नवी दिल्ली, 27 मार्च : भारतामध्ये कोरोना व्हायरसचा धोका इतर देशांच्या प्रमाणात वाढत नसला तरीही संकट मोठं आहे. त्यादृष्टीने महत्त्वाची पावलं उचलण्यासाठी सर्वच स्तरातून प्रयत्न सुरू आहे. याचसंदर्भात Monetary Policy Committee (MPC) ची बैठक झाली. कोव्हिड 19 (COVID-19) मुळे ही बैठक 24 ते 27 मार्च या कालावधीत लवकर घेण्यात आली या बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे अनेक कर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो रेटमध्ये 75 bps ची कपात करण्यात आली आहे आणि 4.40 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि इतर कर्जांचे हफ्ते भरताना मोठा दिलासा मिळणार आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी ही माहिती दिली. आर्थिक स्थिरता आणण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याचंही ते म्हणाले.
Repo rate reduced by 75 basis points to 4.4.%. Reverse repo-rate reduced by 90 basis points to 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/eBb0WPAG21
— ANI (@ANI) March 27, 2020
होम लोन, कार लोन त्याचप्रमाणे इतर काही कर्जांवरील ईएमआय स्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्जावरील ईएमआय कमी होणार असून सर्व पीएसयू बँका व्याजदरांमध्ये कपात करणार आहेत. त्यामुळे सामान्य जनतेला याचा मोठा फायदा होणार आहे. त्याचप्रमाणे कर्ज रेपो दराबरोबर थेट लिंक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आरबीआयने रिव्हर्स रेपो रेटमध्ये 90 bps ची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे हा दर आता 4 टक्क्यांवर पोहोचला आहे. आरबीआयने व्याजदरामध्ये 0.75 टक्क्याने कपात केली आहे, त्याचप्रमाणे त्यांनी बँकांना असा सल्ला दिला आहे की, ईएमआयवर 3 महिन्यांची सूट द्यावी. आरबीआयने आदेश नाही, तर सल्ला दिला आहे. त्यामुळे आता ईएमआयबाबतचा यापुढील निर्णय बँकांकडून घेण्यात येईल. (हे वाचा- 8 कोटी महिलांना 3 महिन्यासाठी मिळणार मोफत सिलेंडर, केंद्र सरकारची मोठी घोषणा ) आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकड्यानुसार आजपर्यंत भारतामध्ये कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 724वर पोहोचला आहे. महाराष्ट्रामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला असून गुजरातमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. कर्नाटकमध्ये 2 तर मध्य प्रदेश, तमिळनाडू, बिहार, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एक एवढ्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 640 रुग्णांचा उपचार सुरू असून 66 लोक रोकमुक्त झाले आहेत. संक्रमित 724 रुग्णांमध्ये 47 विदेशी नागरिकांचा समावेश आहे.