगलं नष्ट होतील. ध्रुवीय बर्फ वितळल्यास समुद्राची पाणी पातळी वाढेल आणि समुद्रसपाटीपासून काही इंच उंचीवर असलेले अनेक देश पाण्याखाली जातील.
2100 पर्यंत भारताची स्थिती कशी असेल?
सन 2100 पर्यंत भारतातील 12 किनारी शहरं सुमारे तीन फूट पाण्याखाली जातील. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने हा निष्कर्ष काढला आहे. त्यासाठी नासानं सी लेव्हल प्रोजेक्शन टूल तयार केलं आहे. हे साधन आयपीसीसी अहवालात दिलेल्या माहितीनुसार काम करतं. या अहवालात संपूर्ण जगाला उष्णतेचा तडाखा बसणार असल्याचं म्हटलं आहे. तापमानानात 4.4 अंश सेल्सिअसपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दशकांत तापमान 1.5 अंश सेल्सिअसनं वाढेल. तापमान वाढल्यास हिमनद्या वितळणं सहाजिक आहे. नासाच्या प्रोजेक्शन टूलमध्ये जगाचा नकाशा बनवण्यात आला आहे. कोणत्या वर्षी जगाच्या कोणत्या भागात समुद्राची पातळी किती असेल, हे त्याद्वारे ठरवता येत आहे. हे उपकरण जगातील ज्या देशांना किनारे आहेत त्यांची समुद्र पातळी मोजू शकतं. सन 2100 पर्यंत भारतातील 12 शहरं अर्धा ते तीन फुट समुद्राच्या पाण्यात बुडतील, असा त्यांचा अंदाज आहे.
भारतातील या 12 शहरांना 2100 पर्यंत सर्वांत जास्त धोका
2100 पर्यंत भारतातील भावनगर येथील समुद्राच्या पाण्याची पातळी 2.69 फुटांनी वाढेल तर कोचीमध्ये 2.32 फूट, मुरगाव 2.06 फूट, ओखा 1.96 फूट, तुतीकोरीन 1.93 फूट, पारादीप 1.93 फूट, मुंबई 1.90 फूट, मंगळुरू 1.87 फूट, चेन्नई 1.87 फूट आणि विशाखापट्टणम 1.77 फूट पाणी पातळी वाढेल. या 12 शहरांपैकी अनेक ठिकाणी बंदरं आहेत. तिथे व्यापारी केंद्रं आहेत. समुद्राची पातळी वाढल्याने भविष्यात आर्थिक व्यवस्थेला मोठा फटका बसणार आहे.
एका वर्षात चार हजार कोटी टन कार्बन उत्सर्जन
दरवर्षी मानव चार हजार कोटी टन कार्बन डायऑक्साइड वातावरणामध्ये सोडतो. 2050 पर्यंत हे प्रमाण 500 कोटी टनांपर्यंत कमी केलं नाही, तर पृथ्वीचा नाश निश्चित आहे. कार्बन उत्सर्जनाचा सध्याचा वेग कायम राहिला 2050 पर्यंत प्रदूषण, अतिउष्णता, पूर यासारख्या समस्या दुपटीने वाढतील. नासाचे प्रशासक बिल नेल्सन म्हणाले की, नासानं तयार केलेलं सी लेव्हल प्रोजेक्शन टूल जगभरातील नेत्यांना, शास्त्रज्ञांना भयानक भविष्याचं वास्तव सांगण्यासाठी पुरेसं आहे. समुद्राची पाणी पातळी झपाट्यानं वाढल्यानं पुढील शतकापर्यंत समुद्र किनारी असलेल्या अनेक देशांचं क्षेत्रफळ कमी होत जाईल.
हे वाचा - नार्को टेस्टमध्ये गुन्हेगार सत्य सांगतात? या प्रश्नांमुळे आफताबचा पर्दाफाश होणार
पुढील 10 वर्षांत 'अशी' असेल परिस्थिती
पुढील 10 वर्षांत भारतातील 12 शहरांमध्ये समुद्राच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढलेली असेल. कांडला, ओखा आणि मुरमुगावमध्ये 3.54 इंच, भावनगरमध्ये 6.29 इंच, मुंबईत 3.14 इंच, कोचीमध्ये 4.33 इंच, तुतीकोरीन, चेन्नई, पारादीप व मंगळुरूमध्ये 2.75 इंच आणि विशाखापट्टणममध्ये 2.36 इंचाने पाण्याची पातळी वाढलेली असेल. आयपीसीसीच्या अहवालातून नासाच्या सी लेव्हल प्रोजेक्शन टूलने हे डेटा विश्लेषण केलं आहे. ज्यामध्ये पुढील 20 वर्षांत पृथ्वीचं तापमान किमान 1.5 अंश सेल्सिअसनं वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पूर्वी 50 वर्षांच्या कालावधीमध्ये जितकी तापमान वाढ होती तितकी वाढ आता दर दहा वर्षांनी होत आहे.
हे वाचा - 2 कोटींचा विम्याचा दावा मिळावा म्हणून पत्नी अन् मेव्हण्याची हत्या, म्हणे अपघात..
'अर्थ सायन्स' मंत्रालयाच्या अहवालानुसार, 1874 ते 2004 या कालावधी दरम्यान उत्तर हिंदी महासागराच्या पाणी पातळीत दरवर्षी 1.06 ते 1.75 मिलीमीटर वाढ दिसत होती. 1993 ते 2017 या काळात हे प्रमाण 3.3 मिलीमीटर इतकं झालं. 1874 ते 2005 पर्यंतची आकडेवारी पाहिली तर हिंद महासागराच्या पाणी पातळीत जवळपास एक फुटाने वाढ झाली आहे. जागतिक तापमानवाढ हे समुद्राच्या पातळीत वाढ होण्याचं मुख्य कारण असल्याचं हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे. जागतिक स्तरावर तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ झाल्यास वादळांचं प्रमाणही वाढेल. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळांची संख्या गेल्या चार वर्षांत 52 टक्क्यांनी वाढली आहे.
2050पर्यंत 'या' शहरांना बसेल फटका
2050 पर्यंत तापमानात 2 अंश सेल्सिअसने वाढ झाली तर या चक्रीवादळ आणि वादळांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. ती तिपटीने वाढू शकते. सन 2050 पर्यंत चेन्नईतील पाच किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 55 इमारतींना समुद्राच्या पुराचा सामना करावा लागेल. कोचीमध्ये समुद्राच्या पुरामुळे किमान 464 इमारती बाधित होतील. भरतीच्या काळात एक हजार 502 इमारती बाधित होतील. तिरुअनंतपुरममध्ये 349 ते 387 इमारतींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये नऊ किलोमीटर लांबीचा रस्ता आणि 206 इमारती बाधित होतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Environment, Research, Sea