मुंबई, 9 एप्रिल: सध्या शॉपिंग, डिजिटल पेमेंट, तिकीट बुकिंग, बँकिंग व्यवहार आदी कामांसाठी वेगवेगळी अॅप्स (Apps) उपलब्ध आहेत. काही अॅप्सनी या सर्व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. स्मार्टफोनच्या मदतीनं वापरता येणारी ही अॅप्स ग्राहकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहेत. कोरोना काळात या अॅप्सचं महत्त्व अधोरेखित झालं. त्यामुळे या अॅप्सच्या युझर्सची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. या अॅप्समध्ये आता अजून एका अॅपची भर पडली आहे. टाटा (Tata) कंपनीच्या Tata Neu App चं नुकतंच अधिकृत लाँचिंग करण्यात आलं. हे अॅप अन्य अॅप्सच्या तुलनेत वेगळं आणि सर्वसमावेशक असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. यामध्ये डिजिटल पेमेंट, शॉपिंग, ताज्या घडामोडी, आर्थिक नियोजन, सुट्ट्यांचं नियोजन, टाटा कंपनीची विविध उत्पादनं, तसंच कमाईची संधी ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती देणारं वृत्त `एबीपी लाइव्ह`नं प्रसिद्ध केलं आहे. सध्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) क्रिकेट स्पर्धांचा रणसंग्राम सुरू आहे. या मॅचेसदरम्यान टाटा निऊ अॅपची जाहिरात प्रेक्षकांसाठी विशेष लक्षवेधी ठरत आहे. या अॅपची चर्चा खरंतर आयपीएल सुरू होण्याआधीपासून होती. हे अॅप एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लॉंच होईल, असं टाटा कंपनीनं सांगितलं होतं. त्यानुसार 7 एप्रिल 2022 रोजी या अॅपचं अधिकृत लॉंचिंग करण्यात आलं. हे अॅप इतर अॅप्सपेक्षा वेगळं असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचं औत्सुक्य वाढलं आहे. या अॅपमध्ये वेगळं काय असा प्रश्नही ग्राहकांच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे या अॅपविषयी सविस्तर जाणून घेऊ या. SBI ने ग्राहकांना केलं सावध; ऑनलाईन फसवणुकीपासून बचावासाठी दिल्या खास टिप्स हे अॅप अँड्रॉइड (Android) आणि अॅपल (Apple) या दोन्हीच्या अॅप स्टोअरवर (App Store) ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. अॅप स्टोअरमध्ये जाऊन Tata Neu App असं टाइप केल्यावर तुम्हाला हे अॅप दिसेल आणि त्यानंतर तुम्ही ते डाउनलोड करू शकता. नॅशनल पेन्शन स्कीममध्ये लोकांचा कल वाढला; वर्षभरात वाढले एक कोटी ग्राहक, तुम्हीही केली का गुंतवणूक? या अॅपमध्ये यूपीआय म्हणजे डिजिटल पेमेंटचा (Digital Payment) ऑप्शन देण्यात आला आहे. यासाठी तुम्हाला अॅपमधल्या टाटा पे (Tata Pay) ऑप्शनवर जावं लागेल. त्यानंतर तुम्ही विक्रेत्याला पेमेंट करू शकाल. या व्यवहारांसाठी अॅपने `आयसीआयसीआय`शी करार केला आहे. या अॅपच्या माध्यामातून तुम्ही वीज, फोन, तसंच इतर गोष्टींची बिलं भरू शकाल. या अॅपवर शॉपिंगसाठी (Shopping) अनेक प्लॅटफॉर्म्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. टाटा निऊ अॅपच्या माध्यमातून खरेदी केल्यास तुम्हाला कॅशबॅक, तसंच इतर बक्षिसंदेखील मिळतील. विमान तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंगसह ऑनलाइन शॉपिंगवर तुम्हाला सर्वाधिक कॅशबॅक (Cashback) मिळू शकतो. टाटा निऊ अॅपचं खास वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला टाटा ग्रुपशी निगडित सर्व उत्पादनं (Product) एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. युझर्सना टाटा निऊसह टाटा ग्रुपच्या सेवा, टाटा एआयजी, टाटा कॅपिटल, टाटा म्युच्युअल फंड, टाटा प्ले, टाटा हेल्थ, टाटा 1 एमजी, टाटा बिग बास्केट, टाटा क्रोमा, टाटा क्लिक, टाटा ट्रेंड, आयएचसीएल, ताज ग्रुप, व्हिस्टारा, एअर आशिया, एअर इंडिया, टाटा क्लास एज, टाटा टेलिसर्व्हिसेस आदी सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याचं कंपनीनं सांगितलं. या अॅपवर केवळ शॉपिंग किंवा पेमेंट सुविधाच नाही, तर इतरही अनेक गोष्टी उपलब्ध आहेत. अॅपवर तुम्हाला ताजा कंटेट, आर्थिक नियोजन, सुट्ट्यांचं नियोजन करण्यासाठीही सुविधा मिळेल. या सर्व सुविधांसोबतच तुम्हाला टाटा निऊ अॅपच्या माध्यमातून कमाईची संधीदेखील मिळणार आहे. तुम्ही हे अॅप तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला किंवा मित्रांना रेफर (Refer) केलं तर तुम्हाला टाटा निऊ कॉइन (Coin) मिळेल. हे कॉइन तुम्ही शॉपिंगच्या वेळी रीडिम करू शकता. याशिवाय पेमेंट किंवा शॉपिंग केल्यासदेखील तुम्हाला कॉइन मिळेल. हे टाटा निऊ अॅपचं वेगळेपण म्हणावं लागेल. `या अॅपच्या माध्यमातून युझर्सना टाटा ग्रुपची सर्व उत्पादनं एकाच ठिकाणी उपलब्ध होतील. याशिवाय हे अॅप खास असेल. युझर्सचं जीवन सहजसोपं व्हावं, हा या अॅपचा उद्देश आहे,`` असं टाटा निऊ अॅप लॉंचिंगवेळी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.