नवी दिल्ली, 03 मार्च: यूएस शेअर मार्केटमध्ये (US Market) लिस्टेड निवडक स्टॉक्सचं ट्रेडिंग (Trading) आजपासून (गुरुवार, 3 फेब्रुवारी 22) ‘एनएसई आयएफएससी’वर (NSE IFSC) सुरू झालं आहे. त्यामुळे आता भारतात असलेले लोक नॅशनल स्टॉक एक्सचेंजने उपलब्ध करून दिलेल्या इंटरनॅशनल एक्सचेंजच्या (International Exchange) माध्यमातून या शेअर्समध्ये ट्रेडिंग करू शकतील. अॅपल, गुगल आणि टेस्लासारख्या कंपन्यांचे शेअर्स येत्या काळात तेजीत येतील, त्यामुळे त्यात गुंतवणूक करावी, असं ज्या लोकांना वाटतं त्यांच्यासाठी ही सुविधा फायदेशीर ठरेल. या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना परदेशातील मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणं शक्य होणार आहे. सध्या ट्रेडिंगसाठी निवडक पर्याय उपलब्ध असले तरी लवकरच उर्वरित स्टॉक्सच्या ट्रेडिंगविषयीची माहिती लवकरच जारी केली जाणार आहे. एनएसई आयएफएससी हे ‘एनएसई’चं इंटरनॅशनल एक्सचेंज आहे. ही एनएसईच्या मालकीची सहायक कंपनी आहे. एनएसई आयएफएससी फ्लॅटफॉर्मद्वारे निवडक यूएस स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करण्यासाठी सुविधा दिली जाईल, अशी घोषणा एनएसई इंटरनॅशनल एक्सचेंजने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केली होती. गुंतवणूकदार या प्लॅटफॉर्मद्वारे यूएसमधील स्टॉक खरेदी करू शकतील आणि शेअर्सच्या बदल्यात डिपॉझिटरी रिसिट्स जारी करू शकतील. हे वाचा- अश्नीर ग्रोव्हर यांनी ‘भारत पे’ला ब्रँड बनवलं; मग काय आहे वादात सापडण्याचं कारण? या प्लॅटफॉर्मवर 50 स्टॉक्सच्या रिसिट्सचं ट्रेडिंग करायची परवानगी देण्यात आली आहे. यापैकी आठ स्टॉक्स 3 मार्च 22पासून ट्रेडिंगसाठी उपलब्ध झाले आहेत. या स्टॉक्समध्ये अल्फाबेट आयएनसी-गुगल (Alphabet Inc - Google), अॅमेझॉन आयएनसी (Amazon Inc) , टेस्ला आयएनसी (Tesla Inc), मेटा प्लॅटफॉर्म्स- फेसबुक (Mata Platforms-Facebook), मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (Microsoft Corporation), नेटफिल्क्स (Netflix), अॅपल (Apple) आणि वॉलमार्टचा (Walmart) समावेश आहे. हे सर्व अमेरिकेतले मोठे आणि प्रसिद्ध स्टॉक्स आहेत. या स्टॉक्समध्ये आता गुंतवणूकदारांना भारतात राहून गुंतवणूक करणं शक्य होणार आहे. उर्वरित स्टॉक्ससाठी जारी होणार स्वतंत्र परिपत्रक उर्वरित स्टॉक्सचं ट्रेडिंग सुरू होण्याची तारीख वेगळ्या परिपत्रकाद्वारे सूचित केली जाणार आहे. या प्लॅटफॉर्मवर यूएस स्टॉकचं ट्रेडिंग, क्लिअरिंग, सेटलमेंट आणि होल्डिंगची संपूर्ण प्रक्रिया आयएफएससी प्राधिकरणाच्या नियामकांतर्गत पूर्ण केली जाणार आहे. भारतीय रिटेल गुंतवणूकदार एनएससी आयएफएससी प्लॅटफॉर्म द्वारे Liberalized Remittance Scheme-LRS मर्यादेनुसार व्यवसाय करू शकतील. या एलआरएसची तरतूद रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) केली आहे. हे वाचा- रिलायन्सने फ्यूचर ग्रुपचा ताबा घेतल्याने कर्मचारी, मालक, विक्रेते टेन्शन फ्री! एनएसई आयएफएससीने दिलेल्या माहितीनुसार, या प्लॅटफॉर्मद्वारे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक खूप सोपी होईल आणि त्यासाठीचं मूल्यही जास्त नसेल. या प्लॅटफॉर्मवर गुंतवणूकदारांना फ्रॅक्शनल क्वांटिटीजमध्ये गुंतवणूकीची सुविधा मिळेल. एकूणच या सुविधेमुळे गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी पर्याय उपलब्ध होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.