नवी दिल्ली, 03 मार्च: उद्योगपती मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) फ्युचर ग्रुपच्या (Future Group) रिटेल स्टोअर्सचा कार्यभार स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर, रिलायन्स रिटेलच्या लेबलअंतर्गत फ्युचर ग्रुपच्या रिटेल स्टोअर्सना रिब्रँड केलं जात आहे. या घडामोडीचं ग्रुपच्या स्टोअर्सचे विक्रेते, पुरवठादार, जमीनदार आणि कर्मचाऱ्यांनी स्वागत केलं आहे आणि याकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहत आहेत. सध्या या व्यवसायात प्रचंड मंदी आहे मात्र या नव्या घडामोडींमुळे व्यवसायही पुनरुज्जीवित होईल. फ्युचर ग्रुपच्या स्टोअर्सचे लीज रिलायन्सच्या नावावर होते आणि फ्युचर ग्रुपला जमिनी दिलेल्यांना भाडेपट्ट्याने पैसे देण्यासह स्टोअर्सच्या खेळत्या भांडवलाची गरज पुरवणं अवघड होत होतं. त्यामुळे स्टोअर्स चालवणंही अवघड झालं होतं. त्यामुळे नुकतंच रिलायन्सने फ्युचर रिटेल स्टोअर्स ताब्यात घ्यायला सुरुवात केली. रिलायन्सने या स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांना नोकरीच्या ऑफर दिल्या आहेत. त्यामुळे फ्युचर ग्रुपच्या रिटेल नेटवर्कमधील जवळपास 30,000 कर्मचारी नोकरीत कायम होऊ शकतील. या उद्योग क्षेत्रातील लोकांनी या बदलाचं स्वागत केलं आहे आणि यामुळे कर्मचाऱ्यांची नोकरीतील अनिश्चितता संपेल आणि वेळेवर पगार मिळण्याबरोबरच नोकरीची सुरक्षितताही असेल अशी प्रतिक्रिया देण्यात येत आहे. हे वाचा- Aviation Turbine Fuel: विमानाच्या इंधन किमतीत या वर्षात पाचव्यांदा वाढ ही घडामोड कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे आणि आता त्यांना वेळेवर पगार मिळेल, अशी प्रतिक्रिया इझी डे मार्टचे माजी लँडलॉर्ड पंकज बन्सल (former landlord of Easy Day Mart Pankaj Bansal) यांनी दिली आहे. ‘महिन्याचा पगार मिळाला नाही तर अर्थातच अनेक अडचणींचा सामना करावा लागणं हे साहजिकच आहे. कर्मचाऱ्यांना काही वेळेस निम्माच पगार मिळत होता. त्यामुळे त्यांनाही खूप अडचणी येत होत्या. रिलायन्स हा एक अत्यंत प्रभावशाली ग्रुप असल्याने त्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळू शकेल’, असंही त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे विक्रेते आणि पुरवठादारांची थकबाकी मिळाल्याने त्यांनाही दिलासा मिळाला आहे. रिलायन्स ही बडी कॉर्पोरेट कंपनी आता त्यांची नवी ग्राहक असल्यानं त्यांना व्यवसायाच्या नवीन संधी मिळतील आणि व्यवसाय स्थिर होण्यासही मदत होईल. ‘कर्मचारी आणि रिटेल क्षेत्रासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. यामुळे नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक अडचणी दूर होतील. या अडचणी हे एक खूप मोठं आव्हान होतं. गेली सात वर्षं थकबाकी राहिलेली होती’, अशी प्रतिक्रिया ॲम्बस्टनन मार्केटिंग सोल्युशन्सचे व्यवस्थापकीय भागीदार शम्मी ठाकूर यांनी दिली आहे. ‘रिलायन्स हा या क्षेत्रातील मोठा खेळाडू आहे. त्यांच्या प्रवेशामुळे पैसे वसूल होतील’, असंही ते म्हणाले. हे वाचा- अश्नीर ग्रोव्हर यांनी ‘भारत पे’ला ब्रँड बनवलं; मग काय आहे वादात सापडण्याचं कारण? स्टोअरचे मालक-जमीनदारांनी त्यांच्या स्टोअर्सची भाडेपट्टी रिलायन्सला गेल्या वर्षीपासूनच द्यायला सुरुवात केली होती कारण फ्युचर ग्रुपने त्यांना पैसेच दिले नव्हते आणि फ्युचर ग्रुप त्यांचं भाडे देईल का याबद्दल त्यांना शंका होती. रिलायन्सशी भाडेपट्टीबद्दल तडजोड केल्यानंतर त्यांची थकबाकी देण्यात आली आणि आता भाडंही वेळेवर मिळेल अशी त्यांना आशा आहे. फ्युचर ग्रुपने गेली दोन वर्ष त्यांना वेळेवर भाडंच दिलं नव्हतं असं इझी डे मार्टचे माजी जमीनदार पंकज बन्सल यांनी म्हटलंय. पण आता रिलायन्सने ताबा घेतल्यामुळे ‘दिलासा’ वाटत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. ‘बालाबगारहमध्ये माझं इझी डेचं आणखी एक दुकान आहे. गेल्या काही महिन्यांपपासून, इझी डेनं भाडंच दिलं नव्हतं. कितीतरी वेळा त्यांनी भाडं वेळेवर दिलेलं नाही. गेल्या दोन वर्षांपासून हे असंच सुरू आहे. कोविड-19 च्या काळात त्यांनी आम्हाला एक पैसाही दिलेला नाही. त्यामुळे आम्ही रिलायन्स ग्रुपशी संपर्क साधला आणि त्यांनी ताबा घेण्याचं मान्य केलं. आता जगातील सगळ्यांत मोठ्या ग्रुपसोबत काम करणार असल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे,’ असं बन्सल म्हणाले. हे वाचा- Reliance Industries-Sanmina Corporation मध्ये महत्त्वाचा करार, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं निर्मितीत ‘आत्मनिर्भरते’कडे वाटचाल तर फ्युचर ग्रुपने ताबा घेतल्यापासून त्यांना सातत्याने संकटांचा सामना करावा लागला होता असं हैदराबादमधल्या साईशक्ती इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष आणि जमीनदार, हेरिटेज स्टोअरचे विक्रेते डॉ. एनपीव्हीएस राजू यांनी सांगितलं. फ्युचर ग्रुपसोबतच्या व्यवहाराबद्दल बोलताना ते म्हणाले, ‘2011मध्ये आम्ही आमच्या आवारात हेरिटेज स्टोअर सुरू केलं. या परिसरातील हे अशा प्रकारचं पहिलंच स्टोअर होतं. सात वर्षांनंतर फ्युचर ग्रुपने ते ताब्यात घेतलं. तेव्हापासून अनियमित पगार आणि स्टोअर्सची देखभाल नीट न करणं अशा समस्यांचा सतत सामना करावा लागला आहे. विक्री कमी झाली आणि त्यांच्याकडे पुरेसे कर्मचारीही नव्हते. विजेची बिलंही त्यांनी वेळेवर भरलेली नव्हती त्यामुळे वीजही कापली जायची. त्यामुळे आम्हाला मध्यस्थी करावीच लागली,’ असं डॉ. राजू यांनी सांगितलं. फ्युचर ग्रुपला खरं तर भारतात रिटेल स्टोअर्सची पायाभरणी करणारा ग्रुप म्हणून ओळखलं जातं. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे ते त्यांची कर्जही चुकती करू शकले नाहीत. 2020 च्या मध्यात त्यांनी त्यांची मालमत्ता रिलायन्सला विकण्याबाबत वाटाघाटी झाल्या. मात्र फ्युचरसोबत आपला व्यवहार झाल्याचा दावा ॲमेझॉननं केला होता. त्यामुळे ॲमेझॉनला फ्युचरच्या रिटेल व्यवसाय आणि त्याच्याशी निगडीत निर्णयांवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी मिळाली होती,असं ॲमेझॉनचं म्हणणं होतं. हे वाचा- पीएम मानधन योजनेत सरकार दर महिना देतंय 1800 रुपये? वाचा काय आहे प्रकरण अशा प्रकारचे व्यवहार म्हणजे देशाच्या कायद्याचं उल्लंघन असतं आणि परदेशी गुंतवणूक नियमानुसार ॲमेझॉनला देशाच्या मल्टी ब्रँड रिटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठी परवानगी नाही. मात्र रिटेलरवर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या लालसेपोटी हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. त्यामुळे या व्यवहाराला वेळ लागला. त्यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण होतं, विक्रेत्यांचा व्यवसाय कमी झाला होता आणि पुरवठादार, जमीनदारांची भरपूर थकबाकी होती. तोट्यात वाढच होत असल्याने पैसे दिलेले हतबल झाले होते आणि कंपनीला काहीही तोडगा सापडत नव्हता. त्यामुळे जमीनदार आणि कर्जदारांचं नुकसान होत होतं आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या. मात्र ही तोट्यात चालणारी स्टोअर्स रिलायन्सने ताब्यात घेतली. त्यामुळे दिवाळखोरी आत्तापुरती तरी लांबणीवर गेली आहे आणि एकदा व्यवस्थापनाच्या योजनेला मंजुरी मिळाली की कर्जदार आणि जमीनदारांना आता त्यांची थकबाकी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.