नवी दिल्ली, 6 फेब्रुवारी : ज्येष्ठ नागरिकांना इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) सादर करताना येणाऱ्या अडचणी पाहून केंद्र सरकारने 2021-22 या आगामी आर्थिक वर्षापासून त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापासून सवलत दिली आहे. एक एप्रिल 2021पासून ही सवलत मिळेल. 75 वर्षं आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizens) ही सवलत मिळणार आहे. अर्थात, त्यासाठी काही अटीही घालण्यात आल्या आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी नुकत्याच सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात (Union Budget) त्याबाबतचा उल्लेख केला आहे.
न्यूज18 मधील एका बातमीत चार्टर्ड अकाउंटंट विकास अग्रवाल आणि हरिगोपाल पाटीदार यांनी या बाबींचं विश्लेषण केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, 75 वर्षांवरील ज्या ज्येष्ठ नागरिकांना केवळ पेन्शन आणि व्याजातूनच उत्पन्न मिळत असतं, तेच ज्येष्ठ नागरिक ही सवलत मिळवू शकतात. यात ज्येष्ठ नागरिकांना ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी, की त्यांच्या ज्या काही ठेवी आहेत, त्या पेन्शन अकाउंट ज्या बँकेत आहे, त्याच बँकेत हव्यात. ठेवी दुसऱ्या बँकेत असतील, तर पेन्शन अकाउंट (Pension Account) असलेल्या बँकेत त्या हस्तांतरित करता येतील. एखाद्या जुन्या एफडीला (FD) व्याजदर जास्त असेल आणि तिची मुदत संपायला बराच कालावधी शिल्लक असेल, तर अशा वेळी ती एफडी मोडून दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करू नये. अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स रिटर्न न भरण्याची सवलत मिळणार नाही; मात्र व्याजाचं नुकसानही होणार नाही. केवळ आठवणीने पहिल्याप्रमाणेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करावा लागेल.

चार्टर्ड अकाउंटंट विकास अग्रवाल आणि हरिगोपाल पाटीदार
गुंतवणुकीची माहिती बँकेला द्यायला हवी
इन्कम टॅक्स रिटर्न न भरण्याची सवलत हवी असेल, तर पेन्शन अकाउंट ज्या बँकेत आहे, त्या बँकेला इन्कम टॅक्स कलम 80 सी-80 यू अंतर्गत केलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीची माहिती बँकेला द्यायला हवी. उदा. पीपीएफ, जीवन विमा, ईएलएसएस, युलिस, इत्यादी. ही माहिती देण्याकरिता बँक एक फॉर्म देईल. हा फॉर्म सरकार लवकरच प्रसिद्ध करील. नोकरीत असताना ज्याप्रमाणे आपल्या गुंतवणुकीची माहिती कंपनीला दिली जाते, त्याचप्रमाणे ही माहिती बँकेला द्यायची आहे. आयकर अधिनियमात सांगितलेल्या नियमानुसार सवलतयोग्य उत्पन्न बाजूला करून उर्वरित टॅक्सेबल उत्पन्नावर बँकेकडून टीडीएस (TDS) कापला जाईल. आयकर विभाग बँकेने दिलेल्या या माहितीला तुमचा रिटर्न समजेल. याआधी रिटर्न भरताना कधी चूक झाली, तर पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागत होता; आता तो दंड भरावा लागणार नाही, हा नव्या योजनेचा फायदा.
या ज्येष्ठ नागरिकांना लाभ नाही
75 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या ज्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शनसोबतच घरभाड्यातून, डिव्हिडंडमधून, कॅपिटल गेनमधून किंवा व्यापारातून उत्पन्न मिळत असेल, तर अशा व्यक्तींना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यात कोणतीही सवलत नाही. त्यांना तो आधीप्रमाणेच भरावा लागेल. पेन्शन मिळत असलेलं खातं आणि मुदत ठेवीचं खातं वेगवेगळ्या बँकेत असेल, तरीही इन्कम टॅक्स रिटर्न भरावा लागणारच आहे.
विद्यमान टॅक्स स्लॅब
ज्येष्ठ नागरिकांना सध्याच्या वर्षाचा टॅक्स स्लॅबच (Tax Slab) पुढच्या वर्षीसाठी लागू आहे. इन्कम टॅक्स कायदा 1961नुसाार, 60 वर्षांवरील आणि 80 वर्षांखालील करदात्यांना ज्येष्ठ नागरिक मानलं जातं. त्यांच्यासाठी पहिल्या पर्यायात अर्थात जुन्या यंत्रणेच्या टॅक्स स्लॅबनुसार वार्षिक तीन लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टॅक्स नाही. तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत पाच टक्के, 10 लाख रुपयांपर्यंत 20 टक्के आणि 10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के दराने टॅक्स भरावा लागेल.
नव्या टॅक्स यंत्रणेत सहभागी झाल्यास गुंतवणुकीवर सवलत नाही
जुन्या करयंत्रणेपेक्षा वेगळ्या असलेल्या नव्या करयंत्रणेचा अवलंब केल्यावर ज्येष्ठ नागरिकांसाठी काही अपवाद नाही. म्हणजेच त्यांना इन्कम टॅक्स अधिनियमात दिलेल्या 70 सवलती मिळणार नाहीत. त्यांना वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत टॅक्स भरावा लागणार नाही. अडीच लाख ते पाच लाखांपर्यंत पाच टक्के, पाच ते साडेसात लाखांपर्यंत 10 टक्के, साडेसात ते 10 लाखांपर्यंत 15 टक्के, 10 लाख ते साडेबारा लाखांपर्यंत 20 टक्के, 12.5 ते 15 लाखांपर्यंत 25 टक्के, तर 15 लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के टॅक्स भरावा लागेल.
जुन्या करव्यवस्थेच्या आधारे जाणून घ्या या स्कीमचा फायदा कसा होणार
आर. के. मिश्रा, परमेश्वर यादव आणि के. आर. चौहान यांची वयं 75 वर्षांपेक्षा अधिक आहेत. मिश्रा यांना पेन्शनमधून साडेचार लाख रुपये, तर व्याजातून अडीच लाख रुपये मिळतात. दोन्ही खाती एसबीआयमध्ये आहेत. यादव यांना पेन्शन म्हणून वार्षिक साडेतीन लाख रुपये मिळतात, तर व्याजातून अडीच लाख रुपये मिळतात. त्यांचंही पेन्शन अकाउंट, तसंच एफडी एसबीआयमध्येच आहे. चौहान यांना वार्षिक साडेतीन लाख रुपये पेन्शन मिळते आणि ती एसबीआयमध्ये जमा होते. त्यांची एफडी बीओआयमध्ये असून, एफडीच्या व्याजातून त्यांना वार्षिक अडीच लाख रुपये मिळतात.
हे देखील वाचा - Gold Price Today: चार दिवसांच्या घसरणीनंतर आज सोन्याचांदीला झळाळी, इथे तपासा लेटेस्ट दर
या उदाहरणातून तुम्हाला दिसेल, की चौहान यांच्यावर कोणतंही करदायित्व नाही; मात्र त्यांची पेन्शन बँक आणि एफडी बँक वेगवेगळी असल्यामुळे एफडीतून मिळणाऱ्या व्याजावर बँकेने 15 हजार रुपये टीडीएस कापला आहे. त्याचा परतावा मिळण्यासाठी त्यांना रिटर्न दाखल करावा लागेल. यादव यांचं उत्पन्न चौहान यांच्याएवढंच आहे; मात्र त्यांची पेन्शन आणि एफडी एकाच बँकेत आहे. त्यामुळे त्यांचा टीडीएसही कापला गेला नाही आणि त्यांना रिटर्नही दाखल करण्याची गरज नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.