जयपूर, 1 डिसेंबर : 2 कोटींचा विम्याचा दावा मिळवण्यासाठी पतीने पत्नी आणि मेव्हण्याची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यासाठी त्याने 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती. दुहेरी हत्याकांडाच्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
काय आहे संपुर्ण प्रकरण -
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये एका दुहेरी हत्याकांडाची खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये हरमडा पोलिसांनी मृत महिला शालू हिचा पती आरोपी महेशचंद धोबी आणि मालवीय नगर येथील मुकेशसिंग राठोड यांच्यासह चार आरोपींना अटक केली आहे.
उर्वरित दोन आरोपींनी गुन्ह्यासाठी त्यांची दोन वाहने दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नीच्या सुटकेसाठी आणि दोन कोटींचा अपघात विम्याचा दावा मिळवण्यासाठी आरोपी पती महेशचंद याने या हत्येसाठी हिस्ट्री शीटर मुकेशसिंग राठोड याला 10 लाख रुपयांची सुपारी दिली होती, त्यात 5 लाख रुपये आगाऊ दिले होते.
डीसीपी पश्चिम वंदिता राणा यांनी सांगितले की, दुहेरी हत्याकांडाची ही घटना हरमाडा भागात 5 ऑक्टोबर रोजी घडली होती. या घटनेत शालू नावाची दुचाकीस्वार महिला आणि तिचा चुलत भाऊ राजू यांचा हायस्पीड एसयूव्हीच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. हत्येच्या वेळी दोघेही दुचाकीवरून समोद हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते.
2015मध्ये लग्न तर 2019 मध्ये...
डीसीपी पश्चिम वंदिता राणा यांनी सांगितले की, पोलीस दोन्ही भावंडांच्या रस्ता अपघातात मृत्यूची चौकशी करत होते, तेव्हा हरमदा पोलिस स्टेशनचे कॉन्स्टेबल दयाराम यांना माहिती मिळाली की मृत शालूचा पती महेश चंद याने मे 2022 मध्ये 1 कोटी 90 लाख रुपयांचा विमा काढला होता. तसेच याचा एक हप्ता भरण्यात आला.
जयपूरमध्येच शालूचे लग्न महेशचंदसोबत 2015 मध्ये झाले होते. लग्नानंतरच्या मतभेदामुळे दोघेही 2017 मध्ये वेगळे राहू लागले. त्यानंतर 2019 मध्ये चालूने पती महेश चंद याच्याविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हाही दाखल केला होता, त्यामुळे पती-पत्नीमधील वाद आणखी वाढला होता.
हेही वाचा - Aaftab Poonawala Narco Test : श्रद्धासोबत असं का केलं? आफताब आज तोंड उघडणार, मोठी माहिती समोर
या वादानंतर आरोपी पती महेशचंद याने एक कट रचला. या कटाचा भाग म्हणून तो आपल्या पत्नी शालूला मनवून घरी घेऊन आला. यानंतर महेश चंद याने पत्नी शालूचा यावर्षी मे महिन्यात सुमारे 2 कोटी रुपयांचा अपघात विमा काढला. महेशचंदने हिस्ट्रीशीटर मुकेश सिंग यांच्यासोबत मालवीय नगरमध्ये पत्नी शालूच्या हत्येचा कट रचला. रस्ता अपघातात तिचा मृत्यू व्हावा, असा कट त्याने रचला.
एसीपी राजेंद्र निरवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती महेश चंदने पत्नी शालूला सांगितले की, त्याने दोघांच्या चांगल्या संबंधांसाठी नवस मागितला आहे. यासाठी तु मंगळवारी 11 रोजी सामोद येथील वीर हनुमानजींच्या दर्शना जा आणि फक्त दुचाकीवर जा. पतीची आज्ञा पाळत शालू 5 ऑक्टोबर रोजी तिचा भाऊ राजू सोबत बाईकवरून हनुमानजीच्या मंदिरात दर्शनासाठी निघाली होती. यावेळी महेशचंदने आपल्या सहकाऱ्यांसह हरमडा व्हॅलीमध्ये शालूच्या दुचाकीला एसयूव्हीने जोरदार धडक दिली, यात शालू आणि तिचा भाऊ राजूचा मृत्यू झाला.
शालूच्या नातेवाईकांनीही हा मृत्यू रस्ता अपघात असल्याचे मानले. मात्र तपासात हजर असलेल्या कॉन्स्टेबल दयाराम यांना मृत्यूपूर्वी शालूचा विमा उतरवल्याचे समजले. संशय अधिक गडद झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवले, त्यातच ही खळबळजनक दुहेरी हत्या उघडकीस आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Insurance, Jaipur, Money, Murder, Wife and husband