Home /News /money /

3 महिने नाही द्यावा लागणार कर्जावरील EMI? इथे वाचा तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

3 महिने नाही द्यावा लागणार कर्जावरील EMI? इथे वाचा तुम्हाला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

आरबीआयने EMI संदर्भात काही घोषणा केल्या आहेत तर बँकांना काही सल्ले देखील दिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे.

    नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोनाचा (Coronavirus) सामना करण्यासाठी भारतात प्रत्येक संस्था प्रयत्नशील आहे. देशाची आर्थिक बाजू सांभाळण्याची सर्वात जास्त गरज लॉकडाऊनच्या काळात आहे. अशा परिस्थितीत आरबीआयने EMI संदर्भात काही घोषणा केल्या आहेत तर बँकांना काही सल्ले देखील दिली आहेत. महत्त्वाचे म्हणजे आरबीआयने सर्व टर्म लोनवर 3 महिन्यांचा मोरोटोरियम लागू केला आहे. यामुळे बँका त्यांच्या ग्राहकांना 3 महिन्याचा ईएमआय न भरण्याची मुभा देऊ शकतात आणि यामुळे त्यांचा क्रेडिट स्कोर देखील खराब होणार नाही. (हे वाचा-कोरोनाच्या संकटकाळात RBI कडून रेपो रेटमध्ये मोठी कपात, गृहकर्ज होणार स्वस्त) या निर्णयासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. प्रश्नः लवकरच माझा ईएमआय भरावा लागणार आहे. माझ्या खात्यातून देय रक्कम कपात केली जाणार नाही? उत्तरः आरबीआयने केवळ बँकांना स्थगिती देण्याची परवानगी दिली आहे. मात्र तुम्हाला तुमच्या बँकेकडून ईएमआय स्थगित करण्यासंदर्भात परवानगी मिळू शकते. याचा अर्थ असा बँकेकडून विशिष्ट मंजूरी येईपर्यंत ईएमआय तुमच्या खात्यातून वजा केले जातील. प्रश्न: माझा ईएमआय स्थगित केला गेला आहे हे मला कसे कळेल? उत्तरः आरबीआयने अद्याप यावर तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. एकदा मार्गदर्शक तत्त्वे जारी झाल्यानंतर त्याबद्दल अधिक स्पष्टता येईल. प्रश्नः ही प्रक्रिया बँक स्तरावर कशी कार्य करेल? उत्तरः सर्व बँकांना स्थगिती विषयावर चर्चा करावी लागेल आणि त्यांच्या बोर्ड स्तरावर निर्णय मंजूर करावा लागेल. एकदा मंजूर झाल्यावर ते त्यांच्याकडून ग्राहकांना त्या स्थगितीबद्दल माहिती देतील. प्रश्नः जर माझ्या बँकेने माझ्या ईएमआय स्थगित केला, तर ती रक्कम न भरल्यास माझ्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम होईल? उत्तर: नाही. क्रेडिट स्कोअरवर परिणाम होणार नाही. प्रश्न: कोणत्या बँका आपल्या ग्राहकांना हा स्थगिती देऊ शकतात? उत्तरः सर्व वाणिज्य बँका- Commercial Banks (प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्त बँक आणि स्थानिक क्षेत्रातील बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था आणि एनबीएफसी (गृहनिर्माण वित्त कंपन्या आणि मायक्रो-फायनान्स संस्थांसह) समाविष्ट आहेत. प्रश्न: ईएमआय माफ होणार की ईएमआय स्थगित होणार? उत्तरः EMI माफ नाही तर स्थगित होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेने अशी शिफारस केली आहे परतफेड आणि कर्जासाठीच्या इतर सर्व तारखा 3 महिन्यांच्या कालावधीसाठी पुढे ढकलण्यात याव्या. प्रश्न: या स्थगितीमध्ये मुख्य परतफेड आणि व्याज दोन्हीचा समावेश आहे का? उत्तर: होय. तुमच्या बँकेने जाहीर केल्यास 3 महिन्यासाठी संपूर्ण देय रक्कम आणि व्याजासह संपूर्ण ईएमआय स्थगित केला जाईल. 1 मार्च 2020 रोजी थकबाकी असणाऱ्यांच्या कर्जासाठी हा नियम लागू होईल. (हे वाचा-लॉकडाऊन असतानाही 1 एप्रिलपासून PNBसह या 10 बँकांचं होणार विलीनीकरण) प्रश्न: या स्थगितीमध्ये कोणत्या कर्जांचा समावेश आहे? उत्तर: RBI च्या पॉलिसीमध्ये मुदत कर्जांच्या स्पष्ट उल्लेख आहे. ज्यात गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, शैक्षणिक कर्जे, वाहन आणि ज्यामध्ये मुदतीचा कालावधी आहे अशा कोणत्याही कर्जांचा समावेश आहे. यात मोबाईल, फ्रीज, टीव्ही इ. वरील ईएमआयचाही समावेश आहे. प्रश्न: या स्थगितीमध्ये क्रेडिट कार्डने केलेले पेमेंट समाविष्ट आहे का? उत्तर: क्रेडिट कार्ड रिव्हॉल्व्हिंग क्रेडिट असून ते मुदत कर्ज नाही आहेत, त्यामुळे या स्थगितीअंतर्गत त्यांचा समावेश होत नाही. प्रश्नः मी एक फॅक्टरी उभारण्यासाठी प्रकल्प कर्ज घेतले आहे. मी माझा ईएमआय भरला नाही तरी चालणार? उत्तरः टर्म कर्ज किंवा मुदत कर्ज म्हणून वर्गीकृत केलेल्या कोणत्याही कर्जावर स्थगितीस परवानगी आहे. जर आपण ईएमआय भरण्याच्या स्थितीत नसल्याची खातरजमा बँकेला झाली तर तुमच्या ईएमआयला स्थगिती मिळू शकते. प्रश्नः आरबीआयने व्यवसायांसाठी काय जाहीर केले? उत्तरः व्यवसायाद्वारे घेतलेल्या सर्व कार्यरत भांडवली कर्जाच्या व्याज देयकासाठी आरबीआयने स्थगिती दिली आहे. 1 मार्च 2020 रोजी थकबाकी असलेल्या सर्व कामकाजाच्या भांडवलाच्या सुविधांच्या बाबतीत हे लागू होईल. मुदतीच्या कालावधीसाठी जमा झालेले व्याज स्थगित अवधीच्या मुदतीनंतर दिले जाईल. मोरेटोरियम कर्जाच्या कराराच्या अटी व शर्तीत बदल मानला जात नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Reserve bank of india

    पुढील बातम्या