नवी दिल्ली, 2 नोव्हेंबर : शुभमुहूर्तावर सोनं खरेदी (Gold Buying) करणं ही आपल्या भारतीय संस्कृतीतील (Indian Culture) एक पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. सोने हा गुंतवणूकीचा चांगला पर्याय मानला जातो. त्यामुळे दिवाळीतही आवर्जून सोन्याची खरेदी केली जाते. गेल्या वर्षी दिवाळीवर (Diwali) कोरोना संकटाचं सावट गंभीर असल्यानं सोन्याच्या बाजारपेठेत फार उत्साह नव्हता. तेव्हा सोन्याचे दरही वधारले होते. यंदा मात्र कोरोनाचे संकटही कमी झाले आहे, तसेच सोन्याचे दरही मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाले आहेत. त्यामुळे या दिवाळीत सोन्याची मागणी वाढणार असल्याची अपेक्षा सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
पुढील एका वर्षात सोन्याचा भाव चांगलाच (Gold Price) वाढण्याची शक्यता असून प्रति 10 ग्रॅममागे 52 ते 53 हजार रुपयांपर्यंतचा उच्चांक (New High) गाठण्याचा अंदाज मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने वर्तवला आहे. गेल्या वर्षात शेअर्सच्या तुलनेत सोन्याने उत्कृष्ट परतावा (Returns) दिला आहे. आता सोन्याच्या किमती कमी झाल्या असल्या तरी शेअर बाजारातील अस्थिरतेच्या तुलनेत सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित आहे. सोन्याच्या किमतीत अल्पावधीसाठी घट होण्याचीही शक्यता आहे, त्यामुळे गुंतवणूकदारांना खरेदीची चांगली संधी मिळू शकते. सोन्याच्या किंमती 2000 डॉलर्सपर्यंत वाढण्याची तसंच नवीन उच्चांक गाठण्याचीही शक्यता या कंपनीनं वर्तवली आहे.
गेल्या वर्षीपेक्षा यंदा कोरोनाचे निर्बंध (Corona Restriction) कमी असल्यानं दुकाने खुली असून, सोन्याची एकूण मागणीही वाढली आहे. सप्टेंबरपर्यंत 740 टन सोनं आयात (Import) करण्यात आलं आहे. शेअर्ससारख्या जोखमीच्या मालमत्तामध्ये गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात चढ-उतार झाले असून, त्यांनी चांगला परतावा दिला आहे. मात्र या ट्रेंडमध्ये बदल झाला किंवा त्यात मोठी घसरण झाल्यास सोन्यामध्ये मोठी वाढ होऊ शकते, असा अंदाज या कंपनीने वर्तवला आहे.
'गेल्या आठ वर्षांत सोन्याने दुहेरी अंकात कामगिरी केली आहे. मात्र 2021 मध्ये सोन्याच्या किमतीचा परतावा गुंतवणूकदारांना लाभदायी ठरला नाही. 2021 मध्ये सोन्याच्या किमती 51,875 रुपयांच्या उच्च आणि 43,320 च्या नीचांकी पातळीवर पोहोचल्या होत्या. 2019 आणि 2020 मध्ये सोन्याच्या किमती अनुक्रमे 52 टक्के आणि 25 टक्के वधारल्या होत्या,' असंही त्यांनी नमूद केलं आहे.
'पुढील दिवाळीपर्यंत सोन्याच्या किमती प्रति 10 ग्रॅमसाठी 54 हजारांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. पुढील दिवाळीपर्यंत, कमोडीटी मार्केटमध्ये सोन्याच्या किमतीला 42,300 ते 41,100 या पातळीवर सपोर्ट मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. 41100 पातळीच्या खाली सातत्याने ट्रेडिंग केल्यास 35,700वर सपोर्ट मिळेल आणि नंतर 29,500 च्या स्तरांवर सपोर्ट मिळेल, असा अंदाज एंजल वन या ब्रोकिंग फर्मनेही वर्तवला आहे.
गेल्या काही महिन्यांत, अमेरिकन डॉलरमधील (US Dollar)अस्थिरता आणि Bond Yield मुळे सोन्याचे भाव गडगडले आहेत. वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, अपेक्षेपेक्षा चांगले आर्थिक निकाल आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या दृष्टिकोनामुळे बाजारात वाढ दिसून आली, तर दुसऱ्या सहामाहीत कमकुवत आर्थिक स्थिती आणि यूएस फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve)दृष्टिकोनातील बदल यामुळे सोन्याला प्राधान्य मिळण्याची शक्यता वाढली असून, सोन्यात तेजी येण्याची शक्यता आहे, असा विश्लेषकांचा अंदाज आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या (World Gold Council) मते, भारतातील सोन्याची मागणी कोविडनंतर परत होत आहे. कारण देशभरातील कोरोनाचे निर्बंध हळूहळू उठवले जात असून, सणासुदीचा कालावधी आणि लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढत आहे.
'कोविडच्या सुरुवातीनंतर सध्याचा हा काळ सोने खरेदीसाठीचा सर्वात उत्तम काळ असेल असा अंदाज आहे. डिजिटल सोन्याची मागणीही अनेक पटींनी वाढली आहे, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, आघाडीच्या ज्वेलर्सनी डिजिटल गोल्ड आणि युपीआय (UPI)प्लॅटफॉर्मशी केलेल्या टायअपमुळे ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देणाऱ्या खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे,' असं वर्ल्ड गोल्ड कौन्सिलनं म्हटलं आहे.
भारताची सोन्याची मागणी जुलै-सप्टेंबर या कालावधीत 139.1 टन होती, सकारात्मक वातावरणामुळे 2020 च्या तुलनेत त्यात 47 टक्क्यांनी वाढली झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांची मागणी 58 टक्क्यांनी वाढून 96.2 टन झाली, तर नाण्यांच्या गुंतवणुकीची मागणी देखील 18 टक्क्यांनी वाढली. पावसाळा आणि पितृ-पक्षाचा कालावधीत खरेदीत घट झाली, मात्र सोन्याच्या कमी झालेल्या किमतींनी मागणीत चांगली वाढ नोंदवली आहे.
जागतिक मध्यवर्ती बँकेच्या अंदाजापेक्षा वाढलेल्या महागाईनेही (Inflation) सोन्याच्या मागणीला चालना दिली आहे. चीनमधील एव्हरग्रेंड या बड्या उद्योगसमूहाच्या आर्थिकस्थितीबाबत निर्माण झालेली अनिश्चितता, वीज टंचाईची समस्या, यूएस-चीन यांच्यातील व्यापार चर्चा, कोविड-19 आणि डेल्टा विषाणूही वाढती प्रकरणे, वाढते कर्ज आणि इतर काही गोष्टींमुळे सोन्यातील गुंतवणूकीला चालना मिळेल. कोविडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातील अर्थव्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सुरू केलेल्या Bond Yield खरेदीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. फेडच्या आगामी बैठकांमध्ये याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यामुळे सोन्याला खरेदीसाठी आणखी एक संधी मिळण्याची शक्यता आहे, असं मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसनं नमूद केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.